वेब न्यूज – हिमनदीचा इशारा

व्हेनेझुएला देशातील शेवटच्या हिमनदीचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. वातावरणातील बदलाचा फटका सध्या सर्व जगाला बसतो आहे. विविध देश नैसर्गिक संकटांमुळे त्रासून गेले आहेत. त्यात आता व्हेनेझुएलामध्ये असलेली शेवटची हिमनदीदेखील अस्तित्वहीन झाल्याने संशोधकांना फार मोठा धक्का बसला आहे. अजून दहा वर्षांपेक्षा जास्त दिवस ही नदी अस्तित्व टिकवेल असे त्यांना वाटत असताना अचानक हे घडल्याने पृथ्वीवर वातावरण बदलाचा धोका किती मोठय़ा प्रमाणात वाढला आहे हे समोर आले आहे. एकेकाळी दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशामध्ये सहा हिमनद्यांचे अस्तित्व होते. यातील पाच नद्या पूर्वीच गायब झालेल्या होत्या, पण आताच्या घटनेने ही संख्या शून्यावर आलेली आहे. या सहाव्या हिमनदीचा आकार इतका आकसला आहे की, तिथल्या संशोधकांनी आता त्याला एक बर्फाचे छोटे क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. 450 हेक्टर क्षेत्र व्यापणारी नदी आता दोन हेक्टर एवढी संकोचली आहे. एका अभ्यासानुसार, हवामानातील बदलामुळे जगभरातील तापमानात लक्षणीय वाढ होत चालली आहे. त्यामुळे बर्फ वितळण्याच्या प्रमाणातदेखील वाढ होत आहे. बर्फाच्या वितळण्याने जगभरातील समुद्राची पातळीदेखील वाढत चालली आहे. हिमनद्या तर अत्यंत वेगाने नष्ट होत आहेत. एल निनोसारखा हवामानातील घटक प्रामुख्याने या तापमानात वाढीसाठी जबाबदार आहे. व्हेनेझुएलानंतर आता मेक्सिको, स्लोव्हेनिया आणि इंडोनेशिया देशांतील हिमनद्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. नुकत्याच दुबईमध्ये अचानक कोसळलेल्या विनाशकारी पावसानंतर काही काळात घडलेली ही घटना जगाची चिंता वाढवणारी आहे.