>> प्रशांत गौतम
संभाजीनगर येथील गरुड जाहिरात संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा यंदाचा गोविंद सन्मान पुरस्कार परभणी येथील गोंधळ महर्षी गुलाबराव कदम यांना नुकताच जाहीर झाला. त्याचे वितरण उद्या 27 मार्च रोजी शहरातील कलश मंगल कार्यालयात होत आहे. महाराष्ट्राच्या कसदार मातीत अनेक लोककला उदयास आल्या. त्यातीलच एक लोककला म्हणजे गोंधळ होय. गोंधळ कलेस जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्याचे काम केले ते परभणीच्या राजारामबापू कदम गोंधळी यांनी. वयाच्या 100 व्या वर्षी 1986 साली पॅरिसमध्ये आयोजित भारत महोत्सवात बापूंनी परभणीचा गोंधळ पॅरिसमध्ये पोहोचवला. बापूंच्या आधीच्या पिढीपासून चालत आलेला हा गोंधळ लोककलेचा वारसा आज सहाव्या पिढीपर्यंत जोमाने जतन केला जात आहे. ज्यांना यंदाचा गोविंद सन्मान लाभतो आहे, ते गुलाबराव कदम चौथ्या पिढीचे प्रतिनिधी असून वयाच्या 75 व्या वर्षात ते आपल्या कार्यक्षेत्रात योगदान देत असतात. 105 व्या वर्षापर्यंतचे संपन्न, समृद्ध आयुष्य लाभलेल्या बापूंनंतर कलासंचयाचा वारसा बापूंचे चिरंजीव राधाकृष्ण कदम यांनी 2016 पर्यंत सांभाळला. आज ती धुरा अर्थातच राधाकृष्णांचे चिरंजीव आणि बापूंचे 75 वर्षीय नातू गुलाबराव सांभाळत आहेत. आजोबांचे अनेक गुण नातवाने आत्मसात केले. अगदी दोघांची चेहरेपट्टी, बापूंसारखाच पहाडी आवाज, करडी नजर, स्वभाव धीटपणा, चेहऱयावरील हावभाव तसेच 60 मीटरचा अंगरखा आणि 150 हाताचे पागोटे…त्यांना पाहून राजारामबापूंची आठवण यावी, एवढे साधर्म्य आजोबा व नातवात दिसते. गोंधळ सादर होत असताना बापूच आपली कला नातवाच्या माध्यमातून सादर करतायत की काय, असा भास प्रेक्षकांत होत असतो. गुलाबरावांनी कालपरत्वे आपल्या संचात बदल केले. पण गोंधळ लोककलेच्या मूळ बाजास धक्का पोहोचतील असे नव्हते. राजारामबापूंनी घालून दिलेला वारसा चौथ्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी अविरत जोपासला आहे आणि तोच पुढे सहाव्या पिढीतील नवोदित कदम मंडळी आज जोपासत आहे. विशेषतः भरत दिगंबर कदम, प्रल्हाद कदम हे बापूंचे पणतू. अनुक्रमे संबळ वाद्य, तालवाद्य या कला प्रकारातील निपूण, उच्च विद्याविभूषित आहेत, तर गुलाबरावांचे चिरंजीव हरिभाऊ आणि रामदास दिगंबर कदम हे नाटय़शास्त्र्ााचे पदवीधारक आहेत. गुलाबराव कदम यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून शासनाच्या जनजागृती कार्यक्रमात कलावंत म्हणून सहभाग दिला. त्यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर भोपाळ, हैदराबाद, बंगळुरू, तमकूर (कर्नाटक) कोलकाता आणि नवी दिल्ली येथे आयोजित सांस्कृतिक, पर्यटन महोत्सवात तसेच राष्ट्रीय महोत्सवात त्यांनी हजेरी लावली. कदमांच्या गोंधळ संचाचे खास वैशिष्टय़ म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे संगीत नाटक अकादमीचे तीन पुरस्कार राजारामबापू, राधाकृष्ण आणि प्रल्हाद कदम यांना अनुक्रमे 1984, 2012, 2015 या वर्षी लाभले. कै. रामराम बापूंनी जागतिक पातळीवर गोंधळ सादर केल्यानंतर देशातील अनेक दिग्गज कलावंतांसमोर ही कला प्रायोगिक प्रशिक्षण देण्यासाठी सादर करण्यात आली. विविध विद्यापीठांच्या नाटय़शास्त्र्ा विभागातून या कलेबाबत प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू झाला. आज नवनवीन अभ्यासक या कला प्रकाराचा संशोधन व प्रबंध या दृष्टीने विचार करीत आहेत. कदमांच्या कुटुंबातील सहावी पिढी या गोंधळ परंपरेच्या नवनवीन आविष्कारासाठी सज्ज आहे. गुलाबरावांना शासनाच्या वतीने जिल्हास्तरीय कलावंत म्हणून ‘क’ दर्जाचे वयोवृद्ध कलावंताचे मानधन दिले जाते. खरे तर दोनेक वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन गेला. त्यामुळे ते सध्या कार्यक्रम करू शकत नाहीत. मात्र पारंपरिक कला जीवंत राहावी यासाठी ते याही वयात प्रयत्नशील असतात. नव्या पिढीला, अभ्यासकांना त्यांचे होणारे मार्गदर्शन नक्कीच महत्त्वाचे असते.































































