वेब न्यूज – गुगलवर हेरगिरीचा आरोप

449

फेसबुक आणि चीनच्या अनेक ऍप्सवर युजर्सच्या माहितीची चोरी केल्याचा आरोप हा कायमच केला जात असतो. जगभरच या कंपन्या त्यासाठी बदनाम झालेल्या आहेत. मात्र आत गुगलसारख्या दिग्गज टेक कंपनीवरदेखील युजर्सची हेरगिरी करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. ‘The Information’ने दिलेल्या रिपोर्टनुसार गुगल कंपनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी ऍण्ड्रॉईड युजर्सची माहिती त्यांच्या नकळत गोळा करते आहे आणि त्यासाठी कंपनी आपल्या ‘ऍण्ड्रॉईड लॉकबॉक्स’ याअंतर्गत प्रोग्रामची मदत घेत आहे. या प्रोग्रामच्या मदतीने गुगलसंबंधित ऍण्ड्रॉईड युजरने दिवसभरात कोणते ऍप किती वेळा उघडले, त्या ऍपचा वापर त्याने किती वेळेसाठी केला, काय केला या सर्वांची माहिती गोळा करते आहे.

फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांची माहितीदेखील याद्वारे गुगल गोळा करते आहे आणि त्याच्या मदतीने आपल्या नवनव्या फीचर्सची डेव्हलपमेंट अधिक चांगली व वेगळ्या प्रकारे करते आहे. ‘ऍण्ड्रॉईड लॉकबॉक्स’च्या मदतीने गुगलचे तंत्रज्ञ ऍण्ड्रॉईड युजर्सवर पाळत ठेवतात आणि त्यांच्या मोबाईलमधील डाटादेखील ऍक्सेस करतात. त्यामुळे काही महत्त्वाची माहिती गुगलपर्यंत पोहोचते.

गुगल केवळ फेसबुक आणि इन्स्टाग्रामच नाही, तर मोबाईलमध्ये असलेल्या इतरही ऍप्सच्या वापरावर हेरगिरी करत असल्याचे हा रिपोर्ट सांगतो. या हेरगिरीतून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून मग गुगल आपल्या ऍप्सच्या सेवा सुधारण्यावर किंवा नवीन ऍप्स तयार करण्यासाठी या माहितीचा वापर करते. ज्या ऍण्ड्रॉईड मोबाईलमध्ये गुगलची ऍप्स प्री इन्स्टॉल आहेत, ते तर या हेरगिरीला हमखास बळी पडत आहेत. गुगलने मात्र आपल्यावरील या सर्व आरोपांना नाकारलेले आहे. आपण फक्त स्पर्धात्मक माहिती गोळा करत असून ही गोळा केलेली माहिती कोणत्याही इतर कंपनी अथवा व्यक्तीशी शेअर केली जात नाही, ती गुगलकडेच सुरक्षित राहते असा दावा केला आहे. गुगलचा हा दावा कितपत खरा आहे हे काही दिवसांत स्पष्ट होईलच.

आपली प्रतिक्रिया द्या