आमचं हातावरचं पोट…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाटकवाली मंडळी… म्हणजे केवळ कलाकार, दिग्दर्शक किंवा निर्माते नव्हेत. या मानाच्या पडद्यामागे अक्षरश: असंख्य हात राबत असतात. या कष्टकरी हातांवरच त्यांचे, त्यांच्या कुटुंबाचे पोट असते. सध्या नाटक बंद आहे. मग…???

नाटकाचा कपडेपट सांभाळणं, लाइट उतरवणं, सेट लावणं-हलवणं, रंगभूषा करणं अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारे लाइटमन, रंगभूषाकार, कपडे सांभाळणारे…हे सारेच जण नाटक यशस्वी होण्यासाठी पडद्यामागे मेहनत घेत असतात, मात्र कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गेल्या सात महिन्यांपासून नाटकांचे प्रयोग बंद आहेत. पडद्यामागच्या कलाकारांचेही हातावरचे पोट असते. प्रयोग झाला तरच त्यांना पैसे मिळतात. कोरोनाबंदीच्या सुरुवातीला त्यांना उदरनिर्वाहाकरिता विविध संस्थांनी मदत केली, पण ही मदत किती दिवस पुरणार? त्यामुळे पुन्हा त्यांच्यासमोर आपला उदरनिर्वाह कसा चालवायचा हा प्रश्न उभा आहे. सध्या हे पडद्यामागचे कलाकार काय करत आहेत? कठीण काळाचा सामना कसा करत आहेत? त्यांच्या भावना त्यांच्याच शब्दांत…

अशी परिस्थिती पहिल्यांदाच!
साधारणपणे 80 सालापासून नाटकांचा कपडेपट विभाग सांभाळतोय. सुरुवातीपासूनच या क्षेत्रातच काम करायचं हे ठरवून टाकलं होतं. मी विरारला एका गावात राहतो. तिथे काही नवं काम हाती घ्यायला अडचण येते. अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली. यापूर्वी एवढा मोठा बंद कधी झालाच नव्हता. सध्या कोरोनामुळे पूर्णपणे घरी आहे. रंगमंच कामगार संघटनेतर्फे जी काही तुटपुंजी मदत मिळाली होती. आर्थिक हातभारही लावला. त्यात कशीबशी गुजराण केली. जमा केलेली थोडीफार शिल्लक होती. त्यातून खर्च करतोय. पण नाटक सुरू होईपर्यंत काय करावं? हा अंधार आहे डोळ्यांसमोर. एक-दोन महिने जरी काम नसेल तरी मी अस्वस्थ व्हायचो. आता तर सहा महिने व्हायला आले. काहीच काम नाही यामुळे नैराश्य आलंय. परिस्थितीला सामोरं जाणं आपलं काम आहे. आमचं हातावरचं पोट आहे. माझ्या डोळ्यांसमोर सध्या काही काम नाही. तरीही जे माझ्या कुवतीनुसार करण्यासारखं असेल तसं काम काही मिळालं तर नक्की करेन. सध्या काही काम मिळतच नाही तर काय करू? – शेखर रोडे, कपडेपट

सांगा कसं जगायचं?
‘अलबत्या गलबत्या, ‘अनन्या’ या नाटकांसाठी केशभूषाकार म्हणून काम करायचे. गेली सहा वर्षं हे काम करतेय. बंदीच्या काळात रंगमंच कामगार संघटनेने खूप मदत केली. आता खर्च भागवण्यासाठी आम्ही नोकरी शोधतोय. एवढे दिवस फक्त रेशनच्या मदतीवर राहू शकत नाही. लाइट बिल, पाणी , मेंटेनन्स या सगळ्याचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न डोळ्यांसमोर आहे. माझा मुलगा दहावीला आहे. त्याचा शाळेचा खर्चही आहे. नोकरीही मिळत नाही. खूप जणांना सांगितलंय. प्रयत्न करतेय. त्यामुळे खूप ताण येतोय. पण कोणत्याही वेळी नाटक सुरू झालं तर पुन्हा नाटकातच काम करेन. कारण माझं रंगभूमीवर खूप प्रेम आहे. सगळ्या मदतींमुळे घर चालत होतं एवढे दिवस. लॉकडाऊनचा सुरुवातीचा काळ खूप कठीण गेला. मदत मिळाल्यामुळे सुरुवातीचे दिवस गेले. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे मनापासून आभार. मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. त्यासाठी भाजी विकायचं ठरवलं होतं किंवा नाश्ता बनवून विकायचं असंही ठरवल, पण आम्ही राहतो त्या ठिकाणी अशा पद्धतीचे काम करण्याची परवानगी नाही. घरापासून लांब कामाला जायचं तर ट्रेन सुरू नाही. प्रवास कसा करायचा? शिवाय रोज वरणभातावर कसं जगायचं? नोकरी लागत नाही? त्यामुळे आता काय करायचं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. – माधुरी जाधव, केशभूषाकार

वय जास्त असल्यामुळे काम नाही
गेल्या 45 वर्षांपासून नाटकांचा सेट उभारण्याचं काम करतोय. कोरोनामुळे घरी बसून आहे. काय काम करायचं तेच कळत नाही. दोन ठिकाणी मुलाखतीला गेलो होतो पण माझं वय जास्त असल्यामुळे काम दिलं नाही.
– उल्हास सुर्वे , सेट कॉण्ट्रक्टर