
>> विनायक
2004 मध्ये हिंदुस्थानच्या दक्षिण भागात त्सुनामीने कहर केला, तोपर्यंत हातातल्या मोबाईलमध्ये जागतिक घटना-दुर्घटना पाहण्याची मर्यादित ‘सोय’ झाली होती. त्यानंतर या तंत्रज्ञानास अधिकाधिक आधुनिकता येऊन आता ‘एआय’पर्यंत पोहोचलेल्या ‘फिल्म’मुळे कोणती गोष्ट घडलेली आणि कोणती तांत्रिक पद्धतीने घडवलेली याचा थांग चटकन लागणं कठीण होणार आहे, परंतु अनेक वृत्तं जगभर वेगाने पसरण्याचं, पसरवण्याचं तंत्रज्ञान आता पृथ्वीवर कोठेही, काहीही घडलं तरी ते क्षणात ‘हाती’ पोचवतं.
त्यानंतर जपानमधल्या ‘फुकुशिमा’ अणू प्रकल्पाला धडक देणाऱया त्सुनामीने जगाची झोप उडवली आणि भूभागावर भीषण, पण अकल्पित आक्रमण करणाऱया महासागरांच्या महाउधाणाचे (त्सुनामीचे) भयावह चित्र समोर आले. सर्व जगाने अशा ‘सागरतळपंप’निर्मित सागरी महाउधाणाला ‘त्सुनामी’ या नावाने स्वीकारले. या जपानी शब्दाचा अर्थ बंदराकडे येणारी वेगवान ‘सागरी लाट.’ ‘त्सु’ म्हणजे बंदर आणि ‘नामी’ लाट. अशा अक्राळ-विक्राळ लाटांचा तडाखा अगदी ऐतिहासिक काळापासून जपानलाच सर्वाधिक बसला असल्याने ‘त्सुनामी’ शब्द सर्वमान्य झाला. मराठीत आपण त्याला सागरांचे महाउधाण म्हणू शकतो.
‘सागरा’चे म्हणण्याचं कारण असं की, जरी पृथ्वीवरचं सर्व सागरजल एखादा भूमध्य समुद्र वगळता परस्परांत मिसळून गेलेलंच आहे. आपल्या भौगोलिक जाणिवेसाठी आपण त्याचे काही ‘भाग’ करून त्यांना नावं दिली आहेत. त्यातला सर्वात ‘महासागर’ पॅसिफिक! तो जपानपासून अमेरिकेपर्यंत अस्ताव्यस्त पसरलाय. तसाच हिंदुस्थानच्या दक्षिण टोकाला विस्तारलेला हिंद महासागरही प्रचंड जलसाठय़ाचा आहे. त्यामुळे त्सुनामी नावाच्या महाउधाणांची संख्या याच दोन सागरांमध्ये जास्त. काही वेळा अटलँटिक समुद्रापासून ते अमेरिका खंडातील किंवा रशियाच्या विस्तीर्ण भूप्रदेशातल्या, विशाल तलावांच्या तळाशी भूकंप झाले तरी त्सुनामी उसळतात. 1531 मध्ये तर पोर्तुगालच्या टॅगस नदीपात्रात भूकंप झाला आणि त्यांची राजधानी असलेले लिस्बन शहर पाण्याखाली गेले होते. मात्र नदीमुळे त्सुनामी येण्याच्या घटना अगदीच अपवादात्मक.
गेल्याच महिन्यात 30 जुलै या दिवशी रशियातील कॅमचेत्पा येथे 8.8 रिश्टर क्षमतेचा भूकंप झाल्याने सागराला महाउधाण येऊन 17 ते 43 मीटर उंचीच्या लाटा विक्राळ नागफण्यासारख्या भूभागांकडे झेपावल्या आणि अपरिमित नुकसान झाले. एकेकाळी पॅसिफिक महासागरात अधिक असलेले त्सुनामींचे प्रमाण पृथ्वीव्यापी कसे असू शकते ते 2010 च्या दक्षिण गोलार्धातील न्यूझीलँड ते उत्तर गोलार्धातील ग्रीनलँडपर्यंत घडलेल्या अनेक भूकंपांनंतर उद्भवलेल्या त्सुनामींनी दाखवून दिले. 2000 मध्ये ग्रीनलँडमध्ये एका महाउधाणाने एवढा कहर केला की, सुमारे 9 कोटी घनमीटर पाणी उसळून भूभागाकडे रोरावत सुटले!
अशा त्सुनामींचा ज्ञात इतिहास किती मागे जातो? त्सुनामी तर पृथ्वीच्या रचनेपासून कित्येक कोटी वर्षे होतच असणार, पण मानवी संस्पृतीचा विकास झाल्यावर त्याची नोंद होऊ लागली. सुमारे 1 लाख वर्षांपूर्वी हवाई बेटांजवळ उसळलेल्या त्सुनामी 1300 फूट उंचीच्या आणि जमिनीवर 60 ते 80 मीटर उंचीचा ‘गाळ’ ओतणाऱया होत्या. मुंबई किंवा न्यूयॉर्पच्या बाबतीत असे घडले तर काय आपत्ती ओढवेल याची कल्पनाही करता येत नाही. अर्थात पश्चिम सागरातल्या त्सुनामींची संख्या फार मर्यादित असल्याने मुंबई सुरक्षित आहे आणि न्यूयॉर्प अॅटलँटिकच्या किनारी वसले आहे.
तरीही दक्षिण हिंदुस्थानातील तामीळनाडू ते ओरिसापर्यंतचा भूभाग अनेकदा महाचक्रीवादळ आणि त्सुनामीच्या तडाख्यात सापडतो. त्सुनामी दोन प्रकारे निर्माण होतात. पृथ्वीवरच्या ज्या ‘प्लेट टॅक्टॉनिक’वर साऱ्या देशांचा आणि सागरांचा भार तोललेला आहे. त्याखालील लोहरस डचमळला की भूकंप होतो. अशा दोन प्लेट कधी परस्परांना धडकतात तेव्हाही भूपंप होतो. हे सर्व पृथ्वीभर घडत असते. आपली हिंदुस्थानी ‘प्लेट टॅक्टॉनिक’सुद्धा उत्तरेच्या युरेशिया प्लेटला धडकत असते. त्यामुळेच उत्तराखंड, नेपाळ भागांत वारंवार भूपंपांची नोंद होते.
2004 चा हिंदुस्थानने अनुभवलेला महाउधाणी त्सुनामींचा तडाखा जगातल्या भूकंप-त्सुनामींच्या इतिहासातला विशेषत्वाने नोंद घेण्यासारखा ठरला. त्यातून निर्माण झालेल्या महालाटा (त्सुनामी) 104 फूट उंचीच्या आणि इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, बांगलादेश, हिंदुस्थानातील तामीळनाडू, अंदमान-निकोबार, श्रीलंका, मालदीव, लक्षद्वीप ओलांडून आफ्रिकेतील सोमालिया, केन्या, टांझानियापर्यंत वेगाने पसरल्या. त्यांची नोंद ‘टेलित्सुनामी’ अशी झाली. अशा दूरवर पसरत जाणाऱया त्सुनामी पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातच उफाळून येऊ शकतात. याचं कारण म्हणजे या गोलार्धात त्यांना अटकाव करणारे भूप्रदेश फारच कमी आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील पॅसिफिक महासागारातील, महाउधाणांची जशी नोंद आहे, तशी दक्षिणेकडची नाही.
2004 नंतर भूकंपतज्ञांनी पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धाचाही त्सुनामीसंदर्भातील अभ्यास वाढवला असणार. हे सर्व आठवण्याचं कारण नुकताच रशिया-जपान ते अमेरिकेच्या अलास्कापर्यंत बसलेला सागरी लाटांचा तडाखा. आपल्याकडे जुलैपासून नारळी पौर्णिमेपर्यंत मत्स्य व्यवसायासाठीही बोटी जात नसतात. निसर्गाची साथ देण्याचीच ही प्रथा आहे. त्सुनामींबरोबरच वाढतं तापमान जगातले छोटे देश अक्षरशः कसे ‘गिळंकृत’ करतं ते नंतरच्या लेखात.