>> विनायक
आमच्या पिढीचे भाग्य म्हणावे की, काय ते ठाऊक नाही, पण मध्ययुगातील सरत चाललेल्या जीवन पद्धतीचा काही काळ बालपणी पाहायला मिळाला. पनवेलहून मुंबईत तांदूळ, कडवे वाल, सुकी मासळी घेऊन येणाऱया बैलगाडय़ांपासून गाद्या-उशा (बिछाने) घराच्या अंगणातच बनवून देणारे पिंजारी आणि शिवणयंत्र पाठीवर घेऊन साथीला असलेला शिवण कारागीर अशी सगळी मंडळी वेळोवेळी दारी यायची. सगळय़ा वस्तीचं त्यांच्याशी नातं असायचं. फारच व्यस्त असलेल्यांच्या घरी ‘लॉण्ड्री’साठी कपडे घेऊन जाणारा किंवा त्याच्याकडच्या कपडे धुण्याच्या दगडांवर कपडे धुऊन आणणारा यायचा. मुंबईतला धोबीघाट तर ऐतिहासिक होता. आता फक्त महालक्ष्मीला त्याचे रूप पाहायला मिळते. परदेशी पाहुण्यांच्या कुतूहलाचा विषय असलेली ही ताशीव चौकोनी दगडावर सपसप करीत कपडे आपटून धुण्याची पद्धत पाश्चात्य जगाला पूर्वीपासूनच चकित करणारी.
प्रसिद्ध अमेरिकन विनोदकार मार्क ट्वेन मुंबईत आले तेव्हा धोबीघाटाजवळच्या वॉटसन हॉटेलात उतरले. सकाळी लवकर त्यांना जाग आली ती घाटावरच्या अनेक रहाटांच्या आणि कपडे धुण्याच्या आवाजाने ते कुतूहलाने तिथे गेले. शेकडो मंडळी मनोभावे एकसुरात कपडे धुवत होती. त्याचा सामूहिक ध्वनी वातावरणात भरून राहिला होता. मिश्कील मार्क ट्वेन यांना काय चाललंय ते कळत होतं, पण त्यांनी आपल्या शैलीत नोंद केली की, मी मुंबईत सर्वात विस्मयकारी गोष्ट पाहिली ती म्हणजे धोबीघाट. या तलावाकाठी शेकडो लोक कपडा ओला करून मोठा दगड पह्डण्याचा प्रयत्न करीत होते. मला आश्चर्य वाटलं. दगड काही फुटत नव्हते, पण त्या माणसांची चिकाटी अशी दुसऱया दिवशी पुन्हा ते कपडे घेऊन आले! हे सारखं चाललंच होतं.
विनोदाचा हा उत्तम नमुना. तोच अनुभव त्यांना काशी येथील गंगाघाट पाहताना आला. नद्या, तळी, विहिरींच्या काठावर कपडे धुण्याची परंपरा आमच्या बालपणापर्यंत सर्रास पाहायला मिळायची. माझं जन्मगाव असलेल्या सांगली येथे कृष्णा नदीच्या प्रशस्त घाटावरचं असं दृश्य दिसायचं. माझ्या आजोळची मंडळीही तिथे कपडे धुऊन आणण्यासाठी जात असत. धुण्याचे कपडे काही जण तिथेच सुकवत. उष्ण कटिबंधातील देशात आपल्याला देशभर ही पद्धत दिसायची.
यंत्रयुगाचा उदय चौदाव्या-पंधराव्या शतकात झाला. त्यानंतर त्याने विलक्षण वेग घेतला. वाफ, कोळसा, पेट्रोल, वीज अशा इंधनांवर चालणारी यंत्रे आली आणि त्यातली अनेक थेट घराघरापर्यंत पोहोचली. विज्ञानाचा व्यापक उपयोग करण्याचा विचार फक्त संशोधकांनी केला. सर्वसामान्य त्याचा वापर करू लागले. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात 1691 मध्ये इंग्लंडमध्ये वॉशिंग मशीन अवतरलं ते हाताने हॅण्डल फिरवणाऱया पिंपासारखं. त्या ‘हॅण्ड व्रॅन्क ड्रम’ला लॉण्ड्री मशीन, क्लॉथ वॉशर अशी नावं होती. पुढे केवळ वॉशिंग मशीन नाव रूढ झालं ते आजतागायत. त्यानंतर शतकभराने शेफर यांनी एक सहज वापरात येणारं आपल्याकडच्या पूर्वीच्या पाणी तापवायच्या बंबासारखं वॉशिंग मशीन बनवलं. त्यात गरम पाणी भरून हॅण्डलने आतला ड्रम फिरवून कपडे खळबळून धुतले जायचे. आधुनिक मशीनही जवळपास तसंच स्पिनिंग, रिन्सिंग वगैरे करतं. फक्त ते विजेवर चालत असल्याने गतीसातत्य आणि प्रोग्रॅम दिलेला असल्याने नळाचं पाणी आपोआप बदललं जातं. त्याचबरोबर आता पाश्चात्य देशात कपडे पूर्णपणे वाळवणारे वॉशिंग मशीनच्या आकाराचेच ड्रायरसुद्धा मिळतात. आपल्याकडे पावसाळी प्रदेशात त्याचा वापर होऊ शकतो, पण त्यासाठी सतत वीजपुरवठा आणि जास्त जागा लागते.
1752 पासून कपडे धुण्याच्या गरगरत्या पिंपाने म्हणजे रोटेटिंग ड्रमने गती घेतली. त्या वर्षी ‘द जन्टलमन’ मासिकाने त्याची सचित्र माहिती दिली. 1767 मध्ये जर्मनीतही अशी धुलाई यंत्रे आली. ते जेकब शेफर यांनी तयार केले होते. 1790 पासून एडवर्ड बिथॅम यांनी इंग्लंडमध्ये वॉशिंग मशीनची विक्री सुरू केली. अर्थात यातील कपडे पाण्यात खळबळून काढण्यासाठी हाताने हॅण्डल फिरवावे लागायचे आणि पाण्याचा निचरा झाल्यावर ते हातानेच पिळावे लागायचे.
19 व्या शतकात यात क्रांती झाली. वाफेवर चालणारी स्वयंचलित धुलाई यंत्र आली. 1862 मध्ये रिचर्ड लॅन्सडेल यांचं पंपाऊंड रोटरी वॉशिंग मशीन कुतूहल वाढवणारं ठरलं. ते लंडन येथील विज्ञान प्रदर्शनात लोकप्रिय झालं. अमेरिकेत 1797 मधील नॅथेनिअल ब्रिग्ज यांनी वॉशिंग मशीनच पेटंट घेतलं होतं. मात्र आधुनिक वॉशिंग मशीनच्या निर्मितीचं श्रेय 1829 मध्ये असं यंत्र तयार करणाऱया लार्कम आणि शेफर यांना बऱयाचदा दिलं जातं.
नंतरच्या काळात 1850 पासून अशा यंत्रामध्ये उत्तरोत्तर सुधारणा होत होत अखेरीस 1904 मध्ये विजेवर चालणारं वॉशिंग मशीन आलं. ‘कपडे ओले करून दगड पह्डण्याचा प्रयत्न करण्याचे’ कष्ट आता मागे पडले. तरीही गरीब देशांत आणि त्यातल्या अधिक गरीब प्रांतांत कपडे धुण्याची पारंपरिक पद्धत आजही दिसते. 1930 मध्ये वॉशिंग मशीन ‘स्पिन ड्रायर’सह मिळू लागलं. गृहिणींसाठी हे वरदानच होतं. 1937 पासून संपूर्ण स्वयंचलित धुलाई यंत्रे आली. जगात आज दोन अब्ज घरांत, तर आपल्या देशातील सुमारे 15 कोटी घरांमध्ये वॉशिंग मशीन वापरलं जातं. आता अशी यंत्रे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालतात. अजूनही अब्जावधी ग्राहकांपर्यंतही यंत्रे पोहोचायची असल्याने त्यांचा व्यापार वाढतच आहे.