मुद्दा – याचा विचार केला आहे का?

>> गुरुनाथ वसंत मराठे

मालवाहक ट्रक, टेम्पोमधून प्रवासी वाहतूक हे वृत्त (सामना 17 मे) वाचून खूप वाईट वाटले. मुंबई -पुण्यात लाखो मजूर लॉक डाऊनमुळे अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांना कधी एकदा आपले घर गाठतो, असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, त्यांच्या या इर्षेपायी ते अविचाराने थेट मृत्यूच्या दारात मात्र पोहोचत आहेत. सरकारतर्फे एसटी बसेस तसेच रेल्वेगाडय़ादेखील त्यांच्यासाठी चालू केल्या आहेत. परंतु रेल्वे किंवा एसटीने प्रवास करायचा म्हटला म्हणजे रांगेत उभे राहावे लागते. तसेच प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाते. कोणाला सर्दी, ताप, खोकला नाही ना? याचे डॉक्टरकडून प्रमाणपत्र मिळवल्यावरच प्रवाशांना प्रवास करता येतो. जे खरे तर शास्त्रीयदृष्टय़ा तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य आहे. पण या सर्व प्रक्रियेमध्ये आपला किती वेळ जाणार? त्यामुळे आपला नंबर कधी लागणार? असे प्रश्न त्यांच्या मनात उभे राहतात आणि या सर्व गोष्टींना बगल देऊन ही मंडळी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करण्याचे धाडस करतात. आज तसेच सर्वत्र सुरू आहे. ट्रक आणि टेम्पोमधून प्रवास करायचा म्हटला की, तेथे कोणत्याही तपासणीचा प्रश्न येत नाही. किती ट्रक-टेम्पो मालकांकडे या हद्दीतून त्या हद्दीत जाण्याचा परवाना आहे हा प्रश्नच आहे. तरीही ही मंडळी राजरोजपणे वाहने चालवत आहेत. अर्थात त्यावर पोलिसांनी कारवाई केली ते बरेच झाले. ट्रक-टेम्पोचे भाडे दिले की प्रश्न मिटतो, परंतु या ट्रक-टेम्पोमध्ये माणसे अक्षरश: मेंढरांसारखी कोंबली जातात. अनेकांच्या तोंडाला मास्क बांधलेला नसतो. साहजिकच सगळ्याच नियमांची ‘ऐशी कि तैशी’ होते. सध्या ट्रक तसेच टेम्पोचालक यांना रस्ता मोकळा मिळत असल्यामुळे वाहने भरधाव चालवली जातात. त्यामुळे अपघातांच्या दुर्घटनाही घडताना दिसत आहेत. शिवाय सरकारने दारुची दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यामुळे चालक मद्यप्राशन करून गाडी चालवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपघात आणि दुर्घटनांची शक्यता वाढते. हे असले सर्व गैरप्रकार सुरू असताना, पोलीस तरी किती ठिकाणी पुरे पडणार आहेत? शेवटी प्रश्न हा की, उद्या जे कोणी त्यांच्या गावी सुखरूप पोहोचतील त्यातील कोणाला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली असेल तर ती त्यांच्या कुटुंबाला तसेच तसेच आजुबाजूच्या लोकांना किती महागात पडेल? याचा विचार घरच्या ओढीने आपापल्या राज्यात आणि गावी जाणाऱयांनी केला आहे काय?

आपली प्रतिक्रिया द्या