
>>पुरुषोत्तम कृ. आठलेकर<<
आपल्याकडे चातुर्मास सुरू झाला की, सण, उत्सवांची रेलचेल असते. त्यातूनच साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे ‘दसरा’ या सणाला विशेष महत्त्व असते. कारण घर खरेदी, सोने खरेदी याला विशेष प्राधान्य दिले जाते. घर खरेदी हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि ती आपली मूलभूत गरज असते. त्यासाठी आपण आपल्या उत्पनातील पैसा बचत करून घर घेण्याचे स्वप्न साकारत असतो, परंतु हे स्वप्न साकारण्यासाठी आपण काटकसरीने अनेक तडजोडी करत असतो. अर्थातच त्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. सध्या जरी शासनाची परवडणारी घरे ही संकल्पना असली तरी वास्तवात आणण्यासाठी आपल्याला तारेवरची कसरत लागते ही वस्तुस्थिती आहे. आज वर्तमानपत्र वाचावयास घेतले की, या सण, उत्सवादरम्यान रोज पानभर जाहिराती वाचून आपण चक्रावून जात असतो. कधी कोणाचे लोकेशन आवडते तर कधी कोणाच्या सेवा-सुविधा आवडत असतात, पण हे सर्व पाहत असताना घराच्या किमती आणि इतर चार्जेस पाहता खरोखरीच परवडणारी घरे ही संकल्पना वास्तवात उतरते का ? हाच प्रश्न पडतो. महारेरा या कायद्यांतर्गत या व्यवहारात नक्कीच पारदर्शकता आली हेसुद्धा नाकारून चालणार नाही, परंतु अशा सणासुदीच्या कालावधीत जी काही सवलतीची ऑफर दिली जाते त्याने घरग्राहकाला खरोखरीच किमतीमध्ये दिलासा मिळतो काय? मार्कार्ंटगचा बदलत चाललेला ट्रेंड आणि घरग्राहकाला आकर्षित करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा यात छुप्या मार्गाने ग्राहकाकडून काढला जाणारा पैसा यावरसुद्धा काही निकष, निर्बंध असणे गरजेचे आहे. आज ओपन, स्टिल्ट, कोडियन पार्ंकगच्या माध्यमातून घेतले जाणारे, फ्लोअर राईज, फ्रंट ह्यू, क्लब हाऊस, गार्डनचे विविध प्रकार, त्यांना गोंडस नावे देऊन आणि आयुर्वेद, हर्बल अशी छोटी छोटी उद्याने साकारून त्याचे लाखो लाखो रुपये घेतले जातात ही वस्तुस्थिती आहे. वर्तमानपत्रात फक्त मूळ किंमत दर्शवून अनेकदा ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. वास्तविक पाहता आपण परवडणारी घरे जेव्हा बघत असतो तेव्हा विविध लोकेशनप्रमाणे आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून विचार होणे आवश्यक आहे. कारण घराव्यतिरिक्त पंचतारांकित सेवासुविधा देण्यापेक्षा एक छोटेखानी उद्यान, मोकळी जागा, ज्येष्ठ, लहान मुले यांचा विचार करून योग्य त्या कायदेशीर सेवासुविधा दिल्या तर काही अंशी किमती आवाक्यात येतील. कारण घराचा ताबा घेतल्यानंतर या सर्व वास्तूंचे योग्य त्या पद्धतीने व्यवस्थापन करणे ही जबाबदारी त्या त्या सोसायटीची असते. मग वर दिलेल्या अनावश्यक पंचतारांकित सेवासुविधा हव्यात कशाला, ज्यामुळे आपल्याला सोसायटीचा मेंटेनन्स देणे जड पडते. मग अशा वेळेला खरोखरीच अशी घरे आपल्याला परवडतात काय? अगदी ‘दसरा सण मोठा’ म्हणून आयुष्याची पुंजी घालून आपण मोठय़ा हौसेने आपले नवीन घर बुक करतो आणि ज्या वेळेस असे छुपे चार्जेस आपल्या डोळ्यांसमोर येतात तेव्हा मात्र आपण हतबल होतो. मात्र त्यातूनच नक्कीच आपल्याला दिलासा मिळतो तो प्रधानमंत्री आवास योजनेचा आणि त्यातूनच आपले थोडय़ाफार प्रमाणात आर्थिक बजेट कमी होते. त्यामुळे येणाऱ्या दसरा सणाचे औचित्य साधून आपण आपल्या बजेटप्रमाणे आपले घर घेण्याचे स्वप्न नक्कीच साकारू शकतो.























































