आभाळमाया – ‘टायटन’चा नकाशा

485

आपल्या चंद्रावरचं वातावरण अगदी विरळ आहे. तो आपल्यापासून खगोलीय भाषेत अगदी हाकेच्या अंतरावर आहे म्हणून तिथे वारंवार जाण्याची, पाणी शोधण्याची आणि वसाहत करण्याची स्वप्नं माणूस पाहतोय. कृत्रिम वसाहती उभारून तिथपर्यंत अन्नधान्य पुरवणं हीसुद्धा फार कठीण गोष्ट नाही. त्यासाठी वेगवान यानांपासून ते लोंबकळत्या तारा लावून लिफ्ट करण्यापर्यंतच्या अनेक शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. कधी एकदा चंद्रावर पर्यटक घेऊन जातोय असं एलॉन मस्क यांच्या स्पेस-एक्स कंपनीला वाटतंय तर जगात त्यांनाही अनेक स्पर्धक तयार होताहेत. पृथ्वीवर ऍग्रो टुरिझम हा जसा व्यवसाय झालाय तसाच उद्या अवकाशात ‘स्पेस टुरिझम’ची चलती असणार आहे.

चंद्रापलीकडचा मंगळही त्यादृष्टीने अनेक अंतराळ संस्थांना खुणावतोय. आणि त्याही पलिकडे? अर्थातच व्यावसायिक नजरा लागलेल्या आहेतच. मंगळापलीकडच्या गुरू -शनी या वायूंनी वेढलेल्या ग्रहांवर तर वस्ती शक्य नाही. परंतु त्यांच्या अफाट गुरुत्वाकर्षणाने धरून ठेवलेल्या शेकडो उपग्रहांपैकी किंवा त्यांच्या चंद्रांपैकी एखादा चंद्रावर वस्ती करणं शक्य आहे का याची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी तिथे आधी सजीवाचा शोध घेतला जातोय.

‘गुरू’ला सुमारे सत्त्याहत्तर चंद्र आहेत. नव्या संशोधनानंतर ही संख्या वाढू शकते. पूर्वी गुरूला सात किंवा तेरा चंद्र असल्याचं ऐकून आश्चर्य वाटायचं. आता त्याच्या वाढत्या चंद्रसंख्येबद्दल काही वाटेनासं झालंय. गुरूपलीकडचा, सुंदर कडी असलेला ग्रह शनी. शनीलाही अनेक चंद्र आहेत. त्यापैकी टायटन आकाराने सर्वात मोठा. त्याचं शनीपासून अंतर आपल्या चंद्राच्या 11 पट आहे. शनीपासून त्यांचं कमीतकमी अंतर सुमारे बारा लाख तर जास्तीत जास्त अंतर पावणेतेरा लाख किलोमीटर एवढं असतं.

पृथ्वीच्या दिवसांच्या तुलनेत टायटनला शनीभोवती फेरी मारायला 15 दिवस आणि 22 तास लागतात. तेवढय़ाच काळात तो स्वतःभोवतीही फिरत असल्याने आपल्याला जशी आपल्या चंद्राची कायम एकच बाजू दिसते त्याप्रमाणे शनीपृष्ठावरून टायटनच्या एकाच बाजूचं दर्शन होत राहतं. टायटनचा व्यास सुमारे 5150 किलोमीटर इतका आहे. ग्रहमालेतील सर्वांत मोठा उपग्रह गुरूचा असून ‘गॅनिमिड’ असं त्याचं नाव. त्याचा व्यास 5262 किलोमीटर भरतो.

25 मार्च 1655 या दिवशी डच खगोलतज्ञ क्रिस ह्युनिन्स यांनी शनीच्या या उपग्रहाचा शोध लावला. गॅलिलिओ यांनी 1610 मध्ये गुरूचे उपग्रह शोधले. त्यापासून स्फूर्ती घेऊन ह्युजिन्स यांनी शनीच्या उपग्रहाचा धांडोळा घ्यायला सुरुवात केली आणि त्यात त्यांना यश मिळालं. त्यानंतर 1673 ते 1686 या काळात जिओवॅनी कॅसिनी यांनी शनीचे आणखी उपग्रह शोधून काढले व शनीच्या कडय़ांमधील अंतराचाही अभ्यास केला.

युरेनस ग्रह शोधणाऱया विल्यम हेर्शेलचा मुलगा जॉन हर्शेलही खगोल अभ्यासक होता. त्याने 1847 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे टोक असलेल्या ‘केप ऑफ गुड होप’ येथून निरीक्षण करून शनीच्या सात उपग्रहांना नावं दिली तेव्हापासून टायटन हे नाव प्रचलित झालं.

आता मानवी वसाहतीच्या दृष्टीने टायटन हा आपल्या ग्रहमालेतील असा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. तेथे वातावरण असून त्यात पृथ्वीप्रमाणेच नायट्रोजनचे (नत्र वायूचे) प्रमाण भरपूर आहे. 1980 मध्ये व्हॉयेजर-1 या यानाने पहिल्यांदा टायटनचं जवळून दर्शन घेतलं.

याशिवाय ‘टायटन’वर वस्ती करायचं म्हटलं तर तिथलं कडाक्याचं शीतल वातावरण आणि मिथेनचा ढग याचा उपसर्ग होईल. त्यामुळे माणूस काही तेथे जाऊन राहू शकणार नाही. परंतु तिथे सूक्ष्म सजीव असू शकतात असं टायटनच्या अलीकडच्या नकाशावरून वाटत आहे. टायटनच्या पृष्ठभागाच्या नकाशात मोठा सपाट प्रदेश तसंच द्रवरूप मिथेनची तळी आणि गोठलेल्या सेंद्रिय गोष्टी आढळून आल्या आहेत.

शनीच्या दिशेने विशेष संशोधनासाठी पाठवलेल्या कॅसिनी यानाने जमा कलेल्या डेटावरून हे निष्कर्ष काढले आहेत. टायटनवरील कर्बाधिष्ठत (कार्बनबेस्ड) संमिश्रातील शीतल वातावरणात राहणारे अतिसूक्ष्म सजीव असू शकतात. टायटनवर बर्फाचे थर असून त्याखाली समुद्राचे पाणी असू शकते.

जमीन, पाणी, विशिष्ट वायूंची संयुगं, संमिश्रण यातून सजीव पोषक असं वातावरण निर्माण झालं असेल तर शनीचा हा उपग्रह ग्रहमालेतील जीवसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. पृथ्वी वगळता पृष्ठभागावर द्रवरूप वस्तू असलेला टायटन ही एकमेव जागा आहे. म्हणूनच त्याच्याकडून संशोधकांच्या बऱयाच अपेक्षा आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या