
>> संदीप वाकचौरे
महाराष्ट्र सरकारने शिक्षण हक्क कायद्यात दुरुस्ती करून इयत्ता पाचवी आणि आठवीला विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन नापास करण्याबाबत तरतूद केली आहे. जनमताचा रेटा म्हणून निर्णय घेतला गेला असला तरी जगातील उत्तमोत्तम म्हणून जे असेल त्याचा स्वीकार करण्यासाठीची पावले टाकणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. तीन–चार टक्के विद्यार्थी आज मागे पडतील. त्यांना मागे सारत आपल्याला पुढे जाता येईल, पण ही मुले मागे टाकणे म्हणजे त्या कुटुंबाला आणि त्या मुलाच्या पुढच्या पिढीला पुन्हा आर्थिक दारिद्रय़ाच्या खाईत लोटणे आहे.
शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन सुमारे एक तप पूर्ण झाले आहे. 1 एप्रिल 2010 ला कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्याच्या अस्तित्वानंतर 20 ऑगस्ट 2010 ला राज्यात मूल्यमापनाच्या प्रक्रियेत बदल करून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुरू करण्यात आले. कायद्यानुसार विद्यार्थी नापास न करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे राज्यात साधारणपणे तीन-चार टक्के विद्यार्थी नापास होत होते ते विद्यार्थी पुढील वर्गात जाण्यास मदत झाली. विविध कारणांनी मागील 13 वर्षे जे विद्यार्थी पुढच्या वर्गात जात आहेत, त्यांच्या शिकण्याला त्याकरिता मदत होत होती, पण मागे पडणारे विद्यार्थी कायद्यातील तरतुदीप्रमाणे पुढच्या वर्गात जात असल्याने गुणवत्ता घसरत होती, असा आक्षेपही घेतला जात होता. विद्यार्थी नापास केले तर गुणवत्ता सुधारते असा दावा केला जातो. यामागे काय तर्क अथवा शास्त्रीय संशोधन आहे का? आता शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थी नापास करण्याची भूमिका घेतल्याने पुन्हा विद्यार्थी नापास होतील.
आज संपूर्ण जग मूल्यमापनाच्या बदलाच्या दिशेने पावले टाकत आहे. त्यासाठी विविध पर्यायांचा शोध घेत आहेत. बालक आणि तरुणाई परीक्षेच्या तणावातून मुक्त व्हावी, शिकणे अधिक स्वातंत्र्यात आणि भीतीमुक्त व्हावे, शिक्षण प्रक्रियेची घोकमपट्टीतून कायमची सुटका व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. आपणही शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करत बदलाच्या दिशेने पाऊल टाकले होते, पण आता पुन्हा जुन्याच वाटांनी चालावे लागणे म्हणजे व्यवस्था नापास होते आहे असे मानायचे का? जुन्याच वाटांचा प्रवास म्हणजे आपण परिवर्तनाची वाटा चालण्यास नकार देण्यासारखे आहे. चांगल्या धोरणाचा परिणाम दिसण्यासाठी व्यवस्थेतही परिवर्तनाची गरज असते. शिक्षणातील नवे आणि चांगले काही पचनी पडण्यास वेळ लागतो हेही लक्षात घ्यायला हवे.
केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करत विद्यार्थी पास किंवा नापास करण्यासंदर्भातील निर्णय संबंधित राज्य सरकारने घ्यावा, असे सूचित केले. कायद्यातील दुरुस्ती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने इयत्ता पाचवी आणि आठवीला विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन नापास करण्याबाबत तरतूद केली आहे. परीक्षा घेतली जाणार याचे काहींनी स्वागत केले आहे, पण देशात परीक्षा या एकाच गोष्टीने लाखो मुले तणावाखाली येतात. दरवर्षी देशात 4 ते 5 हजार विद्यार्थी परीक्षा आणि निकालामुळे आत्महत्या करतात. आता परीक्षा सुरू करण्यात आल्याने शिक्षणाची गुणवत्ता पुन्हा साध्य करता येईल का? हा खरा प्रश्न आहे. शिक्षण हक्क कायद्यामुळे खरेच शिक्षणाची गुणवत्ता हरवली होती का? याला काही शास्त्रीय संशोधनाचा आधार आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे.
प्राथमिक स्तरावर विद्यार्थी नापास होत नसल्याने शिक्षणाची गुणवत्ता घसरली असल्याचा दावा केला जात होता. ढकलगाडीमुळे काही पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. हा पालकवर्ग आवाज असणारा आहे. पण समाजात ज्या पालकांना आवाज नाही असेही पालक आहेत आणि त्यांचीच मुले व्यवस्थेत नापास होताहेत. कालपर्यंत या मुलांची गळती आणि स्थगिती होत होती. मुळात ज्या समाजातील पहिलीच पिढी शिक्षणाच्या प्रवाहात दाखल झाली आहे त्या पिढीने गुणवत्तेच्या भाषेसोबत चालावे अशी अपेक्षा तरी कशी करावी, हा प्रश्न आहे. शिक्षणाची गुणवत्ता ही आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचा एकत्रित परिणाम असतो. घरातील साक्षरतेचा परिणाम मुलांच्या शिकण्यावर होत असतो. त्यामुळे साधारणपणे ज्या घरात दारिद्रय़ आहे त्या घरातील विद्यार्थी मागे राहतो. ही समस्या सर्वदूर आहे. त्यात मुलांचा काय दोष? परिस्थितीशी दोन हात करत यातील काही विद्यार्थी यश मिळवतात. मात्र आता जे विद्यार्थी नापास होतील ते पुन्हा शाळेशी जोडले जातील का? हा प्रश्न आहे.
आपल्याकडे देशातील उच्च श्रीमंत आणि दारिद्रय़ाच्या खाली असलेल्या कुटुंबातील सर्वच मुलांसाठी एकच अभ्यासक्रम आहे. गरीबांच्या मुलांना असलेल्या सुविधा आणि श्रीमंताच्या मुलांना असलेल्या सुविधा यात अंतर आहे. अशा वेळी मुलांच्या आकलनावर त्याचा परिणाम होणार हे साहजिक आहे. अशा वेळी सर्वच मुलांचे मूल्यमापन एकाच फुटपट्टीने करून कसे चालेल?
शिकण्याची प्रक्रिया कशी सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी मुळात मूल्यमापन करण्यात येते. आपल्याकडे सुरू केलेल्या परीक्षा पद्धतीनुसार केवळ वार्षिक परीक्षेच्या आधारे विद्यार्थी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण ठरविले जात होते. यात जे चुकले त्यांना पुन्हा शिकण्यासाठीची संधी मिळत नव्हती. एखादा घटक आला नाही म्हणजे तो पुन्हा येणारच नाही, असे गृहीत धरले जात होते. लेखी परीक्षेत विद्यार्थ्याने जी माहिती प्राप्त केली आहे आणि लेखी परीक्षेत प्रतिसाद नोंदवला आहे त्याच्या आधारे संपादणूक संख्यात्मकदृष्टय़ा नोंदवली जात होती. शिकण्यातील अडथळा जाणून पुन्हा पुनर्भरण करून शिकण्याची संधी मिळत नव्हती. नापास करून एका अर्थाने विद्यार्थ्याला नाकारले जात होते. त्यांचा आत्मविश्वास हरवला जात होता. यामुळे विद्यार्थी भावनिकदृष्टय़ा तुटला जाण्याची शक्यता अधिक होती. त्यातून विद्यार्थी शाळाबाह्य, गळती होण्याचा धोका अधिक होता. ते घडतही होते. लेखी परीक्षा पद्धती ही व्यवस्थेसाठी अत्यंत सोपी गोष्ट आहे, पण त्याचा तोटा विद्यार्थ्यांना अधिक होतो.
शासनाने घेतलेला निर्णय हा लोकाग्रहास्तव घेतला आहे. लोकशाही व्यवस्थेत लोकांचा आवाज ऐकावा लागतो. त्यामुळे जनमताचा रेटा म्हणून निर्णय घेतला गेला असला तरी जगातील उत्तमोत्तम म्हणून जे असेल त्याचा स्वीकार करण्यासाठीची पावले टाकणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. तीन चार टक्के विद्यार्थी आज मागे पडतील. त्यांना मागे सारत आपल्याला पुढे जाता येईल. पण ही मुले मागे टाकणे म्हणजे त्या कुटुंबाला आणि त्या मुलाच्या पुढच्या पिढीला पुन्हा आर्थिक दारिद्रय़ाच्या खाईत लोटणे आहे. गिलबर्थ नावाच्या अर्थतज्ञाच्या मते, दारिद्रय़ नष्ट करण्याचा शिक्षण हाच एकमेव राजमार्ग आहे. आज हा राजमार्ग आपण हिसकावून तर घेत नाही ना? गुणवत्ता ढासळली आहे असे म्हणावे तर दहावी, बारावीच्या निकालात त्याची घसरण होताना दिसत नाही. इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्येही टक्का घसरत नाहीये. त्यामुळे मूल्यमापनाची प्रक्रिया मुळात उत्तम आहे. ती अधिक प्रभावी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्या सुधारणेवर भर देण्याचा उपाय अधिक परिणामकारक ठरेल. मुळात आपल्याकडे 1.10 लाखांच्या आसपास शाळा आहेत आणि 7.5 लाखांपेक्षा अधिक शिक्षक आहेत. इतकी मोठी व्यवस्था एकदम बदलणार नाही. त्या बदलासाठी पावले टाकली तरी पुन्हा माघारी फिरण्याची वेळच येणार नाही.
(लेखक ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आहेत.)


























































