
>> डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी
गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर झालेल्या निर्वनीकरणानंतर वातावरणात 9 ते 15 कोटी टन कार्बन साठला आहे आणि कोळसा व खनिज तेलाच्या वापरामुळे 15 ते 18 कोटी टन कार्बन साठला आहे. या निष्कर्षांनुसार, ग्लोबल वॉर्मिंग प्रक्रियेला मानवाच्या कारवाया 70 टक्के जबाबदार आहेत. ऑस्ट्रेलियात पडलेला दुष्काळ आणि युरोपमध्ये निर्माण झालेले उबदार वातावरण हे ग्लोबल वॉर्मिंगचेच दुष्परिणाम आहेत. 21 व्या शतकात पृथ्वीच्या तापमानात सर्वाधिक वाढ झाली आहे. म्हणूनच जगातील सर्वच राष्ट्रांनी ग्रीन हाऊस वायूचे उत्सर्जन कमी करण्याची नितांत गरज आहे.
जागतिक तापमानाच्या वाढीस जबाबदार असणाऱया देशांत चीन व हिंदुस्थान या विकसनशील आणि अमेरिका या विकसित राष्ट्रांचा सगळ्यात वरचा क्रमांक लागतो, असे मानण्यात येते. कारण तापमानवाढीस कारणीभूत असणाऱया कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण याच देशांत सगळ्यात जास्त आहे. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण निश्चित करणे हा तापमानवाढ रोखण्यावर एक उत्तम उपाय म्हणून 1997 मध्ये quetto करार करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी 2005 मध्ये सुरू झाली. 1990 मध्ये हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे जे प्रमाण होते त्याच्या 5.2 टक्क्यांनी ते कमी करण्याचे 180 देशांनी या ठरावाद्वारे मान्य केले व त्याची मुदत 2008 ते 2016 अशी नक्की करण्यात आली. असा कायदा करणे हा वैश्विक तापमानवाढ रोखण्याचा रामबाण उपाय नाही, अशी भूमिका हिंदुस्थानतर्फे डर्बन परिषदेत मांडण्यात आली होती. या भूमिकेत किती तथ्य होते ते समजण्यासाठी पृथ्वीवरील कार्बनचे साठे व त्यांचा या प्रक्रियेतील सहभाग समजून घेणे गरजेचे आहे.
वनस्पती हा पृथ्वीवरील कार्बनचा परमसाठा आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत झाडे त्याचा अन्न बनविण्यासाठी वापर करतात. शेतीकरिता जमिनी उपलब्ध करताना, निर्वणीकरण केल्यावर, नागरी वस्त्यांच्या वाढीकरिता झाडे पडल्यानंतर किंवा औद्योगीकरणाच्या प्रक्रियेत जंगले नष्ट केल्यावर कार्बनचे हे साठे नष्ट होतात. मानवनिर्मित उद्योगांतून, वाहनांतून, औष्णिक ऊर्जा केंद्रांतून बाहेर पडणारा कार्बन शोषून घेण्यास झाडेच उपलब्ध होत नाहीत व हा कार्बन वातावरणात साठून राहतो व पृथ्वीवरच्या तापमानवाढीस मदत करतो. गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर झालेल्या निर्वनीकरणानंतर वातावरणात 9 ते 15 कोटी टन कार्बन साठला आहे आणि कोळसा व खनिज तेलाच्या वापरामुळे 15 ते 18 कोटी टन कार्बन साठला आहे. या निष्कर्षांनुसार, ग्लोबल वॉर्मिंग प्रक्रियेला मानवाच्या कारवाया 70 टक्के जबाबदार आहेत. ऑस्ट्रेलियात पडलेला दुष्काळ आणि युरोपमध्ये निर्माण झालेले उबदार वातावरण हे ग्लोबल वॉर्मिंगचेच दुष्परिणाम आहेत. 21 व्या शतकात पृथ्वीच्या तापमानात सर्वाधिक वाढ झाली आहे. म्हणूनच जगातील सर्वच राष्ट्रांनी ग्रीन हाऊस वायूचे उत्सर्जन कमी करण्याची नितांत गरज आहे.
जागतिक हवामान बदलाचे प्रमुख कारण म्हणजे आपला खनिज इंधनाचा वापर हे आहे. खनिज इंधनाच्या ज्वलनाने आपल्या वातावरणात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढत चालले आहे. नैसर्गिक कर्बचक्रात हवेत असलेला कार्बन डायॉक्साईड वनस्पती प्रकाश संश्लेषणाने पृथ्वीतलावर आणतात. वनस्पती आणि प्राणीसृष्टीतून फिरून हा कार्बन डायॉक्साईड पुन्हा हवेत जातो. आपण खनिज इंधनांचा वापर शक्य तितका कमी करायला हवा हे खरे, पण आपल्या जीवनशैलीशी तडजोड न करता तो शून्यावर आणणे हे कसे शक्य आहे? मग निसर्गचक्राद्वारे हवेतला अधिक कार्बन डायॉक्साईड काढून घेता येईल का? ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा एक पर्याय आहे, पण तो तत्कालीक आहे. झाडांनी निर्माण केलेला जैवभार जाळण्यातून किंवा कुजण्यातून त्यात साठवलेला सगळा कार्बन डायॉक्साईड हवेत परत जातो. जागतिक हवामान बदलावर मात करण्याचा उपाय म्हणजे जैविक कचऱयाचा कोळसा करणे. यामध्ये कचऱयात असलेल्या एकूण कार्बनपैकी तीस टक्के कार्बन कोळसा या स्वरूपात हवेत न जाता मागे राहतो. जर तुम्ही या कोळशाला अजिबात हात लावला नाही तर तो हजारो वर्षे याच स्वरूपात राहणार आहे. थोडक्यात म्हणजे तुमच्या परिसरात चालू असलेल्या नैसर्गिक कर्बचक्रातला तीस टक्के कार्बन तुम्ही चक्राच्या परतीच्या मार्गातून कायमस्वरूपी बाहेर काढू शकता आणि तुमचा नैसर्गिक परिसर ‘कार्बन निगेटिव्ह’ करू शकता!
या कोळशाचे करायचे काय? ज्या वनस्पतींनी हा जैविक कचरा निर्माण केला आहे. त्यांच्याच बुंध्याशी हा कोळसा टाकून द्या. कोळसा ओलावा धरून ठेवतो. मातीतील जिवाणूंना निवासासाठी अधिक जागा उपलब्ध करून देतो आणि अशा रीतीने मातीची सुपिकता वाढवतो. म्हणजेच कंपोस्टचे कामही होते आणि शिवाय हवामान बदलाला शह दिला जातो, असा यात दुहेरी फायदा आहे. कोळसा करणे आणि उघडय़ावर जाळणे या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. योग्य रीतीने रचना केलेल्या भट्टीत कोरडा किंवा तपकिरी जैविक कचरा (यात स्वयंपाकघरातला हिरवा जैविक कचरा मिसळून चालणार नाही.) शास्त्रशुद्ध पद्धतीने जाळला की, धूर किंवा इतर प्रदूषण निर्माण न होता कोळसा तयार होतो. यासाठी अनेक छोटी मोठी उपकरणे संशोधकांनी तयार केलेली आहेत आणि ती कोणालाही सहज वापरता येतील अशी आहेत. तेव्हा एक सामाजिक व पर्यावरणीय कार्य म्हणून आपल्या फावल्या वेळात आपल्या आजूबाजूला पडलेला पालापाचोळा, काडीकचरा अशा कचऱयातून कोळसा तयार करून ‘जागतिक हवामान बदला’च्या विरोधात आपणही आपला खारीचा वाटा उचलू शकतो. आपल्या राहत्या ठिकाणच्या आजूबाजूला वर्षभर जैविक कचरा निर्माण होत असतो. बाल्कनीत किंवा परसात आपणच भाज्या, फुलझाडे इ. लावलेली असतात. आपल्या घराभोवती, शाळेभोवती, कामाच्या जागेभोवती किंवा जवळपास बाग असते, रस्त्याच्या कडेने सावली देणारी किंवा शोभिवंत झाडे असतात. वर्षभर आपल्या परिसरातल्या वनस्पती, पालापाचोळा, काटक्याकुटक्या या स्वरूपात जैव कचरा निर्माण करत असतात.
मुळात हे जैविक पदार्थ म्हणजे कचरा नाहीच. आपण इतस्ततः टाकत असलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, निकामी दिवे, गुटख्याची पाकिटे, विड्डय़ांची आणि सिगारेटची थोटके, कागदाच्या किंवा कापडाच्या चिंध्या हा कचरा आहे. निसर्गात निर्माण होणारे आणि मातीवर पडल्यावर काही तासांत विघटन होऊन जाणार आहे, असे जैविक पदार्थ मातीतील जिवाणूंना खाद्य पुरवतात आणि मातीची सुपीकता वाढवतात, पण आपण आता आपल्या वस्त्यांमध्ये उघडी मातीच राहू दिलेली नाही. त्यामुळे या पदार्थांचा कचरा झालेला दिसतो.
परिसरात निर्माण होणाऱया अशा कोरडय़ा जैविक कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी सध्या आपण दोन पर्यायांचा वापर करतो. सगळा कचरा झाडून एकत्र करायचा आणि जाळून टाकायचा किंवा जैविक खत करायचे. उघडय़ावर कचरा जाळणे हा अयोग्य पर्याय आहे. त्यातून मोठय़ा प्रमाणावर स्थानिक प्रदूषण होते. त्या उलट जैविक खत बनवणे वेळखाऊ आहे. त्यासाठी जागा लागते, रोज लक्ष द्यावे लागते. अर्थात ज्या वनस्पतींनी कचरा बनवलेला आहे त्यांच्यासाठी खत म्हणून त्याचा उपयोग होतो, मात्र या दोन्ही प्रक्रिया जागतिक हवामान बदलाच्या दृष्टीने उदासीन आहेत.






























































