किल्ले अंतूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण हत्तेकर

अभयारण्य, औट्रमघाट, शेकडो प्रकारचे वृक्ष, उंचच उंच डोंगराचे कडे, विविध प्रकारचे प्राणी यांनी वेढलेला आणि हजारो वर्षांचा इतिहास उरात दडवून ठेवणारा किल्ले अंतूर हे संभाजीनगर आणि कन्नड तालुक्यांचे वैभव आहे. डोंगरातून जाणारा नागमोडी रस्ता या किल्ल्याची ओढ अजूनच वाढवत जातो. मराठवाडा आणि खान्देश यांना जोडणाऱया अजिंठय़ाच्या डोंगररांगात हा किल्ला स्वतःचे वेगळे अस्तित्व टिकून आहे.

इसवी सन 1500 मध्ये मराठा सरदारांनी ‘अंतूर’ हा किल्ला बांधल्यांची नोंद आहे. मात्र या किल्ल्याने निझामशाही आणि मुघलशाही अनुभवल्याचे पुरावेदेखील शाबूत आहेत. गिर्यारोहकांसाठी पर्वणी असलेला हा किल्ला इतिहास, निसर्गप्रेमींसाठी मेजवानी आहे. पावसाळय़ात तर हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. रिमझिम पडणारा पाऊस आणि अंतूर किल्ल्याची चढाई हा अनुभव आयुष्यात अविस्मरणीय ठरू शकतो. इतिहासकार डॉ. रमेश सूर्यवंशी सांगतात, किल्ल्याच्या आजूबाजूला असलेली अनेक छोटी गावे हा किल्ला आपलाच समजून त्याचे नामांतर करतात. नागद किल्ला, नागापूर किल्ला, चिमणापूर किल्ला, अंतूर किल्ला, दस्तापूर किल्ला, कायदरी किल्ला या विविध नावांनीदेखील हा किल्ला ओळखला जातो.
समुद्र सपाटीपासून 2780 फूट उंचीवर असलेला हा गिरीदुर्ग जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. पाच वर्षांपूर्वी किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र सध्या तरी या किल्ल्याच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा दक्षिण दिशेला आहे. हा दरवाजा लाकडामध्ये दिंडी दरवाजाप्रमाणे तयार करण्यात आला आहे. मुख्य दरवाजा ओलांडल्यानंतर देवगिरी किल्ल्यात ज्याप्रमाणे वेगवेगळे दरवाजे आहेत तसेच दरवाजे अंतूर किल्ल्यातही पाहायला मिळतात.

पुढचा दरवाजा मात्र पूर्व दिशेला तोंड करून आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर विविध शिल्पे आहेत. या शिल्पांबरोबर सजावटीसाठी तोफेचे चार गोळे वापरले आहेत. तिसऱया दारावर फारसी भाषेत एक शिलालेख पाहायला मिळतो. किल्ल्याच्या चारही बाजूला तटबंदी आहे. या तटबंदीच्या कडेने उत्तर टोकाकडे चालू लागल्यास उजवीकडील तटबंदीमधील काही बुरुज लागतात. डावीकडे एक टेकडी असून, टेकडीच्या दक्षिण बाजूला भलामोठा तलाव आहे. टेकडीच्या उतारावर भव्य इमारत आहे. इमारतीच्या गच्चीवर जाता येते. त्यासाठी पायऱया आहेत. टेकडीच्या माथ्यावर टेहाळणीकरिता भलामोठा चौथरा बांधलेला असून, त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायऱया आहेत. या चौथऱयावरून संपूर्णगडावर लक्ष ठेवता येते. तसेच येथून अजिंठा-सातमाळा रांगेचे उत्तम दर्शन होते. उत्तरेकडील खान्देशाचा परिसर न्याहाळता येतो. गडाचा उत्तर भाग बालेकिल्ल्यासारखा असून, तो अधिकच भक्कम करण्यात आला आहे.

काय आहे इतिहास?

अंतूर किल्ला 15 व्या शतकात मराठा सरदाराने बांधला अशी नोंद सापडते. चिमणापूरचे सरदार रविराव शामराव ढोणे हे सोळाव्या शतकात किल्लेदार होते. पुढे हा किल्ला 16 व्या व 17 व्या शतकात नगरच्या निझामशाहीकडे होता. ढोणे घराण्याचे वंशज आजही कन्नड तालुक्यात असल्याचे अभ्यासक सांगतात. महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअरच्या नोंदीनुसार किल्ले अंतूरपासून काही अंतरावर असलेल्या या दगडी खांबावर जो फारसी मजकूर आहे त्यानुसार 1588 (हिजरी 1000) मध्ये तो खांब मुर्तझा निझाम शहाच्या काळात रोवला गेला. पूर्वेकडे नागपूर व जालना, पश्चिमेकडे मेवाड आणि चाळीसगाव, उत्तरेकडे अंतूर आणि बऱहाणपूर, तर दक्षिणेकडे दौलताबाद आणि नगर असा दिशादर्शक तो आहे. किल्ल्याच्या आतील तलावाच्या काठावरील मशिदीवरील पार्शीयन लिपीतील शिलालेखानुसार 1608 (हिजरी 1025) मध्ये ती मशीद इस्माईल हुसेन यांनी बांधली आहे. काही इतिहासकारांच्या मते या किल्ल्यावर हत्ती जाण्याएवढे मोठे दरवाजे नाहीत. त्यामुळे या भागातील किल्ले हे केवळ किल्ल्याच्या आजूबाजूच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी व देवगिरीकडे जाणाऱया शत्रूला रोखण्यासाठी उभारले असावेत.

किल्ल्यापर्यंत कसे पोहचावे

संभाजीनगर शहरापासून हा किल्ला साधारण 105 किलोमीटर दूर आहे. या किल्ल्यावर कन्नड, सिल्लोड, फुलंब्री आणि चाळीसगावमार्गे येता येते. संभाजीनगरकडून येणाऱया पर्यटकांसाठी नागापूरला यावे लागते. तेथून सात किलोमीटर अंतरावर किल्ले अंतूर आहे. मात्र हा सात किलोमीटरचा रस्ता खूप खराब आहे. तरीसुद्धा दुचाकी आणि चारचाकीने थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जाणे शक्य आहे. दुसरा मार्ग जळगाव जिल्हय़ातील चाळीसगाव तालुक्यामधून आहे. नागोद गावाकडून म्हैसघाटमार्गे दस्तापूरला पोहोचून तेथून अंतूरचा पायथा गाठता येतो. नंतर डोंगर चढल्यावर किल्ला येतो. हे दोन्ही मार्ग अंतूरच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येतात.

कन्नड तालुक्याच्या आजूबाजूचा परिसर हा पर्यटकांसाठी हब बनू शकतो. निसर्गाबरोबरच इतिहासानेदेखील या भागाला खूप काही दिले आहे. गौताळा अभयारण्याबरोबर पाचपेक्षा अधिक किल्ले, लेण्या, हेमाडपंथी मंदिरे या भागात आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने याचा विकास झाला तर स्थानिकांना मोठय़ा प्रमाणावर रोजगार तर मिळलेच, पण राज्यातील एक अमूल्य ठेवा देशासमोर येईल. याबाबत आम्ही अनेकदा मंत्र्यांना निवेदन दिले असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे.
– डॉ. प्रा. रमेश सूर्यवंशी, पर्यटन अभ्यासक