
>> मंगल गोगटे
काही जणांना विनातिकीट रेल्वे प्रवास करायला खूप आवडते. त्यात एक थ्रिल असते, असे त्यांना वाटते. पण जर असा फुकट रेल्वे प्रवास अधिकृतपणे शक्य असेल तर? चक्क आपल्या देशात हे शक्य आहे, आणि तो प्रवासही स्वप्नवत असावा असाच आहे. हा रेल्वे प्रवास आहे. भाकरा-नांगल असा. गेल्या सहा दशकांपासून या रेल्वेने तेथील कामगार आणि इतर गरजू लोक मोफत प्रवास करीत आहेत. सरकारनेही एक सेवाप्रकल्प म्हणून तो सुरू ठेवला आहे.
कमी खर्चात आणि कमी वेळात इष्ट ठिकाणी रेल्वेच पोहोचविते. त्यामुळे गरीबांसाठी ते एक वरदान आहे. ब्रिटिशांनी आपल्याला रेल्वेची ओळख करून दिली तेव्हापासून ती अविरतपणे काम करत आहे. त्यांनी रेल्वेचे अनेक प्रकल्प सुरू केले. थंड हवेची ठिकाणे शोधली. त्यासाठी घाट बांधले. बोगदे व पूल तयार केले. याचेच एक उदाहरण म्हणजे जगातील भाकरा-नांगल ही रेल्वे जी हिंदुस्थानात गेल्या अनेक वर्षांपासून, प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे न घेता अविरतपणे चालू आहे. भाकरा – नांगल धरण प्रकल्प लवकर पूर्ण करणे गरजेचे होते. त्यासाठी तिथे कामगार वर्ग वेळेवर पोचणे गरजेचे होते. म्हणून या मार्गावर रेल्वे सुरू करावी अशी शिफारस करण्यात आली. त्यासाठी सुमारे 800 लोक प्रवास करतील अशी भाकरा (हिमाचल प्रदेश) ते नांगल (पंजाब) यादरम्यान रेल्वे सुरू केली गेली. हा प्रकल्प समुद्रसपाटीपासून 740 फूट ऊंचीवर आहे. ही रेल्वे पाकिस्तानमध्ये बनलेले डबे वापरून सुरू झाली. तेव्हा इंजिन ब्रिटनमध्ये बनलेलं होतं. 1953 मध्ये याला अमेरिकेत बनवलेलं जीई कंपनीचं इलेक्ट्रिक इंजिन लावण्यात आलं. त्यामुळे पर्यावरणाचा ऱहास देखील थांबला.
आजदेखील ही रेल्वे दिवसातून दोन फेऱया मारते, एक सकाळी कामगारांना सोडायला आणि दुसरी संध्याकाळी त्यांना परत आणण्यासाठी. ही रोज 13 कि. मी. धावते आणि तिचा वेग जेमतेम 40 कि. मी. एवढा असतो. हा पंजाब आणि नांगलदरम्यानचा जादुई प्रवास हिमाचलचे बदलते सौंदर्य दाखवत शिवालिक डोंगर, तळी आणि जंगलातील पाणथळ भाग यांच्यातून जातो.
अत्यंत महत्त्वाची अशी ही रेल्वे आहे. कारण या रेल्वेतून फक्त कामगारच नाही तर शाळेचे विद्यार्थी, सुतार, पंप ऑपरेटर, शेतकरी असे गरजू लोकसुद्धा प्रवास करत असतात. शिवाय काही हौशी लोकही हा प्रवास आवडीने करतात. या पूर्ण प्रवासात ही अगदी लहानग्या 6 स्टेशनांवर या लोकांसाठी थांबते. गरीबांची तारक असं नामकरण झालेली ही रेल्वे त्याकाळी गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरीचं द्योतक मात्र ठरली. कारण इंग्रजांनी वरच्या वर्गातील लोकांसाठी बस व आणखी वरच्या लोकांसाठी मोटारींची व्यवस्था केली होती. त्याचा परिणाम म्हणून या दोन्हीमधील अंतर अधिकच वाढत गेलं. दोन वर्गांमध्ये दुश्मनी निर्माण करणं व त्यांच्यावर सत्ता गाजवणं हे तर इंग्रजांना आधीपासूनच चांगलेच माहिती होतं.
या रेल्वेसाठी चांगल्या लाकडाचे डबे बनवले होते व आतील बाकडीदेखील लाकडाची होती. पण कधीतरी गंमत म्हणून भेट देणाऱयाला जरी त्यांची मजा वाटत असली तरी रोज प्रवास करण्याऱया मजूरवर्गासाठी ती बाकडी त्रासदायक होती. अनेकदा ही बाकडी जरा आरामदायी बनवावीत, असा प्रस्ताव मांडला गेला. आता इतक्या वर्षांनी ही रेल्वे कालबाह्य झाल्यासारखी वाटते. कारण त्याची बांधणी जुनी झाली आहे.
2011 मध्ये ही आगगाडी फुकट चालवू नये असा विचार पुढे आला. कारण ही चालविण्याचा खर्च दोन कोटींच्या वर गेला होता. पण खूप विचारांती ती चालू ठेवण्याचं ठरलं.
हिंदुस्थान सरकार याकडे आता एक सेवा प्रकल्प म्हणूनच पाहत आहे. म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही एवढं मोठं बजेट त्यासाठी मंजूर केलं जात आहे. हिंदुस्थानात धावणाऱया अनेक ट्रेन्सपैकी ही एक खूप आगळीवेगळी ट्रेन आहे.




























































