मराठी सारस्वताचा सन्मान

1497

>> डॉ. विजया वाड

वि.स. खांडेकरांची ययाति. मराठी सारस्वताला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारी कादंबरी. प्रेमाचे असंख्य रंग दादासाहेबांच्या लेखणीतून उलगडतात.

मराठी अस्मितेचा मानदंड अशी ‘ययाति’ची घोषणा हिंदुस्थान सरकारने केली आणि वि. स. खांडेकर यांना या कलाकृतीसाठी ‘ज्ञानपीठ’ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सन 1974 या वर्षात जाहीर झालेला मराठीला लाभलेला पहिला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार 1976 मध्ये सर्वश्री वि. स. खांडेकर यांना बहाल केला गेला. आपल्या साहित्यसेवेसाठी त्यांना ‘पद्मभूषण’ किताबाने गौरविले गेले.

यात चार प्रमुख पात्रे आहेत. ययाति, देवयानी, शर्मिष्ठा आणि कच! ज्याला ‘संयम’ हा शब्दच ठाऊक नाही असा कामुक आणि लंपट, वासनेने गच्च भरलेला ययाति, जिचा प्रेमभंग झाला आणि त्याचा तो विषारी दंश जिने आयुष्यभर मनीमानसी जपला ती अंतरी विदीर्ण झालेली देवयानी, जिला शरीरधर्मापलीकडे जाऊन वासनातृप्तीच्या पलीकडचे प्रेम करता येते अशी शर्मिष्ठा आणि विवेक, संयम, दृढ ध्येयवाद या त्रिगुणांचा संच ज्याचे मनी वसला आहे तो कच! चार पात्रे, त्यांचे जीवन, वादळी संघर्ष या कादंबरीत वाचताना मन उलून निघते, हृदय विदिर्ण होते.स्वतः वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर म्हणतात, ‘‘ही कादंबरी म्हणजे ययातिची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे, शर्मिष्ठsची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे. s सारे विशेष लक्षात घेऊनच वाचकांनी ती वाचावी.’’ आता कथानकाकडे वळू. प्रथम पुरुषी निवेदन हे या कादंबरीचे वैशिष्टय़ वाचकांना कादंबरीशी बांधून ठेवते. हस्तिनापूरच्या नहुष महाराजांच्या पोटी जन्माला आलेला ययाति आपली कहाणी सांगतोय. राजाच्या पोटी जन्मला म्हणून गादीवर बसला. यात कर्तृत्वापेक्षा भाग्याचाच भाग अधिक नाही का! जन्मदात्या आईने आपले रूप कोमेजू नये म्हणून कलिका’ नावाची दूधआई ठेवली याचे दुःख ययातिला होते. यति नावाचा मोठा भाऊ हे घर कायमचे सोडून निघून गेला हे जेव्हा कळते तेव्हा त्याचे मन ठणकते. तो संन्यासी झाला म्हणून आईस कमालीचे दुःख वाटते. तेव्हा छोटा ययाति वचन देतो, ‘‘आई, मी कधी संन्यासी होणार नाही. त्याला गुरू चांगले लाभले. लोखंडाच्या कांबीगत शरीर तयार झाले. उत्सवात आडदांड घोडय़ावरून फेकला गेलेला ययाति आईच्या हृदयाची शकले करतो. तिने जेवण सोडलेले असते असे अलका नावाची त्याची बालपणीची सवंगडी नि आताची सेविका सांगते. तिजबरोबरचा पहिला स्त्र्ााr-स्पर्श वाचकांना खिळवून टाकतो. नंतर गाजलेला अश्वमेध यज्ञ. त्यांच्या घोडय़ाला फार थोडय़ा राज्यांत विरोध होतो. या यज्ञाच्या फिरस्तीत भेटलेला, ऋषी झालेला यति! निरोप घेतानाचे यतिचे शब्द काळजात रुततात. ‘ययाति, आज ना उद्या तू राजा होशील, सम्राट होशील, 100 अश्वमेधही करशील; पण एक गोष्ट विसरू नकोस. जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही.’ त्यानंतर अंगिरस मुनी या दिग्विजयी पुत्राची मागणी करतात त्याच्या पित्यापाशी देव-दानव युद्धात विजय मिळावा म्हणून! श्रेष्ठ सन्मान! ऋषिपुत्र कचाची भेट अंगिरस गुरूंच्या आश्रमातच होते. कचाला प्राप्त झालेल्या संजीवनी विद्येचा उल्लेखही येथेच येतो. मध्येच आश्रमात मुकुलिकेसंगे प्रेम प्रकरण होते. नहुष महाराजांचा मृत्यू ययातिस राज्याचा सम्राट बनवतो.

कचावर अनुरक्त असलेली ऋषिकन्या देवयानी तो न मिळाल्याने जखमी असते. ही खरे तर वृषपर्वा महाराजांच्या पदरी असलेल्या एका भिक्षुकाची मुलगी! पोहण्याच्या शर्यतीत शर्मिष्ठा जिंकते खरी, पण त्यावरून युद्ध पेटते. कारण चुकून देवयानीचं अंशुक शर्मिष्ठा नेसते. भांडाभांडीत देवयानीस शर्मिष्ठा विहिरीत ढकलते. अन् राजा ययाति तिला बाहेर काढतो. प्रेम होते नि शुक्राचार्यांची कन्या महाराणी होते. ययातिची पट्टराणी. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात हेच खरे. शर्मिष्ठा देवयानीची दासी होते. केवढा हा दैवदुर्विलास! हिचा मुलगा सिंहासनावर बसेल ही शर्मिष्ठsच्या बाबतीत भविष्यवाणी एक ज्योतिषी करतो. देवयानीचे मन घुरले जाते. एक क्षत्रिय राजकन्याच शर्मिष्ठा, पण दुर्दैवाने दासी झाली देवयानीची!
देवयानीशी ययातिशी पटणे शक्य नसते, इतकी ती अहंकारी असते. क्षत्रियाने मद्य प्यायचे नाही तर काय प्यायचे, या ययातिच्या प्रश्नावर युद्ध पेटते. धर्मपत्नी झालेली देवयानी की निःशुद्ध प्रेम करणारी शर्मिष्ठा? पत्नीच्या हट्टापायी मद्य सोडावे का? सारेच यक्षप्रश्न!

अलकेला जहाल विष देऊन त्या प्रेम प्रकरणाचा काटा काढणारी आई आणि ययातिच्या मधून एक विषप्रवाह वाहू लागतो, कटुतेचा. एकदा ययातिने घेतलेले ऋषीचे रूप… शर्मिष्ठsशी झालेले मीलन… तिला दिवस जाणे हा भाग फार बहारीचा झाला आहे.कचाशी भगिनीचे नाते जुळलेली शर्मिष्ठा परत परत वाचावीशी वाटते. शर्मिष्ठsला अशीच कटांच्या, वेदनांच्या जंजाळातून पुत्रप्राप्ती होते. एक फार सुंदर क्षण वाचायला मिळतो. महाराजांनी बाळाच्या गालावर जेथे ओठ टेकले तेथेच आपले ओठ जेव्हा शर्मिष्ठा ठेवते तेव्हा शृंगार आणि वात्सल्य यांचा अनुभव घेते.काळ फार वेगाने पुढे सरकतो. वार्धक्याची, मृत्यूची, जीवनातल्या अतृप्तीची भीती राजा ययातिचे काळीज चिरीत जाते. त्याला कळतच नाही की, हस्तिनापूरचा सम्राट असा विव्हल, असुरक्षित का झालाय? ययातिने राजवाडा सोडलाय. पण अशोकवनातही सुख लपाछपी का खेळतेय. माणूस खरेच प्रवाहपतित असतो का? आपले वार्धक्य पुरुला देऊन स्वतः परत तरुण झालेला ययाति भयावय वाटतो! मनात असंतोष पैदा करतो, नि पित्याच्या इच्छेखातर त्याला तारुण्य बहाल करणारा पुरु मनभर पसरून इतका मोठा होतो की, तो मनात मावत नाही. पुरुला कुशीत घेऊन धाय मोकलून रडणारी शर्मिष्ठा वाचवता वाचवत नाही. पण हे इतिहासातले-पुराणातले सत्य आहे ना! भाऊसाहेब, आपण जिंकलात, लेखक म्हणून अमर झालात! आपणास आमचा साष्टांग दंडवत!

ययाति
लेखक – वि. स. खांडेकर
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ- 320, किंमत – 2952.

– vijay[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या