लेख – मुद्दा – बदलत्या तंत्रज्ञानाचा ‘ठसा’

>> महेश कोळी, संगणक अभियंता

दोन माणसांचे चेहरे, आवाज किंवा अन्य गुण एकमेकांसारखे असू शकतात; परंतु जगातील कोणत्याही व्यक्तीच्या बोटांचे ठसे दुसऱया व्यक्तीच्या ठशांशी जुळत नाहीत. म्हणूनच तंत्रज्ञानातसुद्धा फिंगरप्रिंट सुरक्षित मानण्यात आली आहे आणि नव्याने येत असलेल्या तंत्रज्ञानात त्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर करण्यात येत आहे.

पूर्वी स्वाक्षरीला पर्याय म्हणून किंवा गुन्हा शोधून काढण्यासाठीच बोटांच्या ठशांचा वापर केला जात असे; परंतु आजच्या काळात फिंगर प्रिंट नसेल तर डिजिटल इंडियासारख्या मोहिमेची कल्पना करणेही अवघड आहे. आज जर फिंगर प्रिंट्स नसतील तर बँकेत एक दिवससुद्धा कामकाज करता येणार नाही. फिंगर प्रिंट्स नसतील तर आधारकार्ड, रेशन कार्ड सर्वकाही निरर्थक आहे. अगदी कागदाच्या तुकडय़ासारखे निरर्थक! एवढेच नव्हे तर, फिंगर प्रिंट्सशिवाय आपले फोनही आता काम करणार नाहीत, कारण बहुतांश सेलफोन आता फिंगर प्रिंटच्या इशाऱयावर ओपन होतात. फिंगर प्रिंटची गरज लागत नाही अशी सरकारी योजना आता क्वचितच पाहायला मिळेल. ऑफिसात हजेरी लावण्यापासून डोअर ओपनरपर्यंत अनेक फंक्शन फिंगर प्रिंट्स स्कॅनरवर अवलंबून आहेत. पण फिंगर प्रिंटला एवढे महत्त्व आले कसे?

जगातील प्रत्येक माणूस आपल्या स्वतंत्र हस्तरेषा घेऊन जन्माला येतो. प्रत्येकाची फिंगर प्रिंट वेगवेगळी असते. जगातील कोणत्याही दोन व्यक्तींच्या फिंगर प्रिंट्स एकसारख्या असत नाहीत. अगदी एकमेकांसोबत जन्माला आलेल्या जुळय़ा भावंडांच्याही फिंगर प्रिंट्स एकमेकांपेक्षा वेगळय़ा असतात. गुन्हेगाराने कितीही चलाखी दाखविली तरी तो आपल्या फिंगर प्रिंट्स बदलू शकत नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूनंतरसुद्धा जोपर्यंत बोटे अस्तित्वात असतात म्हणजे, त्यावरील कातडी शाबूत असते तोपर्यंत माणसाच्या फिंगर प्रिंट्स जशाच्या तशा राहतात. यासंदर्भात आणखी एक रंजक माहिती अशी की, रेषांचे हे ठसे केवळ हाताच्या बोटांपुरते मर्यादित नसतात, तर तळवे आणि तळपायांवरील रेषाही प्रत्येकाच्या वेगवेगळय़ा असतात.

फिंगर प्रिंट्सच्या बाबतीत एक गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे. ती म्हणजे, फिंगर प्रिंट्स खराब झाल्या तरी त्या पुन्हा जशाच्या तशा तयार होतात. उदाहरणार्थ, हाताला जखम झाल्यामुळे किंवा सातत्याने भांडी घासण्यामुळे, वीटभट्टीवर विटा बनविण्याचे काम केल्यामुळे हाताची त्वचा खराब होऊ शकते. या कारणामुळे फिंगर प्रिंट्स अंधुक होत जातात. काही वेळा त्या पूर्णपणे गायबही होतात. परंतु जेव्हा व्यक्ती ही कामे करणे थांबवेल तेव्हा बोटांवरच्या रेषा पुन्हा होत्या तशा परत येतात. अगदी जशा जन्माच्या वेळी होत्या तशाच या रेषा पुन्हा बोटावर उमटतात.

फिंगर प्रिंट्स किंवा बोटाचे ठसे आणि त्यांचा अभ्यास आपल्या भारतीय हस्तसामुद्रिक भविष्य गणनेत हजारो वर्षांपासून सुरू आहे असे मानले जाते. परंतु सुमारे 2000 वर्षांपूर्वी चीनमध्ये बोटांच्या ठशांचा वापर एखाद्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी केला जाऊ लागला. तथापि, सध्याच्या फिंगर प्रिंट सिस्टमचा जन्म 1858 मध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे सर विलियम जेम्स हर्शेल यांच्या प्रयत्नांमधून हिंदुस्थानात झाला. जेम्स हर्शेल हे त्या काळात बंगालच्या हुगळी जिह्याचे जिल्हाधिकारी होते. एखाद्या व्यक्तीची कायदेशीर ओळख पटविण्यासाठी फिंगर प्रिंट्सचा वापर करणारे जेम्स हर्शेल हे पहिलेच अधिकारी ठरले.

त्यानंतर गुह्याच्या ठिकाणी सापडलेल्या बोटांच्या अव्यक्त ठशांवरून म्हणजे ‘लेटेन्ट प्रिंट्स’वरून गुह्याचा तपास करणे सोपे होते हा विचार डॉ. हेनरी फाल्ड्स यांनी दिला. घटनास्थळावरील कोणतीही वस्तू, उदाहरणार्थ खुर्ची, कप, टेबल, ग्लास आदींवर असलेले बोटांचे ठसे दिसत नाहीत. म्हणजेच त्या ‘लेटेन्ट प्रिंट्स’ असतात. माणसाची स्थायी स्वरूपात ओळख पटविण्याच्या दृष्टीने हा एक मोठा शोध होता. त्यानंतर या शोधाला प्रसिद्ध इंग्रज शास्त्रज्ञ सर फ्रान्सिस गिल्टन यांनी शास्त्रीय मजबुती प्रदान केली. त्यानंतर बंगालचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक सर एडवर्ड रिचर्ड हेनरी यांनी खान बहादूर अजिजुल हक आणि रायबहादूर हेमचंद्र बोस या दोन अधिकाऱयांच्या मदतीने बोटाच्या ठशांचे म्हणजेच फिंगर प्रिंट्सचे वर्गीकरण करण्याची एक प्रणाली तयार केली. जगात पहिला फिंगर प्रिंट ब्यूरो सन 1897 मध्ये कोलकात्याच्या रायटर्स बिल्डिंगमध्ये स्थापित झाला. या इमारतीत आजही बंगाल सरकारचे सचिवालय आहे. हिंदुस्थानचा फिंगर प्रिंट ब्यूरो आता केंद्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. त्याचे प्रमुख कार्यालय राजधानी दिल्लीत आहे. या सर्व गोष्टींमधून असे लक्षात येते की, फिंगर प्रिंट ही माणसाची ओळख शाबित करणारी गोष्ट आहे. त्यामुळेच तिचा वापर आजमितीस जागोजागी केला जात आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या