प्रासंगिक – पवित्र पूजनीय तुळस

727

>> प्रज्ञा कुलकर्णी

दिवाळीतले नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज हे सण धूमधडाक्यात पार पडल्यावर त्यापुढचे पांडवपंचमी, तुलसीविवाह, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा आणि देवदिवाळी हे सणही तेवढय़ाच आनंदाने साजरे केले जातात. दिवाळीची खरी सांगता देवदिवाळीने होते. यामध्ये तुलसीविवाह हा सर्वत्र धूमधडाक्यात आणि थाटामाटात साजरा केला जातो. तुळशीचे कृष्णाशी लग्न लावले जाते. यामागील एक पौराणिक कथा आहे. भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुळशीला ‘हरिप्रिया’ म्हणतात. श्री विष्णू आषाढ शुद्ध एकादशीला शयन करतात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात. विष्णूच्या जागृतीचा हा दिवस म्हणजेच प्रबोधोत्सव म्हटला जातो. तुलसी विवाह आणि प्रबोधोत्सव हे दोन्ही उत्सव एकत्र साजरे करण्याची प्रथा आहे. तुलसीदेवीचे वर्णन करताना म्हटले आहे,

ध्यायामि तुलसीदेवी श्यामां कमललोचनम्

प्रसन्नां पद्मकाल्हारवराभय चतुर्भुजाम

किरीट हार केयुर कुण्डलादिविभूषिताम

धवलांशुक संविता पद्मासनमिषेदुषीम्

श्यामवर्णी, कमललोचनी, प्रसन्न मुद्रा, हातात पद्मकमल धारण केलेली, दोन हात वरद, अभय मुद्रेत असलेली, किरीट, केयुर, हार, कुंडले अशा अलंकारांनी शोभणारी, शुभ्र वस्त्र्ा परिधान करून पद्मासनात बसलेली अशी तुलसीदेवी आहे.

पूजनीय आणि वंदनीय अशी तुळस ही वनस्पती पवित्र, गुणकारी आणि औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. तुळशीचा काढा सर्दी, खोकल्यावर अत्यंत गुणकारी आहे. तुळशीने हवा शुद्ध होते. जास्तीत जास्त प्राणवायू देणारी ही वनस्पती आहे. म्हणूनच घरात, अंगणात तुळस लावली जाते. तुळशीचा सौंदर्यप्रसाधने, सुगंधी तेल, अत्तरे यामध्येही उपयोग केला जातो. आयुर्वेदिक औषधातही तुळशीचा खूप वापर केला जातो. निसर्गातील सर्व वनस्पतींमध्ये तुळशीला अत्यंत आदराचे आणि महत्त्वाचे स्थान लाभले आहे. तुळस ही एक शक्ती आहे. आपल्या कोणत्याही धार्मिक कार्यात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणतेही धर्मकार्य, पूजा, होमहवन असो की देवाला दाखविण्यात येणारा नैवेद्य असो, तुळशीपत्राशिवाय ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही. तुळशीचे रोपटे नाजूक आणि फार उंच नसते परंतु तुळशीतून भरपूर प्रमाणात प्राणवायू मिळतो. तुळशीला अतिशय सुंदर असा सुगंध असतो. जिथे तुळस असते तिथले वातावरण शुद्ध, पवित्र असते. विषारी जीवजंतू, किटाणू यापासून आपले रक्षण करते. तुळशीला ‘महाऔषधी’ असे संबोधण्यात येते. तुळशीचे काळी तुळस, गोड तुळस, राम तुळस, रान तुळस, कृष्ण तुळस, कर्पूर तुळस असे अनेक प्रकार आहेत. तुळस कोणत्याही  प्रकारची असो, ती औषधी गुणधर्माची आणि पर्यावरणीयच असते. तुळशीमुळे आपले डासांपासूनही रक्षण होते. म्हणूनच इंग्रजी भाषेत तुळशीला ‘मासक्विटो प्लँट’ असे म्हणतात. पोटदुखी, दाढदुखी, डोकेदुखी, सूज, लहान मुलांना होणारे जुलाब, जंत यावरील औषधात तुळशीचा वापर करतात. वारकरी लोक तुळशीच्या बियांपासून बनलेल्या तुळशीमाळेला अतिशय श्रद्धेने आपल्या गळय़ात धारण करतात. वारीला जाताना डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन चालतात; कारण तुळशीमधून मिळणारा शुद्ध प्राणवायू आणि ऊर्जा त्यांना शक्ती आणि स्फूर्ती प्रदान करते. अशी पवित्र, औषधी गुणांनी युक्त, बहुपयोगी आणि बहुमोल अशी तुळस पर्यावरणाचा तोल सांभाळण्यास हातभार तर लावतेच शिवाय आपले रक्षणही करते. तुळस ही आपल्या पवित्र, समृद्ध आणि आदर्श संस्कृतीचे प्रतीक आहे, शुभकारकतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या