
>> सूर्यकांत पाठक
अलीकडच्या काळात अनुचित खाद्य पदार्थाची प्रसिद्धी आणि लेबलिंग यांसारख्या गोष्टी वाढताना दिसत आहेत. चुकीचे ब्रॅडिंग, लेबलिंग या दोन्ही गोष्टी ग्राहकांच्या आरोग्याला हानीकारक आहेतच, पण व्यवसायाची प्रतिष्ठा आणि खाद्य उद्योगांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. अलीकडेच एफएसएसएआयने महत्त्वाचे पाऊल टाकत ‘ओआरएस’ या शब्दाचा गैरवापर होऊ नये यासाठी काही नियम निश्चित केले आहेत.
सध्या भेसळयुक्त पदार्थ आणि औषधांचा सुकाळ आला आहे. याबाबत सरकारकडून कारवाई केली जात असली तरी ग्राहकांनीदेखील तितक्याच सजगतेने शरीराला अपायकारक ठरणाऱया पदार्थांपासून लांब राहिले पाहिजे. ‘ग्राहक जागो’ नावाचे अभियान सरकारकडून राबविण्यात येते आणि त्यानुसार अनेक गोष्टी उघडकीस आणल्या गेल्या आहेत. चुकीचे बंडिंग आणि लेबलिंगमुळे ग्राहकांची दिशाभूल होते. उदाहरणादाखल ‘ओआरएस’ चे नाव वापरून काही कंपन्या फसवणूक करतात. म्हणजेच एखादा पदार्थ ‘ओआरएस’ म्हणून सरसकट खपविण्यात येतो, पण आता या गोष्टींना अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने अंकुश लावला आहे.
सार्वजनिक आरोग्य सुरक्षा निश्चित करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अलीकडेच महत्त्वाचे पाऊल टाकत ‘ओआरएस’ या शब्दाचा गैरवापर होऊ नये यासाठी काही नियम निश्चित केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार असणाऱया उत्पादनांनाच ‘ओआरएस’ शब्दाचा वापर करता येईल, असे ‘एफएसएसएआय’ने म्हटले आहे..
‘ओआरएस’ शब्दाच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी विकल्या जात असल्याबद्दल हैदराबाद येथील बालरोगतज्ञ डॉ, शिवरंजनी संतोष यांनी गेल्या आठ वर्षांपासून कायदेशीर लढाई लढली आणि त्याचा परिणाम म्हणजे ‘एफएसएसएआय’ला ऐतिहासिक आदेश द्यावा लागला. त्यानुसार उत्तेजित करणारे पेय अणि अन्य पेय पदार्थावर ‘ओआरएस’ या शब्दाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली. संबंधित पेय जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांचे पालन करत नाहीत. अर्थात डॉ. संतोष यांच्या महत्त्वाच्या लढय़ास 2022 मध्ये तेलंगण उच्च न्यायालयात एक जनहित याचिकेच्या रूपातून सुरुवात झाली. त्यात ‘ओआरएस’ म्हणून विकल्या जाणाऱया पेयात धोकादायक पद्धतीने साखरेचा अति वापर केला जात होता आणि इलेक्ट्रोलाइटचे प्रमाणही अनुचित होते. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत होता आणि तरीही ते ‘ओआरएस’ म्हणून लोकांच्या माथी मारले जात होते. शेवटी या पदार्थाच्या विक्रीस आव्हान देण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार एका संतुलित ‘ओआरएस’च्या मिश्रणात प्रति लिटर दीड ग्रॅम सोडियम, क्लोराईड, 2.6 ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड, 2.9 ग्रॅम सोडियम सायट्रेट आणि 13.5 ग्रॅम डेक्सट्रोज असणे अपेक्षित आहे, पण ‘ओआरएस’च्या नावाने विकण्यात येणाऱया अनेक उत्पादनांत प्रति लीटर 120 ग्रॅमपेक्षा अधिक साखर होती आणि इलेक्ट्रालाइटसचे प्रमाणही धोकादायक पातळीचे होते.
अलीकडच्या काळात अनुचित खाद्य पदार्थाची प्रसिद्धी आणि लेबलिंग यांसारख्या गोष्टी वाढताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांचे हित, पारदर्शकता आणि खाद्य पदार्थावरील विश्वासावरून चिंता वाढत आहे. चुकीचे ब्रॅंडिंग, लेबलिंग या दोन्ही गोष्टी ग्राहकांच्या आरोग्याला हानीकारक आहेतच, पण व्यवसायाची प्रतिष्ठा आणि खाद्य उद्योगांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एखाद्या खाद्य पदार्थांचे लेबल किंवा पॅकेजिंगसंदर्भात चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली जाते तेव्हा त्या पदार्थाचे चुकीचे बंडिंग होते. साहजिकच ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. एफएसएसएआय आणि जगभरातील नियामक संस्थांच्या मते, खाद्य पदार्थावरची माहिती सत्य असावी आणि लेबलिंगमध्ये स्पष्टता राहावी. त्यात औषध किंवा पदार्थात वापरले जाणारे घटक पदार्थ, पोषणासंबंधीची माहिती, प्रमाण, ऍलर्जीची सूचना, एक्स्पायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
एखाद्या खाद्य पदार्थाची माहिती अनेक मार्गांनी दडविली जाते. म्हणजेच पदार्थात वापरलेल्या घटकांचा यादीत समावेश नसणे किंवा त्यांना चुकीच्या पद्धतीने सादर करणे, उदा. शेंगदाणा किंवा ग्लुटेन यांसारख्या ऍलर्जीच्या वस्तूंचा उल्लेख न करणे. एखादा पदार्थ वापरण्याचा कालावधी संपल्यानंतरही विकला जात असेल किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे त्याची विक्री केली जात असेल किंवा सांगितल्याप्रमाणे वजन न भरणे यांसारख्या गोष्टींमुळे ग्राहकांची फसवणूक होतेच. शिवाय कमी वजनात सामान मिळते. काही वेळा तारीख उलटून गेल्यानंतरच्या पॅक वस्तू एकावर एक फ्री म्हणून लोकांना विकण्यात येतात. त्यामुळे अशा प्रकारचे चुकीचे ब्रॅडिंग आणि लेबलिंग आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. उदा. ऍलर्जी असणाऱया एखाद्या ग्राहकाच्या खाण्यात एखादा पदार्थ नकळतपणे येतो तेव्हा त्याची रिऍशन येऊ शकते. उदा. शेंगदाणे किंवा डेअरी उत्पादने. पोषणासंदर्भात दिशाभूल करणाऱया दाव्यामुळे ग्राहक चुकीने हानीकारक पदार्थाची निवड करू शकतात. साहजिकच त्यामुळे लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह यांसारखे आजारपण येऊ शकते.
भारतात अन्न सुरक्षा अणि मानक अधिनियम, 2006 आणि अन्न सुरक्षा मानक विनियम हे अन्न पदार्थाची चुकीची ब्रॅडिंग आणि लेबलिंग रोखण्याचे काम करते. ‘एफएसएसएआय’कडून देखरेख ठेवली जाते आणि अन्न पदार्थावरील लेबल हे योग्य आहे की नाही तसेच पारदर्शक आणि अचूकता आहे की नाही, याचीही तपासणी होते. खाद्य पदार्थाच्या लेबलवर साहित्य, पोषणासंबंधीचे तथ्य, ऍलर्जी, निर्मात्याची माहिती, तिथी समाप्तीची तारीख स्पष्टपणे असावी. खाद्य पदार्थाच्या उत्पादनासंदर्भात खोटे आणि भ्रामक दावे, जसे आरोग्याविषयीचे बिनबुडाचे दावे, या सर्व गोष्टींना मनाई आहे. खाद्य उत्पादनावर ऍलर्जीबाबत इशारा असावा, असे नियमात म्हटले आहे. चुकीचे ब्रॅडिंग किंवा लेबलिंगसंदर्भात दोषी आढळून आल्यास कंपनीवर दंड आकारला जाऊ शकतो आणि बाजारातील उत्पादन माघारी बोलावले जाऊ शकते किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते. ‘एफएसएसएआय’ला या प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार आहे. अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, 2006 मधील कलम 52 हे चुकीचे ब्रॅडिंग असणाऱया खाद्य पदार्थावर दंड आकारण्याचे काम करते. त्यानुसार एखाद्या कंपनीने किंवा विक्रेत्याने मानवाच्या वापरासाठी असणाऱया पदार्थाचे चुकीच्या मार्गाने उत्पादन केल्यास, साठवणूक केल्यास, विक्री किंवा आयात केल्यास त्यावर तीन लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मे महिन्यात एका अधिकृत अधिसूचनेनुसार, एखाद्या पदार्थाबाबत शंभर टक्के दावा केला जात असेल तर तो अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम, 2006 किंवा खाद्य सुरक्षा आणि मानक (जाहिरात आणि दावा) विनियम, 2018 मध्ये निश्चित केलेल्या व्याख्येत मोडत नाही. त्यामुळे अशा शब्दांचा वापर 2018 च्या तरतुदीच्या नियम चारनुसार भ्रामक दावा समजला जाईल. म्हणजेच या कलमानुसार खाद्य पदार्थाचे स्वरूप, गुणवत्ता किंवा पदार्थासंदर्भात दिशाभूल करणारे वक्तव्य करण्यासही मनाई आहे. नियमांची कडक अंमलबजावणी, ग्राहक जागृती मोहीम, सजग ग्राहक अणि जबाबदार कॉर्पोरेट व्यवहार या माध्यमातूनच अनुचित गोष्टींना चाप बसेल. याप्रमाणे एक सुरक्षित, पारदर्शक खाद्य संस्कृती निर्माण होण्यास हातभार लागेल. ग्राहकांनी आपल्या आरोग्याविषयी सतत जागरूक राहिले पाहिजे. एखाद्या खाद्य पदार्थापासून आपल्याला पोषण मिळते की नाही, याबाबत ग्राहकांनी चौकस राहिले पाहिजे. एखादा सेलिब्रिटी खाद्य पदार्थाची जाहिरात करतो म्हणून संबंधित पदार्थाच्या आहारी न जाता सजगतेने त्याची खरेदी करायला हवी.





























































