लेख – स्वच्छ इंधनासाठी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी  

 ‘हिरवळ आणिक पाणी, जेथे स्फूर्ती मजला गाणी’ अशी एका कवितेतील ओळ आठवली आणि या दोन्ही गोष्टींचा स्वच्छ, सुंदर आविष्कार पाहून ‘गाणी स्फुरण्याचा’ काळ वेगाने निसटत चाललाय की काय, असं वाटून गेलं. कारण सध्या पावसाळय़ात सर्वत्र नयनरम्य हिरवळ आणि ‘धबाबा तोय कोसळे’ असे मोसमी धबधबे ठायी ठायी दिसत असले तरी उद्याच्या वसुंधरेचं म्हणजे या शतकाअखेरीच्या पृथ्वीचं चित्र कसं असणार आहे? पाऊस आताच काही ठिकाणी इतका कोसळतोय की, पूर्वी कधीही पूर न अनुभवलेली नगरं पाण्याखाली जातायत. वादळ-वारा उग्र रूप धारण करून वस्त्या आणि फळबागा उद्ध्वस्त करतोय. असा प्रकार उभ्या आयुष्यात पाहिला नव्हता असं वयस्कर मंडळी सांगतायत. सागरी लाटांची गाज अनेकदा भयसूचना देत घोंगावतेय.

त्यातच ‘आंतरराष्ट्रीय हवामान बदला’चा अभ्यास करणाऱ्या संस्थेने दिलेला अहवाल, एकूणच मानवी वस्तीची झोप उडवणारा आहे. या शतकाच्या अखेरीस पृथ्वीवरच्या सागर जलाची मर्यादा वाढून ‘किनारा तुला पामराला’ असलेले महासागर किनाऱयांची मर्यादा ओलांडून भूमी गिळंकृत करणार आहेत. त्यात जगातल्या मुंबईसह बारा शहरांचा मुख्यत्वे समावेश असून धोका लाटालाटांनी वाढतोय. चौपाटय़ा, किनारपट्टीच्या वस्त्या ठिकठिकाणी कायमच्या पाण्याखाली जातायत. वास्तविक आकस्मिक ‘पूर’ नदीला येतो, कारण नदीच्या ‘वरच्या’ भागात खूप पाऊस झाला की काठावरच्या पुढच्या गावात पाऊस नसला तरी पुराचे लोंढे येऊ लागतात. समुद्राचं तसं नाही. भरती-ओहोटीचं गणित व्यवस्थित सांभाळत तो कोटय़वधी वर्षे शांतपणे आपल्या मर्यादेत उसळत असतो, परंतु गेल्या शतकभरात त्यालाही पूर येऊ लागला आहे.

त्याला एक महत्त्वाचं कारण आहे पृथ्वीच्या वातावरणात वाढलेला कार्बन. तो सागरी पाण्यात विरघळून निर्माण होणाऱ्या आणि रासायनिक प्रदूषणामुळे वातावरणाचं तापमानही वाढत चालल्याने ध्रुव प्रदेशातला बर्फ वितळून समुद्राच्या पाण्यात मोठी वाढ होतेय. आता हे पाणी जाणार कुठे? ते किनारपट्टय़ाच गिळणार. याची आता कुठे सुरुवात झाली आहे. पाहू त्याकडे केव्हा तरी सावकाश असं म्हणत निवांत बसणे अंतिमतः घातक ठरणार हे आपल्या पुढच्या पिढय़ांसाठी.

अशा या भयावह पार्श्वभूमीवर काही चांगलंही घडतंय. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ कमी व्हावे आणि हवासुद्धा प्रदूषणमुक्त शुद्ध असावी यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याचा एक भाग म्हणजे ‘क्लीन फ्युएल’ किंवा स्वच्छ, प्रदूषण न करणारं इंधन. त्यावर जगात आता खूपच आशादायी प्रयत्न सुरू आहेत. अशा बायोफ्युएलविषयी जागृती करणारा दिवस ‘डिझेल’चे संशोधन रुडाल्फ डिझेल यांच्या नावे साजरा केला जातो. कुणी म्हणेल की पेट्रोल-डिझेलही प्रदूषण करतंय मग हा दिवस डिझेलच्या नावे का? तर याच डिझेलची खाद्यतेलावरही चालणारं मोटारीचं इंजिन बनवलं होतं म्हणून. बायोफ्यूएल म्हणजे पर्यावरणाला साथ देणारं इंधन.

पेट्रोल आणि पेट्रोलपासून निर्माण होणारे डिझेल, गॅस, डांबर असे अनेक पदार्थ नैसर्गिक आहेत, परंतु त्यांचा किंवा अगदी नैसर्गिक दगडी कोळशाचा इंधन म्हणून वापर करताना कार्बन आणि इतर रासायनिक वायू वातावरणात मोठय़ा प्रमाणात मिसळतात. त्यातून सामान्य माणसांना श्वासाचा त्रास होण्यापासून ग्लोबल वॉर्मिंगपर्यंतचे अनेक त्रास उद्भवतात. संकट घरात येत नाही तोपर्यंत बेफिकीर राहण्याच्या प्रवृत्तीने गेल्या पन्नास वर्षांपासून याची चर्चा होऊन इशारे दिले जात असूनही त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं गेलं. विकास की पर्यावरण असा वाद नाहक निर्माण झाला. पर्यावरणस्नेही विकास अवघड नाही, पण त्याकडे दुर्लक्ष झालं खरं.

‘कार्बन न्यूट्रिलिटी’ म्हणजे विविध प्रकारच्या विशेषतः पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनाचा जैव इंधनाचा प्रभावी पर्याय मिळाला तरच ते शक्य आहे. कारण यापुढे वेगवान वाहने आणि यंत्रवापर कमी करणं कठीण, मात्र त्याने वातावरण प्रदूषित होऊ नये असं उद्दिष्ट हवं. हिंदुस्थानात सध्या 83 टक्के पेट्रोलची आयात करावी लागते आणि त्यासाठी सुमारे दहा लाख कोटी रुपये खर्च होतात. हा सगळा पैसा परकीय चलनात द्यावा लागत असल्याने आपली गंगाजळी (परकीय धन शिल्लक) आटते. आपल्याकडे बायोफ्यूएलचा वापर वाढवला तर किमान 40 टक्के पैसा वाचेल. शिवाय प्रदूषणाला आळा बसेल. या ‘क्लीन’ इंधनासाठी शेतातील कापणीनंतर एरणारे पाचट, उसाच्या मळीपासून बनवलं इथेनॉल, मुद्दाम वाढवलेलं शिशिष्ट प्रकारचं शेवाळ, जलपर्णी किंवा अन्य बायोमास देणाऱ्या वनस्पती आणि अगदी घराघरातलं खरकटंसुद्धा स्वच्छ इंधनासाठी उपयुक्त ठरतं. याशिवाय किमान आठ महिने तीव्र सूर्यप्रकाश लाभणाऱ्या आपल्या देशात सौरऊर्जा मोठय़ा प्रमाणावर निर्माण करून त्यावर वाहनं चालवता येतील. विजेवर चालणाऱ्या वाहनांचे किंवा हायड्रोजनपासून स्वच्छ इंधन निर्माण करण्यावर भर देऊन फक्त पाण्यापासून ऊर्जा मिळू शकेल. याशिवाय शेण किंवा तत्सम गोष्टींतून तयार होणारा मिथेनही ऊर्जेत रूपांतरित करता आला तर बरेच प्रश्न सुटतील. जागतिक पातळीवर एकूण इंधनापैकी एक चतुर्थांश जैव इंधन वापरण्याचं उद्दिष्ट 2050 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प आहे. मधे  कुठले विकल्प न येता तो साध्य झाला तर पुढच्या पिढय़ा आपोआप ‘स्वच्छ’ पर्यावरणाचा विचार आणि वापर करू लागतील.

[email protected]