
>> अशोक सुतार
आदिमानव हा निसर्गाचे संरक्षण करणारा व निसर्गाला पूज्य मानणारा होता. परंतु जसजसा काळ बदलला, तसा माणूसही बदलला. माणसाने निसर्गाला नष्ट करण्याचा चंग बांधला आणि माणूस संकटात सापडला. आदिम अवस्थेत प्राण्यांची शिकार तसेच वनस्पती यावर जेमतेम गुजराण करणारा आदिमानव निसर्गाच्या अन्नसाखळीत शिकार आणि शिकारी अशी दुहेरी भूमिका बजावत होता. आता मानवाच्या वृत्तीत आणि कृतीत मोठा बदल झाला आहे. मानव प्राणी विनाशाकडे चालला आहे आणि मानवाचे अस्तित्व ज्याच्यावर अवलंबून आहे, तो निसर्गच नष्ट होऊ लागला आहे. दरवर्षी विश्व पर्यावरण दिनानिमित्त जगभर प्रसारमाध्यमे पृथ्वी, निसर्ग वाचवण्याचे आवाहन करतात. परंतु मानवाची कृती वेगळीच आहे. झाडे, डोंगर, नद्या, नाले, समुद्र प्रदूषित होत आहेत आणि त्यांचे बळी देऊन मोठे प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे अवर्षण, पूर, सुका दुष्काळ हिमनगाचे वितळणे अशी अनेक संकटे येत आहेत. आपण त्यातून केव्हा शहाणे होणार, हे काळच ठरवेल.
मानवाने बुद्धीच्या बळावर अनेक मोठे प्रकल्प, कारखाने उभारले. त्यासाठी निसर्गाची हानी केली. मानव निसर्गासोबत स्पर्धा करीत आहे, असे वाटू लागले आहे. मानव आणि निसर्गाच्या संघर्षात निसर्गातील सहजीवनातील मानवाचे सहकारी नष्ट झाले. मानवाने शेती करण्यास प्रारंभ केला, त्यानंतर जे औद्योगिकीकरण आले, त्याने निसर्गाचा समतोल बिघडण्यास सुरुवात झाली. मानवाचा चंगळवाद, बुभूक्षितपणा वाढला आणि आज मानव धोक्याच्या पातळीवर वावरत आहे. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी माणसाला शेतीचा शोध लागला. नंतर शेतीचे तंत्र अवगत झाले. लोकसंख्या कमी असल्याने खाद्यान्नाची गरज भागत होती. शिकारीचा काळ सुरू असताना मानव आपल्या फायद्यासाठी पशुपालन करू लागला. या सर्वांमुळे मानवी जीवनमान सुधारले. नंतर लोकसंख्या वाढू लागली, अनेक शोध लागले. औद्योगिकीकरण आले आणि नवीन बांधकामे करण्यासाठी घनदाट अरण्ये, गवताळ प्रदेश, डोंगरउतार, दलदली इत्यादी नैसर्गिक परिसंस्थांवर अतिक्रमण करणे सुरू झाले. यामुळे निसर्गातील वन्य पशुपक्षी आणि वनस्पती यांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला. शेतीच्या पाण्यासाठी नदी, तलाव, ओढे, नाले, जमिनीच्या पोटातील भूजल असे नैसर्गिक जलस्रोत ओरबाडणे सुरू झाले. नंतर नगदी पिके घेण्याची स्पर्धा सुरू झाली. धान्य जास्त येण्यासाठी व धान्याची विक्री होऊन नफा होण्यासाठी मानव प्रयत्नशील झाला आणि रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. आज मानवाने पाण्याचा वापरच केला नाही तर पाण्याचे स्रोत प्रदूषित केले आहेत. पृथ्वीवरील उपलब्ध भूजल साठय़ातील सुमारे 70टक्के पाणी मानवाने वापरले आहे. त्यातील जास्तीत जास्त पाणी शेतीसाठी वापरले गेले असून पाण्याच्या स्रोतांवर दावा सांगण्यासाठी सर्वत्र राजकारण सुरू झाले आहे. आधुनिक काळात पिकांची त्वरित वाढ आणि कीडनियंत्रण यासाठी वापरली गेलेली रासायनिक खते तसेच कीटकनाशके यांचा मोठा दुष्परिणाम पर्यावरणावर झालेला आहे. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे पोषकद्रव्ये निर्माण करण्याची जमिनीची मूलभूत क्षमता संपून जमिनी नापीक होत आहेत. यामुळे परिसरातील कीटकांचा अधिवास नष्ट होत आहे. प्राण्यांच्या घटत्या संख्येमुळे परिसंस्था धोक्यात आली आहे. प्रदूषित पाणी, प्रदूषित जमिनीचा परिणाम मानव प्राण्यावर होऊन अनेक रोग निर्माण झाले आहेत. निसर्गाला आव्हान दिल्यानंतर मानवाचे अस्तित्वही नष्ट होणार आहे, हे ओघाने आले. त्यामुळे मानवाने आता चंगळवाद थांबवून निसर्गाशी जुळवून घेणे आवश्यक ठरणार आहे.
18व्या शतकात औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. मानवाचे भौतिक जीवन सुलभ करण्यासाठी लागणाऱया वस्तूंच्या निर्मितीचे कारखाने उभारण्यासाठी नैसर्गिक भूप्रदेश बळकावले गेल्याने निसर्गातील परिसंस्था धोक्यात आल्या. उद्योगांना लागणारे पाणी नैसर्गिक जलस्रोतातून मिळविले गेले आणि कारखान्यांचे प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त सांडपाणी मिसळल्यामुळे पुन्हा जलस्रोत प्रदूषित झाले. कारखान्यांमुळे व वाढत्या वाहनांमुळे कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड असे विषारी वायू निर्माण झाले. अनेक शहरांमध्ये वायूचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर आहे. आता मानवाला ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली आहे. पृथ्वीवरील खनिज संपत्ती मानवाने लुटली. दगडी कोळसा, धातूंची खनिजे, हिरे यासाठी होणाऱया खाणकामामुळे जंगले तुटली, परिणामी, नदीकाठ आणि डोंगरऊतारावर होणाऱया भूस्खलनामुळे गावेच्या गावे पुरात वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत.
2018 सालच्या एका आकडेवारीनुसार, संख्येने मनुष्यप्राणी जगातील जीवसृष्टीच्या फक्त 0.01 टक्का आहे. मात्र त्याच्यामुळे गेल्या पाच हजार वर्षांत पृथ्वीवरील 83 टक्के सस्तन प्राणी आणि 50 टक्के वनस्पती नामशेष झाल्या आहेत. आज जगातील सस्तन प्राण्यांपैकी 60 टक्के प्राणी हे गाई, म्हशी, शेळ्या-मेंढय़ा असे पाळीव पशू आहेत आणि केवळ 40 टक्के सस्तन प्राणी वन्य अवस्थेत शिल्लक आहेत. जगातील एकूण पक्ष्यांपैकी 70 टक्के पक्षी हे पाळीव पक्षी आहेत, तर केवळ 30 टक्के पक्षी वन्य अवस्थेत आहेत. गेल्या 400 वर्षांत सुमारे 800 सजीव नामशेष झाले. आज दर दिवसाला सजीवांच्या 150 जाती नामशेष होत असून सुमारे 10 लाख जाती नामशेष होण्याच्या उंबरठय़ावर आहेत आणि याला माणूस कारणीभूत आहे, असे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन फॉर बायलॉजिकल डायव्हर्सिटी या आंतरराष्ट्रीय संस्थेने म्हटले आहे. मानवाने निसर्गाशी स्पर्धा न करता पर्यावरणानुकूल वर्तन ठेवले तर पृथ्वीची हानी होणार नाही. मानवाचे अस्तित्व जपायचे असेल तर निसर्ग वाचवला पाहिजे.






























































