शब्दचित्र – इतिहास संशोधनाची साधना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुणचंद्र शं. पाठक

प्रा. अरविंद जामखेडकर हे कलेतिहास, पुरातत्व व प्रतिमा-विज्ञानांचे विशेषज्ञ असून पुरातन हिंदुस्थानी संस्कृती या विषयाचे गाढे अभ्यासक आहेत. महाराष्ट्रातील इतिहासाचा व्यापक उलगडा होण्यात डॉ. जामखेडकर सरांचे अमूल्य योगदान आहे. पुरातत्व, लयनस्थापत्य, मंदिरस्थापत्य, मूर्तिशास्त्र, कलेचा इतिहास, जैन व बौद्ध तत्वज्ञान अशा अनेक विषयांतील त्यांच्या संशोधनात त्यांनी आपल्या साधनेचा ठसा उमटवला आहे. डॉ. जामखेडकर यांना 6 जुलै रोजी वयाची 81 वर्षे पूर्ण होत आहेत. या सहस्र चंद्रदर्शन सोहळय़ानिमित्त हा लेख.

डॉ. अरविंद जामखेडकर यांना 6 जुलै 2020 रोजी वयाची 81 वर्षे पूर्ण होत आहेत. सहस्र चंद्रदर्शनाचा हा दिवस त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी साजरा केला. त्या निमित्ताने त्या विद्यार्थ्यांनी ‘प्रत्नरत्नम’ हा गौरवग्रंथ प्रकाशित केला. त्यात शुभा खांडेकरांनी काढलेले एक व्यंगचित्र समाविष्ट केले आहे. या व्यंगचित्रात दाखवलेल्या घोडय़ांच्या तबेल्यात अनेक घोडे असून त्यात असलेल्या पुरातत्व, लयनस्थापत्य, मंदिरस्थापत्य, मूर्तिशास्त्र्ा, कलेचा इतिहास, जैन व बौद्ध तत्वज्ञान, अर्धमागधी व संस्कृत भाषेवरील प्रभुत्व व पक्की मांड असणारे आणि या सर्व घोडय़ांवर एकाच वेळी सारख्याच क्षमतेने आरूढ होणारे जामखेडकर सरांचे व्यक्तिमत्व असल्याचा उल्लेख केला आहे, तो सर्वथा योग्य आहे. त्यामुळेच शुभा खांडेकरांनी काढलेले हे व्यंगचित्र यथार्थ वाटते.

त्यांच्या व्यक्तित्वाला विविध आयाम आहेत. जाणीवपूर्वक जोपासलेल्या ज्ञानवृक्षाला विविध प्रकारची फळे लगडलेली पाहून मनाला स्वाभाविकतःच प्रसन्नता मिळते. एकीकडे ज्ञानसाधनेचे फळ म्हणून विविध पदे प्राप्त झाली. तरी त्याबद्दल कुठलाही अनावश्यक अभिमान न बाळगता, सर्वसामान्यांबरोबर ते लीलया वावरत असतात. डेक्कन कॉलेजचे कॅण्टीन असो किंवा भारतीय इतिहास संशोधन मंडळासमोरील दुग्धालय असो, तेथे अगदी सहजपणे तरुण मित्रांबरोबर बसून ते गप्पा मारतात. अध्यक्षांसाठी असलेली विद्यापीठाची गाडी आली नाही किंवा आपल्याविषयीचे शिष्टाचार आपल्या हाताखालच्या सहकाऱयांकडून पाळले गेले नाही तरी ते अजिबात खंत व्यक्त करत नाहीत. एखाद्या सहकाऱयाच्या स्कूटरवर मागे बसून जाण्यात त्यांना वावगे वाटत नाही. पदाच्या प्रतिष्ठsपेक्षा ज्ञानसाधनेचा मोह त्यांना अधिक महत्त्वाचा वाटतो.

डॉ. बर्जेस यांनी केलेल्या ब्राह्मणी लेण्यांच्या वर्गीकरणानंतर आजपर्यंत ज्ञात नवीन बाबींच्या आधारे त्यांनी नव्याने लेण्यांचा कालक्रम निश्चित केला. त्यांनी केलेली ही वर्गवारी उल्लेखनीय ठरते. महाराष्ट्रातील नागर, विशेषतः लतीन नागर आणि भूमिज शिखरे असलेल्या मंदिरांची तसेच फांसना व अन्य शिखर शैलींची नोंद घेतली गेली. शिल्पशैलीबाबतचे त्यांचे निरीक्षण विलक्षण असून महाराष्ट्रीय शिल्पशैलीवरील लगतच्या प्रादेशिक शिल्पशैलीचा जाणवणारा परिणाम तसेच यादवांच्या ताब्यातील विशाल भूप्रदेशातील शिल्पांवर लगतच्या परिसरात विकसित होणाऱया शिल्पशैलीचा पडलेला प्रभाव ते स्पष्ट करतात. सोळंकी, कलचुरी आणि उत्तर चालुक्यांच्या शिल्पशैलीमध्ये साधर्म्य नेमके कोठे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

वाकाटक कालखंड हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. वॉल्टर स्प्रिंग याने केलेल्या प्रचंड कामानंतर अजिंठय़ाच्या पलीकडे जाऊन, विशेषतः विदर्भात त्यांनी केलेले काम निश्चितच उल्लेखनीय आहे. रामटेक येथे यापूर्वी वा. वि. मिराशी यांनी केलेले काम लक्षात घेऊनसुद्धा ज्याची गणना आतापर्यंत भोसलेकालीन मंदिरे अशी केली जायची, त्या मंदिरांतील भोगाराम मंदिर (खरेतर येथे स्वामी चक्रधरांचे वास्तव्य होते) रुद्र नृसिंह व केवल नृसिंहाची दोन मंदिरे हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या संशोधनामुळे स्पष्ट झाली. शिवाय येथे केवल नृसिंह मंदिरात भिंतीवर कोरलेला लेख मिळाला. त्यात ‘प्रभावती स्वामीन्’ नावाचे मंदिर उभारले होते, वसुदर्शन नामक तलाव खोदला अशी नोंद आहे. रुद्रनृसिंहाची प्रतिष्ठापना निश्चितपणे रुद्रसेन याने (इ.स. 390-395) केली असावी. या बाबी त्यांच्या संशोधनामुळेच स्पष्ट झाल्या. तसेच रामटेक येथील वराहमूर्ती व मंडप, त्रिविक्रम मूर्ती व एक चतुर्भुज विष्णुमूर्ती यांचा उल्लेख मिराशींनी यापूर्वी केला होता. तथापि सरांच्या प्रयत्नामुळे वाकाटककालीन असलेल्या ज्या वास्तू स्पष्ट झाल्या त्यात नागरा, जिल्हा गोंदिया व मांढळ येथील उत्खनन शिवाय या उत्खननामध्ये ज्या वैशिष्टय़पूर्ण विविध मूर्ती मिळाल्या त्या द्वादशशिव, दुर्गा, सोमास्कंद मूर्ती, विष्णूमूर्ती मिळाल्या. नागपूर विद्यापीठ व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने केलेल्या कामामुळे मनसर येथील विटांतील भव्य वास्तू व मंदिराचे अवशेष स्पष्ट झाले. मंदिरातील कूर्मचितीचे अवशेष स्पष्ट झाले. भटाळा येथील लहान स्वरूपातील नृसिंह शिल्प, शिवलिंग व अनेक अवशेष हे राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या व्यापक गवेषण व संशोधनामुळे स्पष्ट झाले.

एक संपन्न आयुष्य त्यांच्या वाटय़ाला आले. कारकीर्दीच्या प्रारंभीच्या काळात विविध क्षेत्रांतील विद्वानांचा सहवास त्यांना लाभला. त्याच काळात सिद्धेश्वर शास्त्र्ााRसारख्या व्यक्तीसोबत काम केल्याने त्यांची चांगलीच तयारी झाली. आपल्या साधनेचा ठसा आणि प्रज्ञेचा दरारा निर्माण करू शकले. ते प्रत्येकाला आपलेच वाटतात व कोणीही त्यांना स्पष्टपणे काही म्हणण्यास धजावत नाही. व्यक्तिगत फायद्यासाठी सर कोणत्याही कामात तडजोड करत नाहीत. अगदी त्यांच्याविषयी गौरवग्रंथ काढण्याचा निर्णय त्यांच्या विद्यार्थ्यांनी घेतल्यावर त्यालाही नकार देणारे किंवा दीर्घकाळ मान्यता न देणारे सर कुठल्याही कामाचा दर्जा व गुणवत्ता या बाबतीत अत्यंत आग्रही व काटेकोर असतात.

सन 1985 मध्ये जागतिक धर्मपरिषदेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व त्यांनी केले, तर सन 1988 मध्ये एशियाटिक सोसायटी, मुंबई या मान्यवर संस्थेने त्यांना रजतपदक देऊन त्यांचा सत्कार केला. देश-विदेशात मिळालेली मान्यता व विपुल प्रसिद्धी यांच्याही पलीकडे जाऊन समर्पित वृत्तीने कार्यरत असणारे सर वयाची शंभरी ओलांडूनही असेच कार्यमग्न असतील अशी आम्हाला खात्री वाटते.

डॉ. जामखेडकर हे इ.स. 1977 ते 1997 या सलग वीस वर्षांच्या काळात संचालक- राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभाग म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी जे संशोधन केले आणि विविध ठिकाणी उत्खनने केली, त्यात नैकुंड, माहूरझरी, नागरा, सोअनेर, खैरवाडा, भागीमारी यांसारख्या महापाषाणयुगीन स्थळांचा समावेश असलेली स्थाने तसेच मुलचेरा आणि विवेकानंद पुरम, मांढळ, वाशीम, अमलापुरी यांसारखी वाकाटककालीन स्थळे, राष्ट्रकूट काळातील कंधार या व अशा अनेक स्थानांचा समावेश होता. आजपर्यंत गुप्तकाळ हा सुवर्णयुगीन कालखंड म्हणून कलाइतिहासकारांनी मांडला होता. तथापि याला वाकाटक-गुप्त कालखंड म्हणायला हवे असे ते अधोरेखित करतात व त्याही पलीकडे जाऊन अजिंठा येथील अभिजात कलेची मूळ प्रेरणा ते विदर्भात शोधतात हे विशेष आहे. कुठल्याही अभ्यासकाने हाती घेतलेल्या संशोधनाला किती भरीव प्रमाणात यश येऊ शकते हे त्यांच्या कामाकडे पाहिल्यावर स्पष्ट होते. महाराष्ट्रातल्या लेण्यांना व मंदिरांना वारंवार जाणीवपूर्वक भेट देणारा एकमेव संचालक अशी तर त्यांची नोंद करावी लागतेच. शिवाय आपल्या विलक्षण झपाटय़ामुळे व सूक्ष्म निरीक्षण दृष्टीमुळे त्यांनी व्यक्त केलेली विविध प्रमेये त्यांच्या विविध स्फुटलेखनातून वेळोवेळी प्रकट झाली आहेत. त्यांची व्याख्याने अभ्यासकांसाठी नेहमीच दिशादर्शकाचे काम करत असतात. त्यांच्याबरोबर मुक्तपणे गप्पा मारणे, यापेक्षा त्यांना बोलते करणे म्हणजे अखंड प्रवाहित असणाऱया ज्ञानसरितेचा अनुभव घेणे असे ठरते.