लेख – एल्विस नावाची जादू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

जगातल्या मोजक्या आणि बऱयाच गाजलेल्या व्यक्तिमत्त्वांचा वेध घेण्याच्या प्रयत्नात नेमकी सगळी व्यक्तिमत्त्वे येतीलच असं नाही. खरं तर आपल्या देशातील कितीतरी व्यक्तिमत्त्वं जागतिक पातळीवर अगदी इतिहासकाळापासून ज्ञात आहेत. परंतु विसाव्या शतकाची मर्यादा ठेवली तर गत सहस्रकाच्या अखेरच्या शतकात, वेगाने वाढलेलं दळणवळण आणि त्यातून निर्माण झालेली सांस्कृतिक देवाण घेवाण यातून अनेक विदेशी व्यक्तिमत्त्वंही आपल्याला ठाऊक झाली. पुढेही होतच राहतील. आपल्याकडची कर्तृत्ववान मंडळीही जगावर आपली मुद्रा उमटवतील. हे आदानप्रदान सुरूच राहणार.

तर या वेळी प्रसिद्ध अमेरिकन गायक एल्विस प्रिस्लेचं नाव डोळय़ासमोर येण्याचं कारण म्हणजे, मध्यंतरी आम्हा मित्रांमध्ये (साठीच्या आसपासच्या) जुन्या हिंदी सिनेगीतांवर चर्चा चालली होती. त्यात काही जणांना खूपच गती आहे. गीत, गीतकार, संगीतकार आणि गायक असं सगळं एखाद्या गाण्याबद्दल एका श्वासात सांगू शकणारेही रसिक याच चर्चेत होते. मग विषय निघाला तो पाश्चात्त्य संगीताचा आपल्या सिने संगीतावर कसा नि किती परिणाम झाला वगैरे. आपल्याकडच्या संगीताचा नि वाद्यांचा प्रसार पश्चिमेतही झाल्याची उदाहरणे आहेतच, पण गप्पा करताना राजेंद्रकुमार या एकेकाळच्या ‘ज्युबिली कुमार’ म्हणून गाजलेल्या नटाच्या ‘झुक गया आसमाँ’मधील एक गाणं आठवलं ते असं – ‘कौन है जो सपनों में आया, कौन हैं जो दिल में समाया, लो झुक गया आसमाँ भी, इश्क मेरा रंग लाया.’ याच गाण्यावर आमच्या तरुण वयात एका ट्रेकिंगला एका मित्राने या चालीचं मूळ असलेलं एल्विस प्रिस्लेचं 1962 मधलं गाणं म्हणून दाखवलं होतं. ‘हू मेक्स माय हार्ट लाइक थंडर, हू मेक्स माय टेम्परेचर राइज’ या एल्विसच्या गाण्यावरच महंमद रफी यांनी राजेंद्रकुमारसाठी गायलेले ‘कौन है जो…’ हे गाणं बेतलेलं आहे. प्रिस्लेच्या गाण्यातील ‘मार्गरिटा’ शब्दाच्या जागी ‘ओ प्रिया’ असे शब्द आहेत. हिंदी गाणं 1968 मधलं तर एल्विसचं गाणं 1962 मधलं आहे. हिंदी गाणं ऐकताना ते कुठल्या इंग्लिश गाण्यावरून घेतलंय असं वाटत नाही. इतकं त्याचं ‘रूप’ हिंदी आहे. तसंही मोझार्ट या जर्मन प्रसिद्ध संगीतकाराच्या सिम्फनी-40 टय़ूनवरून सलील चौधरी यांनी ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा’ हे गाणं दिलंय आणि ते आपलंच वाटतं. ‘झुक गया आसमाँ’चं संगीत शंकर जयकिशन यांचं.

यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीताची भाषा अशी वैश्विक असते. त्याला भाषिक, सांस्कृतिक, प्रादेशिक परिमाणं आणि परिणाम असतोच. प्रत्येक परदेशी, परभाषी किंवा इतर देशातल्या संगीतावर आपल्याकडचं गाणं चपखल बसेलच असं नाही, पण काही धून सार्वत्रिक होऊन जातात. एल्विस प्रिस्ले हा ‘किंग ऑफ रॉक ऍण्ड रोल’ म्हणून ओळखला जायचा. अवघ्या बेचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्याने पाश्चात्य संगीतविश्व आणि हॉलीवूडही गाजवलं. 1954 मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी त्याचं ‘म्युझिक करियर’ सुरू झालं. त्या वेळी निर्माता सॅम फिलिप्सला आफ्रिकन – अमेरिकन संगीत रसिकांना सादर करायचं होतं. स्कॉटी मूड, बिल ब्लॅक यांच्यासह एल्विसने गानमंच गाजवायला सुरुवात केली. त्याचं ‘हार्टब्रेक हॉटेल’ शो आला. गिटार वाजवणारा तरुण प्रिस्ले इलेक्ट्रिक गिटार घेऊन समूहासमोर उभा राहिला की तरुण-तरुणी त्याच्या स्वरांनी चिंब बेभान व्हायचे. वर्षभरात या गाण्याच्या कोटी रेकॉर्डस् घरोघर पोहोचल्या. त्याच्या रिहर्सलचेही व्हिडीओ आता पाहायला मिळतात. त्याचा परफॉर्मन्स पाहणं हासुद्धा रसिकांना वेगळा अनुभव असायचा. असं स्टेज पुढे अनेकांनी गाजवलं. त्यात मायकल जॅक्सनही होता. आता तर अनेक ग्रुप जगभर वाजत गाजत असतात.

1953 मध्ये प्रिस्लेची पहिली रेकॉर्ड निघाली ‘दॅट हर हॅपीनेस’ हे त्याच्या पहिल्यावहिल्या गाण्यांपैकी. लवकरच त्याला त्या काळात तुलनेने नव्या असलेल्या टेलिव्हिजनवर प्रसिद्धी मिळू लागली. परंतु त्याचं श्रोत्यांसमोरचं थेट सादरीकरण रसिकांना अक्षरशः वेड लावणारं असायचं. त्याचा सहकारी मूर याने म्हटलं होतं की, ‘यू एन्ट नथिंगवर हाऊन्ड डॉग’ सुरू केलं की श्रोते नुसता धुमाकूळ घालायचे. इतका की पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागायचा. पाश्चात्य ‘कॉन्सर्ट’ आणि आपल्याकडच्या मैफलीतला हाच फरक होता. तो सांस्कृतिक, सांगीतिक दोन्ही होता. आपल्याकडेही रात्र रात्र चालणाऱया मैफली होत्याच, पण श्रोत्यांचा प्रतिसाद संयत असायचा. अर्थात पाश्चात्त्य गाण्यांचं स्वरूपही तरुणाईला उचंबळून लावणारं असायचं आणि त्यांच्या कलाकारांचा स्टेजवरचा वावरही. त्याच्या सांगीतिक दौऱयात तो हिंदुस्थानात आला होता की ठाऊक नाही, पण अभिनेता देव आनंदने स्वतःच्या ‘गँगस्टर’ सिनेमाच्या बाबतीत बोलताना सिनेसृष्टीच्या शंभर वर्षांत आपण स्वतःच पन्नास वर्षे काम केल्याचं सांगितल्यानंतर एल्विस प्रिस्लेच्या 8 जानेवारीला साठाव्या जयंतीच्या सुमारास म्हणजे 1995 मध्ये म्हटलं होतं की, ‘एल्विस फारच लवकर गेला हे दुर्दैव. पण त्याने संगीतात एक ‘पंथ’ निर्माण केला. त्याचा ‘रॉक ऍण्ड रोल’ पाहिला तेव्हा अवघं थिएटर नाचत होतं. एल्विस त्याच्या गाण्यातून आपल्यातच आहे हे खरंच आहे. एल्विससारखे कलाकार त्यांच्या कलेतून अमर होतात. त्यांना स्थळकाळाची मर्यादा नसते.