
>> वैश्विक
बारा हजार आठशे किलोमीटर व्यासाचा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. सूर्यमालेतल्या या तिसऱ्या क्रमांकाच्या ग्रहावर आपण नसतो तर या ग्रहाचं काहीच बिघडलं नसतं, पण विश्वाचा आवाका जाणणारा प्राणी म्हणून आपल्याला जे समाधान मिळालं ते मात्र लाभलं नसतं. आपल्या पृथ्वीच्या जन्माला अब्जावधी वर्षे झाली म्हणजे साडेचार अब्ज. त्यानंतर कोट्यवधी वर्षांनी सजीव आणि त्याच्याही पलीकडे कोट्यवधी वर्षांनी आपण सुज्ञ माणसं या ग्रहावर निर्माण झाली. तेव्हापासून या संशोधनकर्त्या पृथ्वीची सर्वंकष कृपा आपल्यावर झाली. सूर्याने ऊर्जा दिली आणि पृथ्वीने जगवलं. म्हटलं तर सारंच काव्यमय आहे, विस्मयकारी आहे. परंतु उपजत स्वार्थाच्या नादात आपण पृथ्वीवरच्या वातावरणात प्रदूषणाची प्रचंड भर घातली आहे.
त्याचे दुष्परिणाम अनेक आहेत. ते आताच जाणवतायत. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ म्हणा किंवा ‘क्लायमेट चेंज’ म्हणा, तो अनेक अडचणी वाढवतोय. सध्या अमेरिकेचा एक भाग उत्तर ध्रुवाकडून येणाऱ्या शीत लहरींनी एवढा गारठलाय की, शिकागोसारखी शहरं गोठली. आपल्याकडेसुद्धा दिल्लीत बर्फ पडून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट आणि हिमकणांची चादर पसरली. बातम्यांमध्ये हे वाचता बघताना गंमत वाटत असेल तर ते खरं आकलन नव्हे. कोणताही मोसम, मग तो हिवाळा असो की उन्हाळा, सुखद असायला हवा. आपल्या उपखंडात तर पावसाळा हा तिसरा संपूर्ण ऋतू असतो. तसा जगात कुठेच नसतो. परंतु ‘नेमेचि’ येणाऱ्या या ऋतुचक्रात बदल घडतायत. ते पीकपाण्यापासून प्राणिमात्रांच्या शरीरप्रकृतीपर्यंत सगळय़ाच गोष्टींवर विपरीत परिणाम करतायत.
नैसर्गिक उत्पात काय पृथ्वीवर पूर्वी होत नव्हते? असा प्रश्न विचारला जातो. होतच होते पण त्याचेही दुष्परिणाम त्या त्या काळातल्या लोकांना भोगावे लागलेच होते. महापूर आणि भूकंप वगैरे उत्पातांनी संपन्न संस्कृती गाडल्या गेल्याची उदाहरणं मोहेंजोदारोसारख्या उत्खननानंतर प्रकर्षाने लक्षात आली. एकेकाळी वनश्री असलेल्या आखाती देशांत वाळूचं साम्राज्य पसरलं. आपल्याकडे राजस्थानच्या थर वाळवंटाची गोष्ट घ्या. अशा वालुकावादळातच काही नद्या लुप्त झाल्या. त्यामुळे निसर्गाच्या विराट प्रकोपाला तोंड देण्याची प्रभावी यंत्रणा आजही नाहीच. फक्त कृत्रिम प्रदूषणाने त्यात आणखी भर घालायची की पृथ्वी स्वच्छ ठेवायची? हा प्रश्न आहे.
हवामान बदलाचं नैसर्गिक चक्र प्रदूषणाने अधिक गतिमान झालं ते गेल्या शतकभरात. सुरुवातीला त्याची कल्पनाच आली नाही. आजच्या प्रगत म्हणवणाऱ्या देशात विविध शोध लागले आणि जग बदललं हे खरंच, पण या प्रगतीचं उपकथानक किंवा ‘बायप्रॉडक्ट’ ठरलं ते प्रदूषण. त्याला आळा घालण्याचा विचारच मुळी खूप उशिरा सुरू झाला. आता परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे. कार्बन डायऑक्साईड, सल्फरसारखे वायू काय किंवा प्लॅस्टिकसारखी ‘अमर’ वस्तू काय, कोणता घोळ घालतील हे सुरुवातीला कळणं शक्य नव्हतं, पण कळल्यावर वळण्यातही बराच काळ गेला. परिणाम? परिणाम तर रोजच दिसतोय. फुप्फुसाचे विकार वाढतायत, असह्य गारठा गोठवतोय वगैरे. या वातावरण बदलाचा आणखी एक महत्त्वाचा दृश्य परिणाम समोर आलाय तो म्हणजे समुद्राची निळाई वाढतेय. नीलरंगाच्या विकिरणामुळे आकाश निळं दिसतं तसंच महासागराचं पाणीही. समुद्रात तळाशी असलेल्या अनेक वनस्पती, शेवाळ वगैरे गोष्टींवर पाण्यात पिचलेल्या सूर्यकिरणांचा काय परिणाम होतो यावर तिथल्या पाण्याचा रंग ठरतो. पाण्याला स्वतःचा रंगच नाही. पृथ्वीवरच्या उष्ण कटिबंधापाशी असलेलं सागराचं पाणी त्यातील फायटोप्लँक्टन या सूक्ष्म शैवालासारख्या सजीवांमुळे प्रकाशाचं विकिरण होऊन निळं दिसतं. हे प्रमाण क्लायमेट चेंजमुळे वाढतंय आणि सागराचा निळेपणासुद्धा याउलट ध्रुवीय प्रदेशातील सागरतळी असलेल्या सूक्ष्म वनस्पतींवर सूर्यकिरणांचा जो परिणाम होतो त्यातही बदल किंवा वाढ होऊन तेथील पाणी हिरवट रंगाचं दिसेल असं सांगितले जातं. सागराच्या पाण्याचा निळा, करडा किंवा हिरवट रंग आपल्याला कन्याकुमारीसारख्या तीन समुद्रांच्या संगमावर पाहायला मिळतो याचं कारण सूर्यप्रकाश आणि समुद्री सूक्ष्म जीव.
माणूस अवकाशात गेला आणि त्याला गोलाकार तसंच अथांग अवकाशात ‘तरंगणाऱ्या’ पृथ्वीचं यथार्थ दर्शन घडलं. पृथ्वीवरून त्याने शुभ्र चंद्र, पिवळसर सूर्य आणि लाल मंगळ पाहिला होता, परंतु युरी गागारिन यांनी प्रथमच पृथ्वी अंतराळातून न्याहाळली आणि त्यांना या ग्रहाची निळाई प्रकर्षाने जाणवली. पृष्ठभागावर 75 टक्के पाणी असलेला दुसरा ग्रह आपल्या ग्रहमालेत नाही. वसतीयोग्यही भूभाग सापडत नाही. निसर्गानेच आपली पृथ्वी सजीवसमृद्ध केली आहे. तिचं निळं रूप वातावरणातील बदलांमुळे गहिरं होतंय. ते संपूर्ण अनुभवायचं तर अवकाशात जायला हवं. नाहीतरी इलॉन मस्क चंद्र, पृथ्वी प्रदक्षिणेपुरत्या ‘स्पेस फ्लाईट’च्या योजना आखतच आहे. पुढच्या पिढीला नक्कीच निळी पृथ्वी अवकाशातून पाहता येईल.





























































