ठसा – सच्चा सेवाभावी

1961

>> अनिल कुचे

सेवाभावी वृत्ती, आपल्या पेशाशी प्रामाणिकता, मूल्य, तत्त्व आणि आदर्श याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ.गणेश बूब म्हणता येईल. डॉ. बूब यांचे 17 नोव्हेंबरला रात्री निधन झाले. त्यांचा जन्म गणेश चतुर्थीला झाल्यामुळे त्यांचे नाव गणेश ठेवण्यात आले होते. गाडगेनगरमधील गाडगे महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच त्यांचा छोटासा दवाखाना होता. या दवाखान्यात नेहमीच रुग्णांची गर्दी असे. अत्यंत कमी खर्चात रुग्ण उपचार करणे हेच ध्येय डॉ. बूब यांनी आयुष्यभर पाळले. त्यामुळे सकाळी सुरू झालेला त्यांचा दवाखाना उशिरापर्यंत सुरू राहायचा. ही एकप्रकारे दीन दुबळ्याची सेवाच होती. त्यांनी आपल्या व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टीने कधीच पाहिले नाही. आपल्याकडे आलेला रुग्ण कमी पैशात बरा व्हावा एवढाच उद्देश समोर ठेवून त्यांनी हजारो रुग्णांना जीवदान दिले. तसे पाहिले तर डॉक्टरांचा राजकारणाशी तसा संबंध आला नाही, परंतु गणेशदास राठी छात्रालयाची निर्मिती झाल्यानंतर त्याचे ते बरेच वर्षांपर्यंत सचिव होते. या सोबतच साईनगर येथील मूकबधिर विद्यालयाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शिवाजी शिक्षण संस्थेचे ते आजीवन सदस्य होते. गाडगे महाराजांचा आदर्श त्यांच्यासमोर असल्यामुळे त्यांनी अनेक सामाजिक कार्यात योगदान दिले. शिवाय ते उत्तम नाटय़कलावंतदेखील होते. अलीकडच्या काळात डॉक्टरकडे गेल्यास त्याचा थाट पाहल्यानंतरच तपासणी करायची किंवा नाही याचाच विचार रुग्ण करतात. डॉ. गणेश बूब मात्र त्याला अपवाद होते. आजच्या युवा डॉक्टरांनी त्यांचा आदर्श घेत वाटचाल केल्यास त्याचा लाभ त्यांना होणार आहे. एखादा माणूस इतकी वर्षे आपली सेवाभावी वृत्ती जपू शकतो, गोरगरीब रुग्णांवर पैशाचा विचार न करता सेवा म्हणून उपचार करीत राहतो, वेळेच्या बाबतीत न चुकता, न थकता अविरतपणे काम करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून डॉ. गणेश बूब यांच्याकडे पाहावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या