आभाळमाया- धरती आणि भरती

पौर्णिमा, अमावास्या आणि अष्टमीला विशिष्ट वेळेला उधाणाची भरती असते. याचं तिथीनुसार कोष्टक कोळी बांधवांना परंपरेने ठाउैक असतं. प्रत्येक दर्यावर्दा माणसाला पूर्वापार हे ज्ञान आहे. सध्याचे दिवस पावसाचे. कालपासून देशात तसेच राज्यातही उत्तम पर्जन्यवृष्टी होत आहे. त्याचे अप्रूप, कौतुक आणि स्वागत करतानाच नदीकाठच्या शहर, गावातल्या लोकांना त्याचप्रमाणे मुंबईकरांनाही धास्ती वाटू लागते. मुंबई हे सात बेटांचं मिळून झालेलं विशाल बेट आहे. ठाणे शहर आणि वसईपर्यंतचा भाग त्यात येतो. पश्चिमेकडचा अरबी समुद्र आणि गेटवे ऑफ इंडियापासून सुरू होऊन ठाण्यापर्यंत विस्तारलेल्या बॅकबे किंवा खाडी असा सुंदर बॅकबे सॅन फ्रान्सिस्कोचाही नाही असं एकदा एक अमेरिकन सांगत होता.

मात्र गेल्या काही वर्षांत भगच्च भरलेली महानगरं आणि नदीच्या दोन्ही काठांवर पाण्यापर्यंत आलेल्या ठिकठिकाणच्या वस्त्या यामुळे पावसाळय़ात राज्यातल्या अनेक शहरांत पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यात समुद्राकाठच्या शहरातील पाणी तुंबण्याचं गणित सागराच्या भरती-ओहोटीवर अवलंबून असते.

न्यूटनने सिद्ध केल्यानुसार विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये परस्पर गुरुत्वाकर्षण असतं. ज्या वस्तूचं गुरुत्वाकर्षण जास्त त्याच वस्तूचा अंमल दुसऱया वस्तूवर चालतो. म्हणूनच सर्व ग्रहांच्या तुलनेत प्रचंड असलेल्या सूर्याभोवती अख्खी ग्रहमाला फिरते. आपली पृथ्वी त्यातलाच एक ग्रह. हे सगळे ग्रह एका पारडय़ात ठेवले आणि सूर्य दुसऱया पारडय़ात तर सूर्याच्या तुलनेत इतर सर्व ग्रहांचं वजन जेमतेम दोन टक्के भरेल. आता ‘वजन’ म्हणजे मोठय़ा वस्तुमानाचा दुसऱया वस्तूवरचा प्रभाव. पृथ्वीचा आपल्या प्रत्येकावर जो गुरुत्वीय प्रभाव असतो तेच आपलं वजन. वस्तूच्या घनतेवर वजन ठरतं. मोठय़ा आकाराचा कापूस आणि लहान आकाराचं लोखंड यापैकी लोखंडाचं वजन जास्त असू शकेल.

तर हाच सूर्य, पृथ्वी, चंद्र यांच्या परस्पर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव. पृथ्वीवरच्या सुमारे पंच्याहत्तर टक्के असलेल्या जलसाठय़ावर म्हणजे समुद्रावर पडतो आणि त्याला नियमितपणे भरती व ओहोटी येते. आता अष्टमी आणि अमावास्या, पौर्णिमेची दर बारा तासांनी येणारी भरती ‘उधाणाची’ कशी ते पाहू. मग इतर दिवशी काय होतं आणि भरती-ओहोटीचं सोपं पारंपरिक अनुभवावर आधारित गणित कोणतं जाणून घेऊ.

ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रदीप नायक म्हणतात, ‘‘समुद्राला येणाऱया भरती-ओहोटीचं गणित सोपं आणि मनोरंजक आहे. सागरी भरतीचं प्रमुख कारण म्हणजे पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र. चंद्र पृथ्वीच्या ज्या बाजूला असेल त्या बाजूला समुद्राचं पाणी त्याच्या गुरुत्वाकर्षणाने खेचलं जाऊन तिथे भरती येते. गंमत म्हणजे आपल्याला समुद्रकिनारी जेव्हा भरती जाणवते तेव्हा टायडल फोर्समुळे (भरती-ओहोटीचं बल) पृथ्वीवरील बरोबर विरुद्ध बाजूच्या समुद्री पाण्यालाही भरती-ओहोटी असते. म्हणजे मुंबईत समुद्राला पौर्णिमा, अमावास्येच्या दुपारी आणि रात्री 12 वाजता उधाणाची भरती (प्रिंग टाइड) येते तेव्हा आपल्याबरोबर विरुद्ध असणाऱया मेक्सिकोजवळ तशीच भरती-ओहोटी जाणवते.

प्रतिपदा ते पौर्णिमा किंवा प्रतिपदा ते अमावास्या असे चांद्रमासाचे दोन भाग. त्यांना शुक्ल-कृष्ण किंवा शुद्ध-वद्य म्हणतात. यापैकी पौर्णिमा आणि अमावास्येची भरती उधाणाची किंवा सर्वाधिक. अष्टमी ते पौर्णिमा किंवा अमावास्येपर्यंत भरतीचं प्रमाण रोज वाढत जाताना जाणवतं.

पृथ्वी स्वतःभोवती चोवीस तासांत फिरत असल्याने या काळात आपल्याला दोन वेळा भरती-ओहोटी अनुभवास येते. कारण चंद्र एकदा पृथ्वीच्या एका बाजूला तर बारा तासांनी दुसऱया बाजूला असतो. अष्टमीला सर्वात कमी म्हणजे भांगेची भरती असते (नीप टाइड). सागरी भरती-ओहोटीवर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीचाही थोडा परिणाम होतो. त्याचप्रमाणे पृथ्वी व चंद्र दोघंही शेवटी सूर्याभोवतीच फिरत असल्याने सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचाही परिणाम असतोच.

आणखी एक रसप्रद गोष्ट म्हणजे, पृथ्वीवरच समुद्राला भरती, ओहोटी येते तशीच किंचित स्वरूपात जमिनीलाही येते आणि वातावरणालासुद्धा! या सर्व गोष्टी जाणून दर्यावर्दी माणसं प्रवासाचं वेळापत्रक ठरवतात. साधारणपणे चांद्रमासाची जी तिथी असेल त्याच्या पाऊणपट वेळ ही भरतीची असते. पौर्णिमा किंवा अमावास्या या पंधराव्या तिथी. त्याच्या पाऊणपट म्हणजे सकाळ व रात्री बाराची भरती. चंद्र रोज 47 मिनिटे उशिरा उगवतो हे गणित अगदी थोडय़ा फरकाने बरोबर ठरते.

वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे सागराच्या पाण्याची पातळी वाढतेय. पुढच्या काळातील उधाणाच्या भरतीची आताच काळजी करायला आणि घ्यायलाही हवी. कारण निसर्ग त्याचं काम करतच राहणार.

आपली प्रतिक्रिया द्या