स्पायडरमॅन – एकनाथ आव्हाड

549

>> ज्योती कपिले

सुप्रसिद्ध कथाकथनकार, बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांची नुकतीच अ. भा.बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने परभणी येथे संपन्न होणाऱ्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. एकनाथ आव्हाड हे गेल्या 27 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षकपदी कार्यरत असून महापालिकेच्या शाळेचेच ते एकेकाळचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या उत्कृष्ट साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी त्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्काराने 2016 मध्ये सन्मानित केले गेले आहे. सरांनी बालसाहित्यात प्रयोगशील लिखाण केलेले आहे. उदाहरणार्थ, त्यांच्या बालकवितांमध्येच जोडाक्षरविरहीत बालकविता, गोष्टीरूप बालकविता, बडबड गाणी, कुमार कविता, काव्यकोडी हे त्यांनी हाताळलेले प्रकार वाखाणण्याजोगे आहेत. आज सरांच्या कित्येक पुस्तकांवर मुलांचीच चित्रे विराजमान आहेत हे एक त्यांच्या पुस्तकांचे वैशिष्टय़च म्हणावे लागेल. सरांच्या अनेक पुस्तकांचे अंधांसाठी ब्रेल लिपीत रूपांतर झालेले आहे. अनेक पुस्तकांचे हिंदी व इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध आहेत.

आव्हाड यांची आजपावतो बालकथा, बालकविता, चरित्र, नाटय़छटा, काव्यकोडी अशा स्वरूपाची 25 पुस्तके प्रसिद्ध असून त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेलेय. त्यातील काही ठळक पुरस्कार पुढीलप्रमाणे ः महाराष्ट्र शासनाचा वा. गो. मायदेव राज्य पुरस्कार; मसाप, पुणे यांचा वि. वि. बोकील राज्य पुरस्कार; मुंबई मराठी साहित्य संघाचा व मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणेचा राज्यस्तरीय पुरस्कार; महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाचा सृष्टिमित्र पुरस्कार तसेच एकूण बालसाहित्य सेवेसाठी सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगावचा व मसाप, जुळे सोलापूरचा राज्यस्तरीय पुरस्कार असे विविध साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत आणि सोशल मीडियावर त्यांना अनेक फॉलोअर आहेत. एकनाथ आव्हाड यांचे पाचशेहून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम झालेले असून त्यांना साने गुरुजी उत्कृष्ट कथाकथनकार म्हणून सन्मान प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या पाठय़पुस्तक मंडळावर ते सदस्य होते. सध्या सुलभ भारतीच्या सहावीच्या पाठय़पुस्तकात सरांचा धडा व बालभारतीच्या दुसरीच्या पाठय़पुस्तकात सरांच्या बालकवितेचा समावेश केला गेला आहे. अमराठी शिक्षणाच्या अभ्यासक्रमात सरांच्या पाच बालकवितांचा समावेश आहे. शिवाय आकाशवाणीच्या असंख्य कार्यक्रमांसाठी त्यांनी लिखाण केले आहे. दूरदर्शनच्या वेगवेगळ्या चॅनल्सवर लहान मुलांसाठी त्यांचे कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत. एकनाथ आव्हाड यांच्या एकूण साहित्यावर आधारित समीक्षणांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली असून ‘एकनाथ आव्हाड यांच्या बालकविताः स्वरूप आणि शोध’ या ग्रंथाचे ज्येष्ठ लेखक सदानंद पुंडपाळ यांनी संपादन केलेले आहे आणि ‘एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्यः बाल समीक्षकांच्या नजरेतून’ या ग्रंथाचे संपादन प्रा. डॉ. सुरेश सावंत व डॉ. मथू सावंत या उभयतांनी केलेले आहे. एक शिक्षक, सुभाषनगर एज्युकेशन सोसायटीचे शाळा समिती अध्यक्ष ते अ.भा. बालकुमार साहित्य संमेलन अध्यक्ष हा प्रवासच आव्हाड सरांबद्दल बरंच काही बोलून जातो.

आपली प्रतिक्रिया द्या