
>> प्रा. विजया पंडित
तापमानवाढीमुळे अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत असतानाच आता एका नव्या अभ्यासानुसार भारतासह काही देशांमध्ये उन्हाचे तास कमी होत असल्याचे समोर आले आहे. वातावरणात एरोसोलचे प्रमाण वाढल्याने ढगांची भाऊगर्दी होते आणि ते दीर्घकाळापर्यंत आकाशात राहतात. त्यामुळे सूर्यप्रकाश रोखला जातो आणि पुरेसे ऊन जमिनीवर पडत नाही. त्यास ‘अल्ब्रेट’ प्रभाव असे म्हणतात. धूलिकण हे सूर्यप्रकाश अडवतात किंवा विखुरण्याचे काम करतात. त्यामुळे जमिनीवर ऊन कमी राहते. यास ‘सोलर डिमिंग’ असेही म्हटले जाते. ऊन कमी झाले तर बरेच होईल असे सामान्यांना वाटू शकते; पण प्रत्यक्षात त्याचे प्रतिकूल परिणाम अन्न सुरक्षेपासून ऊर्जानिर्मितीपर्यंत जाणवू शकतात.
सध्याचे बिघडलेले वातावरण आणि हवामान पाहता स्वच्छ सूर्यप्रकाश इतिहासजमा होतो की काय? अशी भीती मनात निर्माण झाली आहे. यंदा पावसाने कहर केल्यामुळे देशातील अनेक भागांतील नागरिक सकाळच्या वेळची ऊन्हाची कोवळी किरणे अंगावर घेण्यास आतुर झाली आहेत. यात भरीस भर म्हणजे वातावरणात धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोचताना अडचणी येत आहेत. त्यामुळे वेळीच प्रदूषणाला आणि धुळीला रोखले नाही तर भविष्यात पर्यावरण संकट आणखी गडद होऊ शकते.
शास्त्रज्ञांच्या एका अभ्यासानुसार हवेत सध्या ‘एरोसोल’चे प्रमाण वाढले आहे. परिणामी भारतातील अनेक ठिकाणी पुरेशा प्रमाणात ऊन पडत नसल्याचे दिसते. कोवळ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी राहत असल्याने अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने जो भाग उन्हावर अवलंबून आहे, तेथे सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. भारताचा पश्चिम किनारपट्टी भाग, हिमालयाचा भाग, दख्खन पठार आणि पूर्व किनारपट्टीच्या भागात उन्हाचे तास कमी होत आहेत. हा अभ्यास बनारस हिंदू विद्यापीठ, पुण्यातील उष्ण कटिबंधीय हवामान शास्त्र संस्था आणि भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन केला आहे. या अभ्यासासाठी 1988 ते 2018 या दहा वर्षांच्या कालावधीत भारतातील नऊ भौगोलिक क्षेत्रे आणि 20 हवामान शास्त्र केंद्रातून डेटा गोळा करण्यात आला. त्यातील आकडेवारीनुसार, एरोसोलचे प्रमाण वाढताना प्रदूषण, पाऊस, आर्द्रता आणि हवामान बदलामुळे वातावरणात बदल दिसत आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, वातावरणात एरोसोलचे प्रमाण वाढणे हे हवा प्रदूषित होण्याचे प्रमुख कारण आहे. एरोसोलमध्ये हवेतील धूलिकण, काजळी आणि राख यांसारख्या प्रदूषित तत्त्वांचा समावेश असतो आणि ते हवेत तरंगत राहतात. कारखान्यातून बाहेर पडणारी राख, वाहन आणि बांधकाम, वीटभट्टी या ठिकाणांवरून बाहेर पडणारा धूर किंवा धूळ हे हवेत सूक्ष्म रूपात फिरत राहतात. त्यामुळे एरोसोलचे प्रमाण वाढते. पंजाब, हरयाणासारख्या शहरात काडीकचरा जाळण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याने ते प्रदूषणात भर घालण्याचे काम करतात.
पृथ्वीवर पडणाऱ्या उन्हाच्या किरणांच्या कालावधीला सनशाईन अवर (एसएसएच) असे म्हटले जाते. भारताच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला दरवर्षी सरासरी 2300 तास ऊन मिळत असे, पण 2000 नंतर या भागात सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. या ठिकाणी दरवर्षी सरासरी 8.62 तास सूर्यप्रकाश कमी राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. या भागात सर्वाधिक ऊन हिवाळ्यात पडते आणि पावसाळ्यात मात्र त्याचे प्रमाण कमी राहते.
उत्तर भागात कोलकाता, नवी दिल्ली आणि अमृतसरच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता या शहरांना दर महिन्याला सरासरी 187 तास ऊन मिळत असे, परंतु या ठिकाणी वर्षाकाठी 13 तासांनी ऊन कमी होताना दिसत आहे.
भारताच्या मध्य भागात बंगळुरू, नागपूर, हैदराबाद येथेही अशीच स्थिती आहे. 1988 ते 2007 या काळात येथे ऊन वाढताना दिसत असे. मात्र 2008 नंतर त्यात घसरण होण्यास सुरुवात झाली. मान्सूनपूर्व दिवसांत आणि पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी होता, तर त्याच वेळी हिवाळ्यात काही कारणांमुळे विशिष्ट ठिकाणी सूर्यप्रकाशाचे प्रमाण अधिक होते. मध्य भारतात वार्षिक 2449 तास सूर्यप्रकाश मिळत होता. मात्र 1988 ते 2018 या काळात यात दरवर्षी सरासरी 4.71 तासांनी घट होताना दिसत आहे. अर्थात ईशान्य भारतात हा ट्रेंड कमी दिसून आला. गुवाहाटी अणि दिब्रुगडच्या आकडेवारीनुसार, एकुणातच 1998 ते 2018 या काळात सूर्यप्रकाशाच्या तासांत किरकोळ घसरण पाहावयास मिळाली. त्याच वेळी हिमालयाच्या भागात गेल्या दोन दशकांत उन्हाचे तास कमी होताना दिसून येत असून त्याचा दर सुमारे 9.5 तास प्रतिवर्ष आहे. अरबी समुद्रातील मिनिकॉय आयलॅण्ड आणि बंगालच्या खाडीत पोर्ट ब्लेअरमध्ये ऊन्हाचे तास मागील 30 वर्षांत कमी झाल्याची नोंद झाली असून वर्षाकाठी उन्हाचे 5.7 ते 6.1 तास कमी झाले आहेत.
चीनमध्येदेखील असेच चित्र पाहावयास मिळाले होते. 1980 आणि 1990 च्या दशकांत चीनने औद्योगिकीकरणाचे दरवाजे खुले केले. अनेक कारखाने, औष्णिक विद्युत प्रकल्प आणि उद्योगांची उभारणी केली होती. त्यामुळे चीनच्या वातावरणात प्रचंड प्रमाणात धूलिकण निर्माण झाले. सूर्यप्रकाशाची ऊब मिळेनाशी झाली. उपग्रहाच्या आकडेवारीनुसार, सोलर रेडिएशनमध्ये दहा ते वीस टक्क्यांपर्यंत घट झाली होती. बीजिंग येथे 1960 च्या दशकात वार्षिक 2600 तासांपर्यंत ऊन पडत असल्याची नोंद होती. त्यात घसरण होत हे प्रमाण 2200 तासांवर आले. चीनने या स्थितीचे गांभीर्य ओळखले आणि 2005 नंतर प्रदूषण नियंत्रणात बऱ्यापैकी सुधारणा घडवून आणली. धोरणात आणि तंत्रज्ञानात बदल घडवून आणला. हवेतील प्रदूषण रोखणे आणि नियंत्रण कार्य योजना 2013 लागू केली. कोळशावर आधारित औष्णिक प्रकल्प बंद केले किंवा त्यात सुधारणा केली. बीजिंग आणि शांघाय यांसारख्या शहरांतील उद्योगांना शहराबाहेर स्थलांतरित करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास दंड आकारण्यास सुरुवात केली.
वाढते औद्योगिकीकरण अणि शहरीकरणामुळे ब्रिटन, जपान, अमेरिका आणि जर्मनीत सूर्यप्रकाशाचे तास कमी झाले. मात्र अलीकडच्या काळात त्यात सुधारणादेखील झाली आहे. भारतात मात्र सूर्यप्रकाश कमी असणे हा पर्यावरणाचा गंभीर इशारा आहे. त्यामुळे ऊर्जा, कृषी, आरोग्य आणि हवामान बदलावर नकारात्मक परिणाम होत आहे. त्याच वेळी हवामानाचा अंदाज सांगणेदेखील कधी कधी अडचणीचे ठरते. म्हणूनच भारताला सर्वसमावेशक पर्यावरण धोरण आणावे लागणार आहे. कारण जेथे थेटपणे सूर्यप्रकाशाची गरज असते आणि तेथेच ऊन कमी पडू लागले तर स्थानिक घटकांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. सूर्यप्रकाशाचे तास कमी झाले तर सौर ऊर्जा कमी तयार होऊन वीज उत्पादनावर दहा ते वीस टक्के परिणाम होईल आणि त्यामुळे भारताच्या सौर ऊर्जा मोहिमेला अडथळा येऊ शकतो. याशिवाय कृषी क्षेत्रावर त्याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. पिकांना अंकुर फुटण्यासाठी पुरेसे ऊन मिळाले नाही तर अन्न सुरक्षेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. रोपे, वनस्पती, झाडे वाढण्याचे प्रमाण कमी होऊ शकते तसेच त्यांची उंची खुटण्याचाही धोका आहे. धान, गहू, कापूस यांसारख्या पिकांनादेखील त्याचा फटका बसू शकतो. अधिक धुके अणि प्रदूषणामुळे श्वसन विकार वाढण्याचाही धोका आहे. कमी ऊन असल्याने शरीराला ‘व्हिटॅमिन डी’ मिळण्यासही अडचणी येतील आणि त्याचा थेट परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर पडेल.



























































