
>>दिलीप जोशी
सात जूनला मृग नक्षत्राच्या साक्षीने पावसाची हजेरी हा वर्षानुवर्षांचा अनुभव गेल्या काही वर्षात डळमळला. कारण एकूणच निसर्गचक्राने वेगळंच रूप धारण केलं. पाणी हवं तेव्हा दुष्काळ आणि नको तेव्हा अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला. त्यातच गेल्या वर्षीपासून कोविडच्या अभूतपूर्व साथीने ठाण मांडलं. कधी कमी कधी जास्त असे कोरोनाचे जीवघेणे खेळ सुरूच आहेत. साऱ्या जगाचं अर्थचक्र थांबवून अनेकांच्या हातचं काम या महासाथीने काढून घेतलं. रिकामपणाची निराशा आणि खिशात नाही पैसा अशा स्थितीत सामान्य माणूस दिवस कंठत राहिला. त्याची स्वतःची जिद्द आणि सरकारी मदत अशा उपायांमधून आला दिवस ढकलायचा असं सुरू झालं.
या सगळय़ा आपत्तीकाळातही गेल्या हंगामात शेतकरी मात्र कष्ट करून आपलं शिवार फुलवत राहिले. त्यांच्या कष्टाला सर्वांनीच दाद द्यायला हवी. परिणामी पीकपाणी चांगलं आलं. कुठे दुष्काळ तर कठे ‘निसर्ग’ वादळाचा तडाखा पचवत बळीराजा ठामपणे शेतात उभा राहीला. हा अन्नदाता सर्वार्थाने सुखी व्हायला हवा. केवळ ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणून भागणार नाही तर त्यासाठी प्रयत्नही झाले पाहिजेत. अर्थात सरकार आणि प्रशासनाला त्याची जाणीव असेलच.
आता पुन्हा नवं पाणी बरसतं आहे. 9 जूनला हा लेख लिहीत असताना खिडकीबाहेरचं आकाश ढगांनी गच्च भरलंय. ‘नभ उतरू’ आलंय. मोठी झाडं सचैल न्हाऊन स्वच्छ झाली आहेत. परवा सहज शिंतडलेल्या चार थेंबांचं अमृत पिऊन गवताची पाती नव्या उत्सुकतेने डोकं वर काढतायत. कालपरवापर्यंत उन्हाने तापून वेगवेगळय़ा जमिनीवर हिरवळ उमटली आहे आणि चार दिवस तुफानी पावसाचा अंदाज आहे.
हे दर वर्षीचंच चित्र. त्यात नवीन काय असं कोणी म्हणू शकेल, पण मग रोजच्या उगवत्या सूर्यात तरी नवीन काय असतं? तरीही पहाट प्रसन्न वाटतेच ना? तसंच या पहिल्या पावसाचं. त्यातून निर्माण झालेला मातीचा गंध किंवा फुललेली हिरवळ. मनाची मरगळ दूर करते. शतधारांनी पाणी बरसत, वाऱ्यासंगे धारा डोळू लागल्या की निसर्गकवीची प्रतिभा आणि प्रतिमा मन मोहून टाकते.
मात्र, यंदा शाळा अजून तरी सुरू झालेल्या नाहीत. कोविडने अनेक विद्यार्थ्यांचं दुसरं शैक्षणिक वर्षही कुरतडलंय पण ‘फिजिकल डिस्टन्सिंगला पर्यायच नसल्याने कुणाचाच इलाज नाही. त्यामुळे नवी पुस्तकं, वहय़ा आणि त्यांचा कोरा गंध नाही. नव्या गणवेशाची गंमत नाही. छत्री, रेनकोट सावरत दप्तर म्हणजे हल्लीच्या भाषेत स्कूलबॅग सांभाळत वर्ग गाठण्याची लगबग नाही. यावर्षी कोणते वर्गशिक्षक असतील याविषयीची चर्चा नाही. आणि मुख्य म्हणजे परस्परांच्या खोडय़ा काढून चाललेली मौजमस्तीही नाही. सभोवतीच्या निसर्गाने शाळेचे रूप आपोआप मिळणारं शिक्षणही नाही. अभ्यासक्रम कसेबसे पूर्ण होतीलही पण आधी वर्णन केलेल्या गोष्टींचा क्रम खंडित झाला तो झालाच. कित्येक विद्यार्थ्यांची दोन बालवर्ष या जीवन शिक्षणाविना गेली आणि सारं जग हताश होऊन पाहत राहीलं. ही सार्वत्रिक अगतिकता लवकर संपावी. सारे विद्यार्थी आरोग्यसंपन्न राहून शाळेत यावेत हीच सदिच्छा. तोपर्यंत कोविडने लादलेली कठोर शिस्त नकोशी वाटली. तरी पाळायलाच हवी. त्याची तिसरी लाट येऊच नये पण त्यात लहानग्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. कदाचित व्यापक लसीकरणानंतर, सगळय़ांनाचं सुटकेचा निःश्वास टाकता येईल. वाट पाहूया.
…पावसाच्या धारा पुढचा बराच काळ सुखावणार आहेत. यावर्षी देशात एकशेएक टक्के पाऊस पडण्याचा जलसंकेत हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्याच्या कठीण काळात ही मोठीच दिलासादायक गोष्ट. पावसाने धरित्रीची तगमग थांबेल तशी होरपळल्या मनांची तगमगही शांत व्हावी असं म्हणत पावसाचं स्वागत करू या. त्याने फक्त सुखावणारा वारा आणावा. उद्ध्वस्त करणारी वादळं नकोत इतकंच.





























































