।। श्री शंकरगाथा ।।

3915

>> चैतन्यस्वरूप

स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या चळवळीने सर्वत्र जोर धरला होता. प्रत्येकजण आपापल्या परीने ब्रिटिशांच्या विरोधात लढत होता. काशीबाई हणबर नामक महिला सेनानीला ती, ‘पत्री’ सरकारच्या कार्यकर्त्यांना काडतुसे पुरवीत असल्याच्या संशयावरून सातारा पोलिसांनी अटक केली आणि कार्यकर्त्यांची नावे सांगावीत याकरिता तिचा अनन्वित छळ केला. तेव्हा या चळवळीत सक्रिय असलेल्या डॉ. रामचंद्र भोसले यांनी पोलीस कमिशनरला पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये, ‘45 दिवसांच्या आत काशीबाई हणबरांच्या कुटुंबाची माफी मागितली नाही तर तुला ठार करू’ अशी जरब दाखविणारी धमकीची भाषा वापरली मात्र पोलिसांनी अर्थातच त्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष केले.

महिनाभर जैसे थे परिस्थिती असल्याचे लक्षात येताच डॉ. भोसले यांनी पन्नासेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतः एका बुवाचे सोंग घेतले. ते रात्रीच्या वेळी एका खड्डय़ात पैसे पूरत असत आणि बुवाचे रूप धारण करून आसपासच्या गरीबांना खड्डा खणून त्यातून पैसे उत्पन्न झाल्याचे चमत्कार दाखवीत असत. खोटय़ा चमत्कारांच्या या अफवेने डॉक्टर अपेक्षेनुसार चार-पाच दिवसांत भोसलेबुवा म्हणून प्रसिद्धीस आले. ही गोष्ट पोलीस कमिशनरच्या कानावर गेली. तो जेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी आला तेव्हा भोसलेबुवा त्याला म्हणाले, ‘साहेब, मृत्यू तुमचा पाठलाग करीत आहे.’ कमिशनर घाबरला आणि ‘या संकटातून सुटका करून घेण्यासाठी उपाय सांगा’ अशी विनंती करता झाला. भोसलेबुवांनी कमिशनरला एक रात्र आपल्यासोबत राहावयास सांगितले. कमिशनरने भोसलेबुवांना आपल्या कॅम्पवर नेले. रात्री दोघेजण एकाच खोलीत झोपले. पहाटे डॉ. रामचंद्र भोसले यांनी कमिशनरला उठवले आणि आपली ओळख देत त्याला ठार केले.

सहकार्याने कॅम्पच्या बाहेर उभा केलेला घोडा घेऊन डॉ. भोसले पुण्याच्या दिशेने पळाले. एव्हाना ही गोष्ट कॅम्पात सर्वत्र झाली आणि पंचवीसेक बंदूकधारी पोलीस त्यांच्या मागावर निघाले. धोका लक्षात येताच, मागून गोळीबार झाल्यास घोडा मरू नये या कारणाने भोसले यांनी कात्रज घाटातील उतरणीवर घोडय़ाला सोडून दिले आणि ते धावतच निघाले. मार्गात त्यांना एक झोपडी दिसली तेव्हा डॉ. भोसले त्या झोपडीत घुसले. तिथे पायांना हाताचा विळखा घालून बसलेला एक माणूस म्हणाला, ‘शेकडो निरपराधांचे बळी घेणाऱयाला तू मारलेस म्हणूनच तुझ्यामागे पोलीस लागले आहेत. माझ्या जवळ बस. मी काय ते पाहतो.’ त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून भोसले गडबडले.

इतक्यात झोपडीत पोलीसही येऊन पोहोचले. पोलिसांनी त्या व्यक्तीला विचारले, ’Where is that man?’ तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिले, ‘You find out.’ पोलिसांच्या नजरा झोपडीत सर्वत्र फिरल्या, परंतु त्यांना भोसले कुठेही दिसेनात. कंटाळून पोलीस निघून गेले. भोसलेंचा जीव भांडय़ात पडला. ते गृहस्थ म्हणाले, ‘माझा आशीर्वाद आहे. तुला कुणीही कधीही पकडणार नाही. जा पळ इथून!’

डॉ. रामचंद्र भोसले जीव मुठीत घेऊन पुण्याला आले. तेथून नाशिक-अहमदाबाद-द्वारका-कराची-अफगाणिस्तान-बलुचिस्तान या मार्गे ते हिमालयात पोहोचले अन् तेथे अकरा वर्षे राहिले. या काळात त्यांना अनेक यती, योगी, माहात्म्यांचा सहवास लाभला. त्यांच्या या पलायनानंतर ब्रिटिशांनी त्यांची संपत्ती जप्त करून त्याचा लिलाव केला. त्या काळात डॉ. रामचंद्र भोसले यांच्यावर काही लाखांचे इनाम जाहीर झाले होते. डॉ. भोसले ब्रिटिशांच्या तावडीत सापडले नाहीत. पुढे देश स्वतंत्र झाला आणि डॉ. भोसले आध्यात्मिक मार्गाकडे वळले.

एकदा आचार्य अत्रे यांचा पाय दुखावला. त्यांच्याकडून बोलावणे आल्यामुळे डॉ. भोसले त्यांच्या घरी पोहोचले. औषधोपचार झाल्यावर भोसले हात धुवायला गेले असता एक तसबीर बघून ते थांबले आणि विचारते झाले, ‘बाब्या, हे कोण?’ तेव्हा अत्रे म्हणाले, ‘हे माझे गुरू श्रीसद्गुरू शंकर महाराज.’ डॉ. रामचंद्र भोसलेंच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. कात्रज येथे झोपडीत बसलेली व आपल्याला वाचविणारी व्यक्ती श्रीशंकर महाराज होते हे जाणवताच डॉक्टरांचे डोळे भरून आले. श्रीमहाराजांच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले.

आपली प्रतिक्रिया द्या