मुद्दा – लठ्ठपणाचे आनुवंशिक कोडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अमोल नायकवडी (इंडस हेल्थ प्लसचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व प्रीव्हेंटिव्ह हेल्थकेअर स्पेशालिस्ट)

लठ्ठपणा  ही हिंदुस्थानींमधील वाढती समस्या आहे, जी कार्डिओव्हॅस्कुलर डिसीज व मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांच्या वाढत्या सामाजिक-आर्थिक भाराशी संबंधित आहे. याव्यतिरिक्त व्यायामाचा अभाव आणि उच्च प्रमाणात कॅलरी असलेल्या आहाराचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा ही महामारीसारखी गंभीर समस्या बनली आहे, पण अशा वातावरणात राहणाऱ्या सर्व व्यक्तींना लठ्ठपणा येईल असे नाही आणि सर्व लठ्ठ व्यक्तींमध्ये समान बॉडी फॅट वितरण किंवा समान आरोग्यविषयक समस्या असतील असेदेखील नाही. अशा समस्यांचा सामना करणारे कुटुंब किंवा व्यक्तींच्या समूहामध्येदेखील विभिन्नता असू शकते. मानवामध्ये आनुवंशिक बदल हे हळूहळू लठ्ठपणास कारणीभूत ठरत आहेत. असे असले तरी अशा समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींमधील फरक व प्रतिसादांमुळे लठ्ठपणा होण्यास जीन्स कारणीभूत असण्याची शक्यता असू शकते.

2019 ते 2021 दरम्यान केलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5च्या (एनएफएचएस-5) अलीकडील सर्वेक्षणानुसार प्रत्येक चार हिंदुस्थानींपैकी एक लठ्ठ आहे. या देशांतर्गत सर्वेक्षणानुसार जवळपास 23 टक्के पुरुष आणि 24 टक्के महिलांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 किंवा त्याहून अधिक असल्याचे निदर्शनास आले.

शरीराला सभोवतालच्या बदलांवर प्रतिक्रिया कशी द्यावी याविषयी जनुकांकडून सूचना प्राप्त होतात. नातेवाईक, जुळे व दत्तक यांच्यातील समानता आणि फरक यासंदर्भात केलेल्या अभ्यासामधून अप्रत्यक्षरीत्या वैज्ञानिक पुरावा मिळाला आहे की, आनुवंशिक परिवर्तनांचा मोठय़ा प्रमाणात प्रौढांच्या वजनावर परिणाम होतो. इतर अभ्यासांमध्ये लठ्ठ असलेल्या व लठ्ठ नसलेल्या व्यक्तींची आनुवंशिक भिन्नता शोधण्यासाठी तुलना केली गेली आहे, ज्यामुळे गुणांवर (जसे की, जास्त खाण्याची किंवा बसून राहण्याची प्रवृत्ती) किंवा चयापचय क्रियेवर (जसे की, इंधन म्हणून आहारातील चरबी वापरण्याची कमी क्षमता किंवा वाढलेली प्रवृत्ती, शरीरातील फॅट) परिणाम होऊ शकतो. या संशोधनाने भूक आणि अन्नाचा वापर वाढून लठ्ठपणा येऊ शकतो अशा अनेक जनुकांमधील जीन बदल शोधून काढले आहेत.

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, आनुवंशिक भिन्नतेव्यतिरिक्त जीवनशैली आणि पर्यावरणीय घटकदेखील लठ्ठपणाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. काही पर्यावरणीय घटकांमुळे हिंदुस्थानींमध्ये लठ्ठपणा वाढू शकतो आणि आनुवंशिक पूर्वस्थितीशी संलग्न होऊ शकतात. त्यामुळे लठ्ठपणा टाळण्यासाठी किंवा व्यवस्थापित करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली राखणे खूप महत्त्वाचे आहे.

हिंदुस्थानातील लठ्ठपणाला कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख पर्यावरणीय घटकांपैकी एक म्हणजे बदलत्या आहाराच्या सवयी. फायबर घटक आणि जटिल कर्बोदकांमध्ये समृद्ध असलेल्या पारंपरिक हिंदुस्थानी आहाराची जागा मोठय़ा प्रमाणात पाश्चात्त्य आहाराने घेतली आहे, ज्यामध्ये मेद, साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात आहेत. आहारातील या बदलामुळे ऊर्जेचे सेवन वाढले आहे आणि ऊर्जा उत्सर्जनात घट झाली आहे, ज्यामुळे वजन वाढत लठ्ठपणा वाढू शकतो. याव्यतिरिक्त अधिक बैठी जीवनशैली आणि उच्च कॅलरी असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन आणि शहरीकरणामुळे हिंदुस्थानातील लठ्ठपणाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. सामाजिक-आर्थिक स्थितीदेखील लठ्ठपणाशी निगडित आहे, कारण कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आरोग्यदायी आहार कमी प्रमाणात उपलब्ध होतो. म्हणून ते स्वस्त उच्च कॅलरी असलेल्या आहारावर अवलंबून आहेत, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोकादेखील वाढतो.

एकूणच, आनुवंशिक संवेदनक्षमता व पर्यावरणीय घटक हिंदुस्थानातील लठ्ठपणाच्या विकासामध्ये भूमिका बजावतात आणि आनुवंशिक पूर्वस्थिती व लठ्ठपणा होण्यास कारणीभूत वातावरण यांच्या संयोजनामुळे हिंदुस्थानी व्यक्तींमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.

लठ्ठपणासाठी स्वतःमधील आनुवंशिक बदल आणि अन्न/आहार, पौष्टिक घटक आणि लठ्ठपणाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी फिटनेसबाबत जागरूक असणेदेखील खूप महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या की, जीवनशैली आणि पर्यावरणीय घटक बदलू शकतात, तर आनुवंशिकता तुलनेने कायम आहे. म्हणून आरोग्यदायी आहार व शारीरिक हालचालींबद्दल जागरुकता आणि शिक्षण यासारखे हस्तक्षेप, लठ्ठपणाचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फळे आणि भाज्यांसह संपन्न सकस आहाराचे सेवन तसेच शारीरिक व्यायाम लठ्ठपणाचा आनुवंशिक धोका असलेल्या व्यक्तीचे वजन नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.