आभाळमाया – इंग्लंडचा ‘स्पायडर’ रोव्हर

392

चंद्राच्या अगदी जवळ जाऊन सेफ लॅण्डिंग न झाल्याने आपण पाठवलेल्या चांद्रयान-2 वरील ‘अवतरक’ (लॅण्डर) विक्रम आणि चांद्रवाहन (रोव्हर) प्रज्ञान या दोन्हींची अपेक्षित कामगिरी आपल्याला पाहता आली नाही. त्याची हळहळ प्रत्येक हिंदुस्थानीला आणि त्याहीपेक्षा जास्त इस्रोच्या शास्त्रज्ञांना वाटली. अनेक वर्षांची अथक मेहनत एका क्षणात लयाला जाताना पाहणं हे त्या प्रकल्पासाठी दिवसरात्र खस्ता खाल्लेल्या संशोधकांना निराश करणारं ठरतं. अर्थात अंतराळातील अनेक अगम्य गोष्टी आणि कितीही अचूक बनवलेल्या यंत्रातील छोटीशी उणीव असं घडवू शकते याची जाणीवही त्यांना असते. त्यामुळे आपले पुढचे स्पेस प्रोग्रॅम ठरल्यानुसार कार्यान्वित होतील. गगनयान भरारी होईल. हिंदुस्थानी अंतराळयात्री आपल्या देशी यानातून अंतराळात जाईल. चांद्रयान-3 मध्ये आवश्यक त्या सुधारणा करून त्याचंही प्रक्षेपण घडेल आणि सूर्यशोध घेणार्‍या आदित्य यानासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाला जाईल यात शंकाच नाही.

चंद्र आणि मंगळाच्या बाबतीत आपल्याला पहिल्याच प्रयत्नात अपूर्व यश लाभलं. हीसुद्धा जागतिक अंतराळ संशोधनाच्या इतिहासातली लक्षणीय गोष्ट होती. आता मात्र अनेक देश चंद्राकडे डोळे लावून बसले आहेत. अंतराळ स्पर्धेत विविध देशांच्या अंतराळ संस्थांबरोबरच अमेरिकेतील खासगी उद्योजक अवकाश भरार्‍या मारण्याची सिद्धता करत आहेत. त्यापैकी एलॉन मस्क यांच्या ‘स्पेस-एक्स’विषयी आपण माहिती घेतलीच आहे.

आता युनायटेड किंगडम (युके) म्हणजेच ब्रिटिशांना चंद्रावर आपलं कोळ्याच्या (स्पायडर) चालीने चालणारं ‘रोव्हर’ पाठवण्याची उर्मी आली आहे. त्यांनी त्याची पूर्ण तयारीही केलीय. 2021 मध्ये हे चांद्रवाहन चांद्रपृष्ठावर चालताना दिसेल.

या यानाचं वैशिष्टय़ म्हणजे हा रोबोटिक रोव्हर आतापर्यंत चंद्रावर गेलेल्या रोव्हरपेक्षा खूपच लहान आहे. अमेरिकेने 1971-72 मध्ये पाठवलेली चांद्रवाहनं एखाद्या ट्रक्टरसारखी दिसणारी आणि माणसाने चालवण्याची होती. त्या तुलनेत इंग्लंडचा हा ‘स्पायडर’ फारच लहान असेल. त्याचा आकार आपल्या ‘प्रज्ञान’पेक्षाही छोटा आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिका, रशिया, चीन या देशांनी चंद्रावर पाठवलेल्या रोव्हरना चाकं होती. आपलं प्रज्ञानंही चाकांवरच फिरलं असतं, परंतु ब्रिटिश स्पायडर रोव्हरला भिंतीवरच्या कोळ्यासारखे चार पाय आहेत. चित्र पाहताच त्याचा ‘स्पायडर’ आकार लगेच पटेल. हा रोव्हर चंद्रावर यशस्वीपणे फिरू लागला तर ब्रिटन चांद्रवाहन चालवणारा चौथा देश ठरेल. ‘युके’च्या नव्यानेच सुरू झालेल्या ‘स्पेसबीट’ या कंपनीने या स्पायडर-रोव्हरची निर्मिती केली असून काही दिवसांपूर्वीच लंडनच्या एका तंत्रप्रदर्शनात त्याची प्रतिकृती दाखवण्यात आली. या कंपनीचे संस्थापक पाल्वो असं म्हणतात की, चंद्रावर फेरफटका मारून संपूर्ण मानवजातीच्या दृष्टीने तेथे महत्त्वाचं काय आहे याचं निरीक्षण करण्यात येईल. या रोव्हरला स्पायडरसारखे का होईना ‘पाय’ असल्याने चाकांच्या कृत्रिम वाहनापेक्षा तो एखाद्या सजीवासारखा ‘चालताना’ दिसेल.

गेल्या मे महिन्यात ‘नासा’ने ऍस्ट्रोबोटिक्स आणि अन्य दोन कंपन्यांना चांद्रयान बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. चंद्रावर उतरणारं ‘अवतरक’ आणि ‘चांद्रवाहना’ची निर्मिती त्यातून अपेक्षित होती. ‘नासा’ने या कंपनीच्या यानातून अनेक उपकरणं चंद्रावर पाठवायचं ठरवलंय. तसंच इतर काही देशांची उपकरणंही (पे-लोड) त्यावर असू शकतील. हा रोव्हर चंद्रावरील ‘सी ऑ सेरेनिटी’ म्हणजे प्रशांत सागराच्या भागात उतरेल. बहुधा 2021 च्या जुलै महिन्यात हा ‘स्पायडर’ चंद्रावर चालताना दिसेल. अवघ्या दीड किलो वजनाचा हा स्पायडर यशस्वीरीत्या भ्रमण करू लागल्यावर त्यातील उपकरणे ठरल्यानुसार चांद्रपृष्ठाचा डेटा (विदा) गोळा करतील. या रोव्हरला सौर शक्तीवर चालणार्‍या बॅटरीमधून ऊर्जा मिळत राहील. त्यावरील दोन कॅमेरे त्याच्या कामगिरीचे सेल्फीसुद्धा घेतील. चंद्रावरील एकेकाळच्या ज्वालामुखीच्या घळींमधून (लाव्हा टय़ूब) फिरताना ‘स्पायडर’ नवी माहिती मिळवेल असं त्याच्या निर्मात्याला वाटतं.

‘स्पायडर मॅन’ या हॉलीवूडच्या फॅन्टॅसीपटांमधून माणसासारखा स्पायडर तंतुमय जाळ्याद्वारे कसे पराक्रम करतो हे दाखवलंय. आता इंग्लंडचा एक रोबो लॅण्डर खर्‍या स्पायडरसारखा चंद्रावर चालणार आहे. सार्‍या वैज्ञानिक जगाचं लक्ष त्याच्याकडे लागलंय.

आपली प्रतिक्रिया द्या