
>> दिलीप जोशी n [email protected]
आपल्या अफाट अभिनयाने हॉलीवूडचा पडदा गाजवणारे अनेक कलाकार आहेत. त्यापैकी आजच्याच तारखेला जन्मलेले आणि 87 वर्षे प्रसिद्धीच्या वलयातलं जीवन जगलेले ग्रेगरी पेक आणि 3 एप्रिल ही जन्मतारीख आहे असे ‘गॉडफादर’ गाजवणारे मार्लन ब्रॅन्डो हे दोन दिग्गज.
ज्या काळात आपल्याकडे सिनेमा सर्रास पाहिला जात नव्हता किंवा गावोगावी थिएटरं नव्हती, त्या काळात हॉलीवूडच्या सिनेमाने चांगलाच जम बसवला होता. मुंबईसारख्या शहराला पाश्चात्त्य संस्कृतीचा बराच परिचय असल्याने इथल्या काही मोजक्या सिनेमागृहांत परदेशी (इंग्लिश) चित्रपट प्रदर्शित व्हायचे आणि बहुतेक वेळा त्या काळी कॉलेजमध्ये असलेली तरुणाई या सिनेमांचे प्रेक्षक असायची. त्यावेळचे ते चित्रपट तंत्रज्ञान आणि कथानक या दोन्ही दृष्टींनी किती आगळेवेगळे असायचे याचा प्रत्यय यायचा. हिरो किंवा हिरोईन ही मंडळी केवळ ‘छान दिसणं’ एवढय़ा गुणवत्तेवर पडदा गाजवत नसत, तर त्याबरोबर सकस अभिनयही असायचा. आपल्याकडेही अशा अनेक ताकदीच्या अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी पडदा गाजवलेला आहेच, परंतु इंग्लिश चित्रपटाचं तंत्रज्ञान मात्र त्यांच्या सुबत्तेमुळे चार पावलं पुढे असायचं.
मार्लन ब्रॅन्डो आणि ग्रेगरी पेक विसाव्या शतकातले ‘ऑल टाइम ग्रेट’ असणारे अभिनेते, मार्लन ब्रॅन्डो यांना तर त्यांच्या 60 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत दोनवेळा ऑस्कर मिळालं. त्यातलं एक त्यांनी अमेरिकेतील मूळ निवासींना चांगली वागणूक मिळत नसल्याच्या निषेधार्थ नाकारलं. त्यांचं पहिलं ‘ऍकॅडेमी ऍवॉर्ड’ म्हणजेच ऑस्कर त्यांना मिळालं ते ‘ऑन द वॉटरफ्रन्ट’ या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी. याशिवाय ‘गोल्डन ग्लोब’सारख्या पुरस्कारांचे ते मानकरी होतेच. 1944 ते 51 हा त्यांच्या कारकीर्दीचा पहिला टप्पा. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या वर्षात सुरू झालेला. 1951 नंतरची काही वर्षे मार्लन यशाच्या शिखरावर विराजमान झाले होते.
1963 नंतर त्यांची कारकीर्द काहीशी झाकोळली. असे ‘बॅड पॅच’ अनेक मोठय़ा व्यक्तींच्या आयुष्यात येतात….आणि अचानक 1972 मध्ये त्यांना ‘गॉडफादर’ या विलक्षण गाजलेल्या चित्रपटातील ‘डॉन’ची भूमिका मिळाली. पॅरामाउंट फिल्म कंपनीच्या या चित्रपटाचं कथानक होतं मारिओ प्युझो यांचं. या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक यांच्यात ‘डॉन’च्या भूमिकेची चर्चा होऊन दोनच नावं पुढे आली. लॉरेन्स ऑलिविए आणि मार्लन ब्रॅन्डो. त्यात ब्रॅन्डो यांची झालेली निवड त्यांनी सार्थ ठरवली. अनेक वर्षांनी पुन्हा एकदा जगभरच्या प्रेक्षकांनी या ‘डॉन’ला डोक्यावर घेतलं.
अर्थात त्यांचे पाय मात्र कायम जमिनीवर राहिले. आफ्रिकन, अमेरिकन लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणारे मार्टिन ल्युथर किंग यांच्या चळवळीला ब्रॅन्डो यांचा पाठिंबा होता. तशीच अमेरिकेतल्या मूळ निवासी लोकांच्या हक्काच्या लढय़ालाही त्यांनी मदत केली. सामाजिक न्यायाची बाजू सतत मांडली. उतारवयात मार्लन ब्रॅन्डो मायकेल जॅक्सन या प्रसिद्ध गायकाचे मित्र झाले. मृत्यूनंतर आपलं दहन करावं अशी त्यांची इच्छा होती.
ग्रेगरी पेक या दुसऱ्या उत्कृष्ट अभिनेत्याचे अभिनयाविष्कार दाखवणारे अनेक चित्रपट, पण पत्रकारांच्या लक्षात राहील असा 1953 मधला ‘द रोमन हॉलिडे’ (त्यात ग्रेगरी पत्रकाराच्या भूमिकेत आहे. रोममधल्या राजवाडय़ातून शिष्टाचाराच्या कृत्रिम जीवनाला वैतागलेली राजकन्या सर्वांची नजर चुकवून पळ काढते आणि उत्तररात्री ग्रेगरीला भेटते. राजकन्येचं अप्रतिम काम ऑड्री हेपबर्न या सुंदर अभिनेत्रीने केलंय. अवघ्या एका रात्रीची ही कहाणी. राजकन्या ‘गायब’ झाल्याचं वृत्त खरं तर पत्रकार म्हणून खूपच महत्त्वाचं असतं. त्याच्यावर सतत डाफरणाऱ्या बॉसला खूश करण्याची आयती संधी ग्रेगरीला मिळालेली असते. राजकन्या अनामिक होऊन एका रात्रीचं सामान्य जीवन जगते. दुसऱ्या दिवशी ग्रेगरीबरोबर फिरते आणि दोघं परस्परांना आवडू लागण्याच्या क्षणी ‘जागी’ होऊन पुन्हा राजवाडय़ात परतते. तिच्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित असलेल्या या औट घटकेच्या प्रेमिक पत्रकाराशी राजकन्या अलिप्तपणे वागते. तोसुद्धा तिचे काल घेतलेले फोटो प्रामाणिकपणे परत करतो आणि कथा संपते.
शेवटच्या दृश्यात राजकन्या राजवाडय़ाच्या आतल्या दालनात निघून जाते. सारे पत्रकार निघून जातात आणि ग्रेगरी (सिनेमातला) एकटाच उरतो तो क्षण प्रेक्षकांना हेलावून टाकतो. आपल्याकडे त्यावरूनच राज कपूरचा ‘चोरी चोरी’ चित्रपट आला, पण आपल्या प्रेक्षकांना कथेचा सुखान्त पाहायला आवडतो. ‘रोमन हॉलिडे’ची कथा त्यामुळेच अधिक वास्तववादी वाटते. …तर अशा ग्रेगरी पेकला या चित्रपटासाठी ‘गोल्डन ग्लोब’ आणि कालांतराने ‘टू किल अ मॉकिंग बर्ड’ मधल्या ऍटिकसच्या भूमिकेसाठी ऑस्कर मिळालं. ग्रेगरी पेक यांनी 87 वर्षांचे हेऊन 2003 मध्ये, तर ब्रॅन्डो यांनी 80 वर्षांचं जीवन पूर्ण करून 2004 मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांचं पडद्यावरचं अस्तित्व मात्र अजूनही उपलब्ध आहे. कधीकाळी जमलं तर किमान हे दोन चित्रपट जरूर पहा.

























































