लेख : मेंग वेंगझाऊ यांची अटक आणि ‘5 जी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सनत कोल्हटकर<<

[email protected]

अर्जेन्टिनामध्ये झालेल्या जी-20 या आंतरराष्ट्रीय परिषदेत चीन आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बैठकीनंतर या दोन देशांतील व्यापार युद्धाचे ढग काही प्रमाणात तरी विरळ होतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यानंतर आठवडाभरातच अमेरिकेच्या सांगण्यावरून कॅनडातील व्हँकुवर येथे व्यापारी बैठकीसाठी आलेल्या चिनी कंपनी ‘हुवेई’च्या मुख्य वित्त अधिकारी मेंग वेंगझाऊ यांना अटक करण्यात आली. या बातमीने जगभर खळबळ माजली. या अटकेमागे ‘5 जी’ तंत्रज्ञानाची गळेकापू स्पर्धेचे कारण आहे हे नक्की. चीन याला कसा प्रतिसाद देतो हे आता पाहावयाचे.

गेल्या महिनाअखेर अर्जेन्टिनामध्ये झालेली जी – 20 ही आंतरराष्ट्रीय परिषद आणि त्या परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये झालेल्या बैठकीने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते. या शिखर परिषदेतील सहभागी सर्व  20 देशांची एकत्रित ‘जी.डी.पी.’ ही जगाच्या संपूर्ण जी.डी.पी.च्या 85 टक्के आहे आणि या सर्व देशांची एकत्रित लोकसंख्या ही जगाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश आहे.

त्या बैठकीनंतर अमेरिकेने पुढील 90 दिवस उर्वरित 200 अब्ज डॉलर्सच्या आयातीवर आयात कर न वाढविण्याचे आश्वासन चीनला दिले होते. यामुळे जगातील अनेक देशांनी निःश्वास टाकला होता. परंतु या गोष्टीला आठवडाही उलटत नाही तोच अमेरिकेच्या सांगण्यावरून कॅनडातील व्हँकुवर येथे व्यापारी बैठकीसाठी आलेल्या चिनी कंपनी ‘हुवेई’च्या मुख्य वित्त अधिकारी मेंग वेंगझाऊ यांना अटक करण्यात आली. या बातमीने जगभर खळबळ माजली. अमेरिकेने दिलेले प्रथमदर्शनी कारण पाहता इराणवर अमेरिकेने आर्थिक बंधने टाकली असतानाही ‘हुवेई’ने इराणबरोबर व्यवहार केला असा अमेरिकेने या कंपनीवर आरोप केला. वर वर हे कारण दिसत असले तरी त्यामागे ‘5 जी’ तंत्रज्ञानाचा (काही ट्रिलियन डॉलर्स) येणाऱया काळात प्रचंड उपलब्ध होणारा बाजार आणि त्यावर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिका आणि चीन या दोन्हीही देशांमध्ये सुरू झालेली तीव्र अंतर्गत स्पर्धा असल्याचे बोलले जाते. ‘हुवेई’ ही मोबाईल तंत्रज्ञानामधील चीनमधीलच नव्हे तर जागतिक बाजारातील सध्याची अग्रगण्य कंपनी असून ती कंपनी नजीकच्या भविष्यात अमेरिकन कंपनी ‘ऍपल’ला जोरदार टक्कर देऊ शकेल व ‘5जी’चा जगातील बराचसा बाजार खेचून घेण्यात आघाडी घेईल असे सांगतात. अर्थात तेही ‘ऍपल’पेक्षा खूप कमी किमतीत (उपकरणे आणि तंत्रज्ञान) बाजारावर ताबा मिळवून.

‘5 जी’ तंत्रज्ञानामुळे इंटरनेट, इंटरनेटवरील व्हिडीओ, कोणतीही क्लिक केलेली लिंक, ट्विटर, फेसबुक  वगैरे एका क्लिकवर उघडतील. वरील सर्व गोष्टींचा वेग बेफाम वाढणार आहे. 5 जी (फिफ्त जनरेशन वायरलेस टेक्नॉलॉजी)च्या संदेशवहनासाठी वेगळे ‘टॉवर्स’ व तत्सम एकदम वेगळी उपकरणे (इंस्टमेंट्स) लागणार आहेत. ज्याला आपण सर्रास मराठीमध्ये ‘हार्डवेअर’ म्हणतो त्याचा परत एकदा नवीन प्रचंड मोठा बाजार समोर येणार आहे. पूर्वीचे 4 जीचे टॉवर्स अपग्रेड करावयाची यामध्ये संधी नसल्याचे बोलले जाते. मोबाईलही 5 जी तंत्रज्ञानाला अनुकूल असे नवीन आणि वेगळ्या सुटय़ा भागांनी बनवावे लागतील. 4 जी हे लवकरच म्हणजे सुमारे पुढील दोन वर्षातच ‘निरुपयोगी’ होतील. ‘5 जी’ सिग्नल स्वीकारणारे नवीन मोडेम लागतील. लॅपटॉप व इतर कॉम्प्युटरमध्येही ‘5 जी’चे सिग्नल स्वीकारणारी यंत्रणा बसवावी लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चालू शकणाऱया ड्रायव्हरविरहित गाडय़ा जी.पी.एस.वर चालविण्यासाठी परत ‘5 जी’ हेच तंत्रज्ञान उपयोगी येणार आहे. ‘5 जी’चे सिग्नल्स वाहून नेण्यासाठी टॉवर्सची संख्याही प्रचंड आहे. कारण 4 जी टॉवर्सची मर्यादा 70 किलोमीटर आहे तर ‘5 जी’साठी जवळ जवळ छोटय़ा आकाराचे टॉवर्स प्रत्येक किलोमीटरवर बसवावे लागतील. सिग्नल्सचे सातत्य राखण्यासाठी टॉवर्सची एवढी संख्या अत्यावश्यक आहे. ‘5 जी’ सिग्नल्सची फ्रिक्वेन्सी ही पूर्णपणे वेगळी असेल. ‘5 जी’साठी नवीन चिप्स बनवावयास लागतील ज्याची परत मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. या सर्व गोष्टींमध्ये जगातील इतर कोणत्याही कंपनीपेक्षा ‘हुवेई’ फारच पुढे आहे. मग ते हार्डवेअर असो की सॉफ्टवेअर काही महिन्यांपूर्वीच चीनने अमेरिकेतील एका सेमीकंडक्टर्स बनविणाऱया कारखान्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. पण अमेरिकन सरकारने तो प्रयत्न हाणून पाडला. त्यापूर्वी चीननेच जर्मनीतील तिथल्या सेमीकंडक्टर्स बनविणाऱया कारखान्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. पण अमेरिकन सरकारच्या सूचनेवरून जर्मनीने चीनचा तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. ‘5 जी’साठी किती ‘गळेकापू’ स्पर्धा होत आहे याची या गोष्टीवरून कल्पना येते.

‘ए. टी. ऍण्ड टी.’ आणि ‘व्हेरिझॉन’ या कंपन्यांनी अमेरिकेतील काही शहरांमध्ये या ‘5 जी’ तंत्रज्ञानावर सेवा सुरू केली आहे. त्यामुळे ब्रॉडबॅण्ड ते 4 जीपर्यंत सर्वजण बाजारातून हद्दपार होतील.

जी.एस.एम. आणि सी.डी.एम.ए. या दोन्हीही तंत्रज्ञानावर फोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या दोन्ही तंत्रज्ञानांमध्ये अपग्रेड्स  अपेक्षित आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी ‘पेटंट’ आहेत आणि मोनोपॉलीमुळे खूप गुंतवणूक अपेक्षित आहे. मोबाईल बनविणाऱया प्रत्येक कंपनीला यासाठी त्या कंपनीला प्रत्येक उपकरणामागे शुल्क द्यावे लागेल. ‘क्वालक्वाम’ या कंपनीकडे ‘5 जी’ तंत्रज्ञानासाठी लागणारी 15 टक्के पेटंट्स आहेत असे बोलले जाते. हीच कंपनी 42 टक्के मोबाईल्सच्या ‘चिप’च्या बाजारावर अधिपत्य राखून आहे. तसेच ‘5 जी’साठी लागणारे मोडेम व अँटेनाही याच कंपनीतर्फे बनविली जातात. त्यापाठोपाठ ऍपल कंपनी 22 टक्के चिपच्या बाजारावर नियंत्रण ठेवून आहे.

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीशी ‘हुवेई’ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे या अटकेनंतर चीनकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. हे आता यापुढे अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव चिघळण्याचे संकेत तर नाहीत ना अशी भीती व्यक्त केली जाते आहे.

मेंग वेंगझाऊ या हुवेईच्या मुख्य वित्त अधिकारी आहेत. त्या ‘हुवेई’ या कंपनीचे संस्थापक रेन झेन्गफेई यांच्या कन्या असून त्या कंपनीमध्ये गेली 25 वर्षे कार्यरत आहेत. अमेरिकेकडून मिळणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान ही कंपनी चीनच्या सरकारलाही हस्तांतरित करते असा अमेरिकेचा संशय असून आरोपदेखील आहे. अमेरिकेने निर्बंध टाकलेल्या इराण, क्युबा, सुदान आणि सीरिया यासारख्या देशांशी ही कंपनी सहकार्य करत असल्याचा आरोप अमेरिकन सरकार करते आहे. आता वेंगझाऊ यांच्या अटकेवरून चीनदेखील अमेरिकेला किती आक्रमकपणे प्रत्युत्तर देतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकन, कॅनेडिअन आणि अनेक युरोपियन उद्योजकही त्यांच्या कामानिमित्त चीनमध्ये असतात. त्यामुळे चीनचा हुवेई कंपनीच्या  कार्यकारी संचालिकेच्या अटकेबाबत काय प्रतिसाद असेल हे येणाऱया काळात दिसून येईल.