लेख – गणेशोत्सव, महामार्ग आणि विमानतळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुरेंद्र मुळीक

गणेशोत्सव जवळ आला की मुबंईस्थित चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गाची आठवण होते आणि मग सुरू होते विकासाची चर्चा. गेली अनेक वर्षे हेच नित्यनियमाने सुरू आहे. यंदा तर कोकणच्या विकासाची चर्चा चाकरमान्यांनी जोरदार केली तीही चारपटीने. त्याची कारणेही तशीच होती. पनवेल-गोवा महामार्गाचे काम सुरू आहेच. संकेश्वर बांदा व्हाया सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ची अधिसूचना जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील बहुचर्चित ‘चिपी’ विमानतळाचे 9 ऑक्टोबर रोजी होणारे उद्घाटन. आणि हे सर्व कमी म्हणून काय तर मुंबई-सिंधुदुर्ग 70 हजार कोटी रुपये खर्चाच्या सागरी महामार्गाची शासनाने केलेली घोषणा. हे सारे पाहता आणि तेही ऐन गणेशोत्सवात म्हटल्यावर चर्चा रंगणारच होती.

गणेशोत्सव आणि कोकणात आलेल्या मुंबईतील चाकरमान्यांनी कोकणच्या विकासाची चर्चा केली नाही असे कधीही घडत नाही. यावेळीही या परंपरेत खंड पडला नाही. उलट शासनाच्या काही विकासकामांच्या घोषणांमुळे या चर्चेला अनेक धुमारे फुटले. रत्नागिरीच्या जनतेने शहरीकरण स्वीकारण्याची मानसिक तयारी केलेली आहे. मात्र सिंधुदुर्गच्या जनतेने तशी मानसिकता अद्याप स्वीकारलेली नाही, त्यामुळेच सिंधुदुर्ग जिह्यात या चर्चेने एक वेगळाच टप्पा गाठला. बरे झाले त्यामुळे निदान ‘कोरोना’ विषाणूला सारेच गावकरी विसरून गेले. मागील गणेशोत्सवात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेने चाकरमान्यांना गावबंदी केली होती, पण यंदा तशी बंदी कुठेही दिसली नाही. दुसरी लाट ओसरली नाही आणि तिसरी लाट येणार असे शासन सांगत असूनही गावकऱयांनी चाकरमान्यांना दूर ठेवले नाही. त्यांना मिठीत घेऊनच आरत्या, भजने केली हे विशेष. यामुळे गावकऱयांचे अभिनंदन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. असो कोरोनाचा विषय बाजूला ठेवूया आणि विकासाकडे वळूया.

कोकणाचा विकास व्हायला हवा असे प्रत्येक कोकणी माणसाला अनेक वर्षे मनापासून वाटत आहे. त्याच्या मनातील ही इच्छा मागील दशकात हळूहळू का असेना, पण पूर्ण होऊ लागली आहे. पुढील दशकात कोकणचा मोठय़ा प्रमाणात विकास झालेला असेल. कारण मुंबईच्या जवळ मोकळी आणि मोठय़ा प्रमाणात जागा असलेला भाग म्हणजे कोकणच आहे. यामुळेच या कोकणात मोठय़ा प्रमाणात विकास होईल यात शंका अजिबात नाही. राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 चे काम लवकर पूर्ण होईलच. लांजा ते पत्रादेवीपर्यंतचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. चिपळूण, लांजा उड्डाणपुलांचे काम प्रगतिपथावर आहे. माणगाव, इंदापूर येथील बायपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. कशेडी टनेलमधून वाहतूक मे 2022 पर्यंत अपेक्षित आहे तर राजापूर येथील अर्जुना नदीवरील उंच पूल डिसेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संकेश्वर बांदा या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामालाही सुरुवात होईल, तर चिपीचे विमानतळ सुरू होईल आणि महाराष्ट्र-गोवा राज्याच्या सीमेवर असलेले ‘मोपा’ आंतरराष्ट्रीय विमानतळही सुरू होईल आणि 70 हजार कोटी रुपयांच्या सागरी महामार्गालाही चालना मिळेल. देशाचा, राज्याचा विकासाचा वेग, अत्याधुनिक युगातील तंत्रज्ञान पाहता हा सारा विकास होण्यास फारसा कालावधी लागेल असेही वाटत नाही.

पुढील पाच-सहा वर्षांत ही सारी कामे पूर्ण होताच मुंबई केवळ सिंधुदुर्ग जिह्याच्याच नव्हे तर गोवा राज्याच्या अगदी जवळ आलेले असेल. पणजी- मुंबई ही दोन्ही शहरे जोडली जातील. हे सारे समोर दिसत असतानाही गणेशोत्सवासाठी आलेला चाकरमानी विकासाच्या या कामाबाबत गांभीर्याने चर्चा करताना दिसलाच नाही. त्याने या सर्व कामाची चेष्टाच केली. विशेष म्हणजे गोव्याचे गुणगान गाणारे सिंधुदुर्गवासीयही या योजनेची चेष्टाच करताना दिसले. वास्तविक वर्षानुवर्षे गोव्यात राहणाऱया सिंधुदुर्गवासीयांना मूळ गोवेकरांनी कायमस्वरूपी ‘भायलो’ किंवा ‘मोंडकार’ म्हणून हिणवले. त्यांना आपले म्हणून स्वीकारले नाही. तरीही विकासाचा मुद्दा जेव्हा जेव्हा उपस्थित होतो तेव्हा तेव्हा सिंधुदुर्गवासीय गोवेकर आणि चाकरमानी प्रथम चेष्टा आणि विरोध करतो आणि नंतर माघार घेतो. कोकण रेल्वेच्या बाबतीत सुरुवातीला अशीच चेष्टा करण्यात आली होती. ‘या डोंगरातून रेल्वे येतली कशी’ असे सांगून अनेक जण खिल्ली उडवीत असायचे. केवळ 15 लाख लोकवस्ती असलेल्या गोवा राज्याने मार्ग बदलावा यासाठी प्रचंड विरोध केला होता. तब्बल एक वर्ष काम थांबले गेले होते. पण कोकण रेल्वे उभारणीत केवळ सहा टक्के हिस्सा असलेल्या गोवा राज्यात आज सर्वाधिक गाडय़ा थांबत आहेत, तर 21 टक्के हिस्सा असलेल्या महाराष्ट्र राज्याला अवघी एकच गाडी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्याची औद्योगिक स्थिती. या दोन जिह्यांत ज्या प्रमाणात उद्योग- व्यवसायाची उभारणी व्हायला हवी होती ती झालीच नाही. चिपळूण तालुक्यातील ‘लोटे परशुराम’ येथील औद्योगिक वसाहत वगळता अन्य ठिकाणी वसाहत उभी राहिलीच नाही.

कोकणच्या जनतेने स्वतःला काय हवे याची मागणीच केली नाही. विरोधापेक्षा मागणी करायला आता आपण शिकायला हवे. याचा अर्थ निसर्ग उद्ध्वस्त होणारे उद्योग-व्यवसाय स्वीकारावे असे बिलकूल नाही. यासाठीच कोकणातील सिंधुदुर्ग जिह्याला 1999 साली पर्यटनाचा विशेष दर्जा दिला गेला, पण गेल्या 22 वर्षांत पर्यटनाचा विशेष दर्जा असलेल्या सिंधुदुर्ग जिह्यात पर्यटन वाढलेच नाही. आजही देशविदेशातील पर्यटक गोव्यातच जातात. हे पर्यटक सिंधुदुर्ग जिह्यात का थांबत नाहीत, याचा विचार व्हायला हवा. या 22 वर्षांत शासनाने दोन वेळा पर्यटन धोरण जाहीर केले पण ही धोरणे ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचली नाहीत तशी कोकणच्या जनतेपर्यंतही पोहोचली नाहीत. परिणामी पर्यटन ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिह्यात वाढायला हवे होते ते वाढलेच नाही. रत्नागिरी जिल्हा तर पर्यटनापासून फारच दूर राहिला आहे. या जिह्यात जागोजागी पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळेच या जिह्यालाही पर्यटनाचा विशेष दर्जा द्यावयास हवा होता.

एकंदरीत पाहता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिह्यांनी विकासाच्या बाबतीत वेग घेतलेला आहे, पण विविध उत्सवात अडकलेल्या कोकणी माणसाने मात्र अद्यापही विकासात वेग घेतलेला नाही. याचे कारणही चाकरमानीच आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण या चाकरमान्यांनी आपल्या वाडीतील तरुणांना योग्य ती दिशा दिलीच नाही. प्रत्येक वाडीत मंडळ स्थापन करणे आणि दोन-चार पैसे जमा करून उत्सवात पुन्हा अडकविणे यापलीकडे या मंडळांनी काहीच केले नाही. आज देशात नसतील तेवढी मंडळे सिंधुदुर्ग जिह्यात आहेत. पण हाताच्या बोटावर मोजणारीच मंडळे आहेत जी खरोखरच आपल्या माणसांचा विकास करीत आहेत. वाडीतील रस्ते बनविणे, साकव बांधणे ही आता काही मंडळांची कामे राहिली नाहीत. त्यासाठी शासन-प्रशासन भक्कम आहे. तरीही पैसे जमा करण्याची कामे काही मंडळे बिनबोभाटपणे करीत आहेत. दरवर्षी हे काम न चुकता सुरूच आहे.

उत्सवाच्या दिवसांत चाकरमान्यांनी गावी यायचे, गावात सभा घ्यायची आणि थातूरमातूर सांगून वेळ घालवून द्यायचा. पनवेलपासून सावंतवाडीच्या बांदापर्यंत अनेक वर्षे हेच सुरू आहे. गावातील जनतेलाही त्याची सवय झाली आहे. यामुळे असे होते की, गावातील तरुणांच्या रोजगाराचा, व्यवसायाचा, शिक्षणाचा, आरोग्याचा हे मूळ प्रश्न बाजूलाच राहतात. त्याबाबत किती मंडळे गांभीर्याने चर्चा करतात हा संशोधनाचा विषय ठरेल. हे सारे पाहता गावातील तरुणांनी आता चाकरमान्यांच्या मंडळावर अवलंबून किंवा अडकून न राहता आपल्या व्यवसाय आणि रोजगाराची दिशा स्वतःच शोधून आपल्याच गावात भक्कमपणे कसे उभे राहता येईल हे पाहिले पाहिजे. कारण येणारा काळ हा वेगवान विकासाचा आहे. या विकासाबरोबर स्वतःचा विकास कसा होईल याकडेच फक्त लक्ष दिले पाहिजे. चाकरमान्यांनी स्वतःचा विकास केला आहे. आता गावातील तरुणांनीही स्वतःचा विकास करण्यासाठी अंगातील मरगळ झटकून पुढे व्हायला हवे.