स्वयंपाकघर – स्वयंपाकाची आगळी गोडी

>> तुषार प्रीती देशमुख

चहादेखील न येणाऱया 200 पुरुषांना स्वयंपाक करण्याचे प्रशिक्षण देणारे 79 वर्षीय तरुण म्हणजे अरविंद आठल्ये काका. त्यांचे यूटय़ूब चॅनेल पुरुष वर्गात लोकप्रिय आहे. डाळभाताचा कुकर लावण्यापासून ते पोळी/चपाती लाटण्यापर्यंतचे प्रशिक्षणवर्ग असो वा साध्यासोप्या पाककृती, काकांनी त्यांचे रुचकर वैशिष्टय़ जपले आहे.

अरविंद काका कोल्हापूरचे, एकत्र कुटुंब संस्कृतीमध्ये वासात भावंडं व तीन बहिणी असे त्यांचे कुटुंब. आई सरस्वती आठल्ये या उत्तम सुगरण. पती कामानिमित्त पुण्याला असल्याकारणाने पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. काकांचे वडील वेदमूर्ती विनायक आठल्ये हे पुण्यातील वेदपाठशाळेत शिकवायला होते. पुते नोकरी सोडून कोल्हापुरातील म्हासुर्ली गावातील शेती करू लागले. त्यांना स्वयंपाकाची खूप आवड होती. त्यामुळेच या सर्व भावंडांनाही लहानपणापासूनच स्वयंपाक करण्याची सवय लागली.

 

 अरविंद काका ग्रॅज्युएशन पूर्ण करून पुण्यात नोकरीला लागले. पुण्यात त्यांचा शामला यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर ते नागपूरमध्ये रिझर्व्ह बँकेत रुजू झाले. स्वयंपाक येत असला तरी श्यामलाताई उत्तम सुगरण असल्याने लग्नानंतर अरविंद काकांना कधी स्वयंपाकघरात जाण्याची वेळच आली नव्हती. मुलं मोठी होत असतानाच अचानक अरविंद काकांना नोकरी व संसारातून निवृत्ती घेऊन गुरुमार्गात रुजू होण्याचे वेध लागले. ठरवल्याप्रमाणे काकांनी आनंदाने नोकरी व संसारातून निवृत्ती घेऊन गुरूंच्या शोधात भटकंती सुरू केली. नरसोबाची वाडी, औदुंबर, आळंदी, गोंदवले या सर्व ठिकाणी फिरता फिरता सहा महिन्यांनंतर काका आळंदी येथे भक्तिमार्गात रुजू झाले. अरविंद काकांनी 24 वर्षे अखंड गायत्री पुरश्चरणाचा संकल्प पूर्ण केला आहे, ज्यात त्यांनी एकही दिवस खंड पडू दिला नाही.

 पत्नीने दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच पुन्हा काका संसारात रुजू होऊ शकले. अरविंदकाकांना बुलेटवरून फिरण्याची प्रचंड आवड. महाराष्ट्रभर त्यांनी काकींबरोबर अनेक पर्यटनस्थळं, गडकिल्ले पालथे घातले आहेत. प्रत्येक ठिकाणची खाद्य संस्कृती जोपासून त्याबद्दलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं ही त्यांची खासीयत.

 लॉकडाऊनच्या काळात जिथे संपूर्ण जग थांबलं होतं तिथे अरविंद काकांनी अन्नपूर्णेचा आशीर्वाद घेऊन अनेक पदार्थ घरी करीत त्याची पाककृती फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली. काका अगदी सहज करता येणारे व  सगळ्यांना आवडणारे पदार्थ तयार करून दाखवीत असत. ते पाहून अनेकांनी काकांकडे ‘आम्हाला पदार्थ शिकवाल का?’ अशी मागणी केली. काकांनी शंभर पुरुषांसाठी पाककृती शिकवणी घेतली व त्यातून शंभरच नाही, तर हजारो पुरुष मंडळी प्रेरित होऊन स्वयंपाकघरात बायकोला मदत करू लागले. स्वत आपल्या मोबाइलवर पदार्थ शूट करून यूटय़ूब चॅनलवर टाकू लागले. काकांनी प्रेमाने शिकवलेले पदार्थ तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने करून पाहिले. पदार्थ चविष्ट होत असल्याने अगदी अल्पावधीतच काकांच्या यूटय़ूब चॅनेलला भरघोस प्रतिसाद मिळू लागला. अरविंद काका कधी रेसिपी अपलोड करणार, याची सगळेच उत्सुकतेने वाट पाहत असतात. काकांची पदार्थ कसा करायचा हे सांगण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. जास्त पसारा न घालता घरात उपलब्ध असलेल्या घटकांपासून सहज रीत्या पौष्टिक पदार्थ कसे करायचे हे ते सांगतात. काकांनी त्यांच्या नातवाकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक पदार्थ शिकून घेतले असून  तेदेखील त्यांनी आपल्या यूटय़ूब चॅनलवर अपलोड केले आहेत. पदार्थ तयार करत त्याचे शूटिंग, तो भाग एडिट करणे ते चॅनेलवर तो भाग अपलोड करेपर्यंतची सगळी प्रोसेस शिकून घेतली आहे. यात नेहमीप्रमाणे त्यांना शामलाताईंचे सहकार्य लाभते.

 काका सांगतात, ‘एखादा पदार्थ करायचा ठरला की, त्या पदार्थाला लागणाऱया भाज्यांची खरेदी असो वा एखादा जिन्नस घरी नसला तर तो आणण्यापासूनची तयारी असो, हे सगळं मी करतो. भाज्या कापून, चिरून तयार ठेवतो. त्यानंतर तो पदार्थ तयार करायचा, स्टँडवर मोबाइल वेगवेगळ्या अँगलने लावून मग त्याचं शूट करायचं व एकदा का शूट पूर्ण झालं की, मग एडिटिंगची कामगिरीही माझीच असते. त्यामुळे फक्त पदार्थ केला असं नाही तर पूर्वतयारी ते पदार्थ झाल्यानंतरची सगळी स्वच्छता माझ्याकडेच असते.’

 आळंदीच्या श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्याशी काकांचा संवाद आहे. ‘अरविंद’ या नावाने काकांचे यूटय़ूब चॅनेल आहे. गेली पाच वर्षे यूटय़ूब चॅनेलद्वारे शुद्ध आध्यात्मिक विचार प्रसारित करण्याचे काम ते करीत आहेत. गुरू या संकल्पनेच्या शुद्ध वैचारिक भूमिकेचा प्रचार करण्याचे काम ते करतात. अनेक संत पुरुषांवर ते व्हिडीओ तयार करतात. पाककलेवर 225 पेक्षा जास्त व्हिडीओ प्रसिद्ध आहेत. त्यांच्या यूटय़ूब चॅनेलला साडेतीन लाख सबक्राईबर असून विविध विषयांवरील पंधराशे व्हिडीओ त्यांनी प्रसारित केले आहेत. त्या दृष्टीने अनेक मुलाखती प्रसिद्ध केल्या आहेत. वयाच्या 79 व्या वर्षीही काका तितकेच चिरतरुण आहेत. काकांचे सकारात्मक असणे हे सगळ्यांना प्रेरित करणारे आहे. अरविंद काका व शामलाताई यांच्या आनंदी संसाराची केमिस्ट्री म्हणजे हसतमुखपणे रुचकर पदार्थ तयार करीत अनेकांना खाऊ घालणे हीच आहे.

[email protected]

लेखक युटय़ूब शेफ आहेत.)