ठसा – गंगाराम गवाणकर

>> श्रीकांत आंबे

मालवणी बोलीभाषेचा झेंडा आपल्या ‘वस्त्रहरण’ या मालवणी नाटकामुळे सातासमुद्रापार फडकवणारे, मालवणी बोलीला अपार लोकप्रियता मिळवून देणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे वृद्धापकाळाने झालेले निधन साऱ्या महाराष्ट्राला वेदनादायक ठरणारे आहे. सिंधुदुर्गातील मालवणी बोली ‘वस्त्रहरण’ नाटकामुळे अमाप लोकप्रियता मिळवत जगात नाव मिळवते ही खरोखरच आश्चर्यकारक किमया होती. गोष्टीवेल्हाळ, ‘गजाली’ मारणारा मालवणी माणूस, त्याची अनेक स्वभाववैशिष्टय़े या नाटकामुळे अगदी ठळकपणे जगासमोर आली. ‘वस्त्रहरण’च्या यशामध्ये मच्छिंद्र कांबळी यांचा वाटा मोठा असला तरी या नाटकाची संहिताही तितकीच दमदार आणि लवचिक होती. या नाटकाचे आठ हजारांहून अधिक प्रयोग व्हावेत हा चमत्कार होता. ‘वस्त्रहरण’मधील कौरव-पांडवांची पात्रे, आपल्या विनोदी लकबींनी हशा घेणारा गोप्या, ते तालीम मास्तर आणि सर्वांवर कडी करणारे मच्छिंद्र कांबळी विसरता येत नाहीत. विनोदाचे बादशहा पु. ल. देशपांडे तर हे नाटक पाहून केवळ खळखळून हसलेच नाहीत तर अवाक् झाले. त्यांनी या नाटकाला आणि खास गवाणकरांना दिलेले प्रशस्तीपत्र बोलके आहे. ते म्हणतात, ‘वस्त्रहरणाच्या रूपाने तुम्ही मराठी रंगभूमीला देशी फार्सचे भरजरी वस्त्र अर्पण केले आहे. याला म्हणायचे शंभर टक्के देशी फार्स. मालवणच्या सिंधुदुर्गाइतकेच तुमच्या मालवणी फार्सला दीर्घायुष्य लाभो आणि लक्षावधी लोकांना खळखळून हसायला लावण्याचे पुण्य तुमच्या पदरात पडो, ही शुभेच्छा!

‘वस्त्रहरण’ नाटकाने मालवणी बोलीभाषेच्या अस्सल भावविश्वाला मुख्य प्रवाहात आणले. मालवणी माणसाचा विनोद, त्याची व्यथा आणि जगण्याची उमेद त्यांच्या लेखणीतून झळकली. या नाटकानंतर मालवणीची ओळख सर्वदूर पसरली. अनेक कथा, कादंबऱया, नाटके, मालिका, चित्रपट यातून मालवणीचा जागर मोठय़ा प्रमाणात होऊ लागला. जनसामान्यांचे विषय खुसखुशीतपणे त्यांच्याच भाषेत मांडण्याचे सामर्थ्य गवाणकरांमध्ये होते. त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या संघर्षमय वाटचालीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. ते ‘वस्त्रहरण’ नाटकामुळे झगमगीत प्रकाशात आले असले तरी त्यांची प्रतिभा तेवढीच मर्यादित नव्हती. त्यांनी ‘वस्त्रहरण’पूर्वी आणि नंतर जवळजवळ 24 नाटके लिहिली. ‘वेडी माणसे’, ‘प्रीतीगंध’, ‘वर भेटू नका’, ‘पोलीस तपास चालू आहे’, ‘अरे बापरे’, ‘महानायक’, ‘वडाची साल पिंपळाक’, ‘भोळा डांबिस’, ‘मेलो डोळो मारून गेलो’, ‘वात्रट मेले’, ‘वन रूम किचन’, ‘वरपरीक्षा’, ‘उषःकाल होता होता’, ‘चित्रांगदा’, ‘दोघी’ अशी विविध आशय-विषयांची नाटकेही त्यांनी लिहिली. ‘वात्रट मेले’ या नाटकाचे तर अडीच हजारांच्या वर प्रयोग झाले. ‘वन रूम किचन’नेही हजाराची संख्या पार केली. विनोदीच नव्हे, तर गंभीर आशयाची नाटकेही त्यांनी तितक्याच ताकदीची लिहिली. त्यातील ‘दोघी’ हे काळाच्या पुढचा विचार करून लिहिलेले सर्वांगसुंदर नाटक समीक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरले. कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात लालन सारंग यांची भूमिका होती. गवाणकर यांच्या नाटय़ातून सखाराम भावे, लीलाधर कांबळी, गिरीश ओक, शकुंतला तरे, जयंत सावरकर, सयाजी शिंदे, पंकज विष्णू यांसारख्या अनेक कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. मालवणी बोलीची क्षमता आणि तिचे सामर्थ्य नेमके हेरून ते त्यांनी ‘वस्त्रहरण’सारख्या नाटकात वापरले ही त्यांची दूरदृष्टी होती. ‘वस्त्रहरण’मुळे मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांची लाट आली. उमेदीच्या काळात स्मशानात राहून दिवस काढावे लागलेल्या गवाणकर यांनी आपल्या प्रतिभासामर्थ्याने मराठी रंगभूमीवर चमत्कार घडवला. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर तालुक्यातील माडबन गावात, तर माध्यमिक शिक्षण मुंबईत डोंगरी येथील माझगाव नाईट हायस्कूलमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ येथे झाले. 96 व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना लाभले. अतिशय साधा, सालस, निगर्वी स्वभाव असलेल्या गवाणकर यांनी मराठी रंगभूमीला दिलेले वरदान विसरता येणार नाही.