परीक्षण – संवेदनांची अभिव्यक्ती

>> सुजाता राऊत

आजचं युग हे अस्वस्थतेचं युग आहे. संवेदनशील मनाला या काळात जगताना अनेक प्रश्न पडतात. मनीष तपासे यांचा `अस्वस्थ मनाच्या किनाऱयावर’ हा कवितासंग्रह अशाच अस्वस्थ युगाची स्पंदनं टिपणारा कवितासंग्रह आहे.

सध्याचा काळ संभ्रमाचा आहे. जगण्याविषयी त्यातल्या मूल्यांविषयी, धारणांविषयी जे संभ्रम निर्माण झाले आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी शोधलेली उत्तरे आणि त्यातून पुन्हा निर्माण झालेले प्रश्न हे सगळे इथे अभिव्यक्त झाले आहे. कवीची शैली संवादी व प्रवाही आहे आणि त्यामागे चिंतन आहे. यमकाचा प्रभावी वापर अनेक कवितांमधून जाणवतो.

कळत नाहीये मला भारतमातेवर काही छान छान लिहायला घेता सीमेवरच्या धारातीर्थी जवानांचे रक्त येते ओघळत अनेक कवितांमधून मनाला अस्वस्थ करणारे प्रश्न कवी विचारत आहे.

मराठी कवितेला दीर्घ परंपरा आहे. संतकाव्याची विशेष भूमिका होती. त्यानंतर रविकिरण मंडळाची कविता सौंदर्यवादी धारा जपणारी होती. साठच्या दशकातील चळवळींचे अधिष्ठान असलेली कविता ज्यामध्ये प्रेम, निसर्ग, तारे, वारे यांना स्थान होते. पण नव्वदीनंतरची जागतिकीकरणाचे वारे सुरू झाल्यानंतरची कविता अनेक अर्थाने बदलत गेली. आणि आता 2020 नंतरची ही कविता भवतालातील बदलांना प्रतिसाद देणारी कविता आहे. कवितेतील भाषा ही जगण्यातली भाषा आहे. ती मुद्दाम घडवलेली नाही. मनीष तपासे यांच्या कवितेतही ते विशेषत्वाने जाणवते.

कवितांमध्ये भावनांचा अचूक वेध असेल आणि शब्दांचा भडिमार नसेल तर ती हृदयापर्यंत पोहोचते. कारण त्या कवितेचा अवकाश तिला मिळत असतो. अशाच काही सुंदर प्रेम कवितासुद्धा या संग्रहात आहेत.

दूरवर दिसणार तळं

तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी जमलेल्या

अश्रूंच्या थेंबांइतकंच छोटं वाटत होतं

मावळतीला जाणाऱया सूर्याला पाहून

तुझा धरला हात, वर आभाळ दाटत होतं

अशा अतिशय तरल कवितासुद्धा या संग्रहात वाचायला मिळतात. ही कविता स्वतची लाट घेऊन येते आणि वाचकाला पुढे नेते. `तुझ्या लेखी मात्र’, `एवढं मात्र खरं’, `धुकं’ या सर्व कविता उत्कट भावना व्यक्त करणाऱया आहेत. या संपूर्ण मुक्तछंदाला एक अंतर्गत अशी लय आहे. कवीला सादरीकरणाचे अंग असल्यामुळेही असेल यातील काही कविता सादरीकरणासाठी अतिशय योग्य अशा आहेत.  काही कवितांमध्ये स्त्राr-मनाचे चित्रण अतिशय समर्थपणे केलेले आहे. `पणती’ ही कविता एका मुलीच्या नजरेतून लिहिली आहे. ती मुलगी आईला सांगते-

आई तुझ्याशिवाय पणती पेटवताना

किती तरी वेळा विझली वात

जाणवलं ग मलाही,

माझ्याशिवाय दिवा लावताना

तुझाही थरथरत असेल हात

`रांगोळी’ या कवितेमध्ये कवीने आईचं सुंदर चित्र रेखाटलं आहे. आईने जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मधनं शिक्षण नाही घेतलं, पण तिला रंगांची भाषा कळायची, इंद्रधनुच्या माळेतील अशा पद्धतीने आईचं चित्र रेखाटलं आहे. `छप्पन वर्षांनी कळतं’ ही वडिलांवरची कवितासुद्धा अशीच कृतज्ञ भाव व्यक्त करणारी व भावुकतेकडे जाणारी आहे.

रोपटय़ाचं होतं झाड

झाडही मग मातीकडे वळतं

वडील किती ग्रेट असतात

हे छप्पन वर्षांनी कळतं

यातील अनेक कवितांना इंग्रजी नावे आहेत. `ब्रेकिंग न्यूज’, `मानवी बॉम्ब’, `एक्साईटेड हार्मोन्स’, `मायलेज’ अशा अनेक कविता आहेत. पण शीर्षके इंग्रजीत आहेत म्हणून ती नवीन युगाची कविता ठरत नाही; तर त्यामध्ये आधुनिक भाव संवेदन टिपलेलं आहे हे महत्त्वाचे आहे. मूल्यसंघर्षाचा आशय हादेखील अनेक कवितांमधून दिसतो. `संवाद बुजुर्ग कवी मित्राशी’, `तो : एक चिंतन’ अशा अनेक कविता उल्लेखनीय आहेत. `उडी’ नावाची कविता आयुष्यावर भाष्य करणारी आहे. गंभीर आशय त्यातून व्यक्त होतो.

पुस्तकाचं मुखपृष्ठ कवितांचा आशय प्रतिबिंबित करणारे आहे. सागर किनाऱयावर उभा राहून कवी समुद्राच्या लाटांकडे बघतो आहे. त्या लाटांमधले निनाद जणू त्याच्या मनात उमटत आहेत आणि त्या सागरतळाशी खोल जाण्याची ऊर्मी त्याच्या मनात आहे. मनातल्या असंख्य प्रश्नांचा वेध आणि शोध त्याला घ्यायचा आहे. ठाण्याच्या सृजनसंवाद प्रकाशनाने अतिशय उत्तम पुस्तकनिर्मिती केलेली आहे. सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी या कवितेची पाठराखण करताना म्हणतात, `या कवीच्या कविता जगण्याच्या कोलाहलातून आलेल्या आहेत. या कविता दाहक अनुभवांचे विविध पैलू घेऊन शब्दात प्रतिबिंबित झालेल्या आहेत.’

कवी एके ठिकाणी म्हणतो, `वास्तवाशी लढता लढता आपला जाळ होतो…’ वर्तमान युगातील भाव संवेदन टिपणारी ही कविता अनुभवायलाच पाहिजे.

अस्वस्थ मनाच्या किनाऱयावर

कवी ः मनीष तपासे

प्रकाशन ः सृजनसंवाद प्रकाशन, ठाणे

पृष्ठे ः 80 ह मूल्य ः 250 रुपये