लेख – कार्यकर्ता तितुका मेळवावा!

शुद्ध, सच्चा कार्यकर्ता टिकवणे, जोपासणे हे राजकीय पक्ष वा संघटनांसाठी अतिशय आवश्यक ठरते. सोशल मीडियाच्या सहाय्याने जरी आज राजकीय पक्षांना शेवटच्या मतदाराशी संपर्क साधून, त्यावर आपली छाप पाडण्यास शक्य झाले असले तरी मानवी भावनांच्या स्पर्शाची सकारात्मक परिणामकारकता त्यात नसल्यामुळे या कार्यकर्त्याच्या प्रत्यक्ष प्रचारापुढे ते दुय्यम ठरतात. इथेच या कार्यकर्त्याचे अनन्यसाधारण महत्त्व व प्रभाव दिसून येतो. तंत्रज्ञानाची आणि कार्यकर्त्यांची योग्य सांगड व समन्वय साधणे ज्याला जमेल, त्यालाच राजकारणात / समाजकारणात आघाडी घेता येईल. त्यामुळे ‘सच्चा कार्यकर्ता तितुका मेळवावा, जपावा आणि पक्ष-संघटनेचा पसारा वाढवावा’.

 एखाद्या पक्ष/संघटनेचा पाया म्हणजे ‘कार्यकर्ता’. शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठीचा तो आखरी दुवा. संघटनेची ताकद ही या कार्यकर्त्याच्या निष्ठेवर, प्रामाणिकपणावर, निःस्वार्थपणावर टिकून असते. जनतेसाठी हाच पक्षाचा सर्वात जवळचा चेहरा असतो आणि म्हणूनच तो पक्षाची ओळख ठरतो. कार्यकर्ता जेवढा सच्चा, तेवढी त्या पक्षाची पाळेमुळे अधिकाधिक घट्ट व विस्तारत जातात. झाडाची वाढ त्याच्या मुळांवर अवलंबून असते. कारण पोषकं शोधण्यात व शोषण्यात जेवढी ही मुळं मेहनत घेतात, तेवढी त्या झाडाची वाढ जलद व सशक्त होते.

झाडासाठी जे कार्य त्याची मुळं करतात तसेच काहीसे पक्षाचे कार्यकर्ते पक्षासाठी करणे अपेक्षित असते. त्यामुळे ही मुळं म्हणजेच कार्यकर्ते मजबूत असणे हे सर्वात महत्त्वाचे व अनिवार्य ठरते. पक्षात अनेक कार्यकर्ते असतात, पण त्यांत परिणामकारक ठरणारा असा ‘सच्चा कार्यकर्ता’ हे एक वेगळेच रसायन होय. काळानुरूप बदलणाऱया परिस्थितीनुसार या कार्यकर्त्याची कार्यपद्धतीदेखील आमूलाग्र बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे, परंतु राजकारणात बळावलेली महत्त्वाकांक्षा मात्र या ‘सच्च्या कार्यकर्त्या’ला दुर्मिळ करण्याची ताकद बाळगते का?

तसं बघितलं तर पक्षाचे सर्वोच्च नेतृत्वदेखील एक कार्यकर्ताच होय, पण त्यांना नेता म्हटले जात असल्यामुळे कार्यकर्ता हा एका सुस्पष्ट अशा वेगळ्या व्याख्येत बसतो, जो आपल्यावर पडलेली जबाबदारी इतर कुणावर न ढकलता ती पूर्ण करण्यासाठी स्वतः श्रम करतो, तो कार्यकर्ता; पक्षश्रेष्ठेच्या मुखातून निघालेला आदेश, ज्याच्या प्रत्यक्ष कृतीतून जनसामान्यांना अनुभवयास मिळतो तो कार्यकर्ता; सभेस्थानी वा कार्यस्थळी जो सर्वात प्रथम उपस्थित असतो आणि कार्यक्रम आटोपल्यावर सर्व आवरून सर्वात शेवटी निघतो तो कार्यकर्ता; प्रकाशझोतात किंवा अग्रभागी नसूनदेखील ज्यावर पक्ष/संघटनेच्या कार्यक्रमाचे यशापयश अवलंबून असते तो कार्यकर्ता; जो आपले कर्तृत्व आपल्या नेत्याच्या यशात बघतो तो कार्यकर्ता; बहुतांश समयी जो केवळ श्रोता असतो तो कार्यकर्ता.

कार्यकर्ता कसा व कुठून येतो? परिवारातील अथवा मित्रमंडळींपैकी कुणीतरी एखाद्या मंडळ किंवा पक्ष-संघटनेशी संलग्न असतो. त्याला सोबत म्हणून तिथे जाणे वाढते, नवनवीन लोकांशी भेटीगाठी होतात, मन आता त्या उत्साही गर्दीत अधिक रमू लागते, समाजकार्यात एक वेगळा आनंद व अभिमान जाणवू लागतो, चार लोक आळखू लागतात – आदराने बोलतात, कार्यालयात/शाखेत हजेरी वाढते, कार्यक्रमांच्या पूर्वतयारीत-आयोजनामध्ये हातभार लागतो, या मंडळाचा/संघटनेचा त्याला परिवाराप्रमाणेच एक आधार वाटू लागतो आणि कधी तो समाजाच्या नजरेत एक कार्यकर्ता होतो हे त्यालाच कळत नाही.

समाजकार्याची आवड म्हणून फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणून झालेल्या कार्यकर्त्यात सुरुवातीला राजकीय महत्त्वाकांक्षांची बिजं लागलीच अंकुरत नाहीत. कार्यकर्त्याचा हा स्तर म्हणजे सर्वात प्रामाणिक, निःस्वार्थ व धडाडीचा होय. पक्षाचा जनसंपर्क विस्तारण्याच्या दृष्टीने या अनुभवी, परंतु स्वच्छ व कर्तव्यतत्पर कार्यकर्त्यांची मेहनत सर्वात प्रभावी ठरते. सांगेल ते काम करायला तो नेहमी तयार असतो, किंबहुना वरिष्ठांनी त्यावर टाकलेल्या एखाद्या साध्या-क्षुल्लक कामाच्या जबाबदारीसदेखील, तो आपल्यावर दाखवलेला विश्वास व बहुमान समजतो.

आपल्या वरिष्ठांच्या नजरेत उभारण्यासाठी तो नेहमी धडपडत असतो. उत्साह, तत्परता, नम्रता ही इथे जेवढी पाहायला मिळते, ती नंतर पुढे वरवर जाता नैसर्गिकपणे कमी कमी होत असल्याचे अनुभवायला मिळते. पक्ष-संघटनेची विचारधारा, शिस्त, संस्कार मनावर बिंबवण्याचे कार्य या स्तरावर झाल्यास संघटनेची वैचारिक जडणघडण अतिशय मजबूत व अभेद्य होते. वरिष्ठांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची पावलं पडणार असल्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांनी स्वतःच्या चरित्र, स्वभावगुणांविषयी विशेष दक्ष असणे अत्यावश्यक ठरते.

कार्यकर्त्याचा पदाधिकारी-कार्यकर्ता होणे तसेच सक्रियतेच्या व ज्येष्ठतेच्या निकषांवर पुढे पदानुक्रमाची पायरी सतत चढायला मिळणे हे जरी संघटनात्मक धोरणांवर आधारलेले असले तरी सर्वच कार्यकर्त्यांना नेतृत्वाची ही जबाबदारी मिळणे वा संधी लाभणं शक्य नाही ही स्वाभाविक वस्तुस्थिती आहे. आक्रमकपणा, नेतृत्वगुण, संसाधनांचे नियोजन-आयोजन व व्यवस्थापन करण्याचे सामर्थ्य, समर्पण, निष्ठा, वरिष्ठांचा विश्वास किंवा त्यांच्याशी असलेली जवळीक वगैरेसारख्या बाबींमुळे एखाद्याला संघटनेमध्ये पदोन्नती लाभत असते. शेकडोंमधून एखाद्याला ही संधी प्राप्त होणे म्हणजे उर्वरित इतरांमध्ये त्या गुणांचा अभाव असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे होईल.

जीवनातील इतर जबाबदाऱयांना अधिक वेळ व प्राथमिकता देण्याची अनिवार्यता अशांना शेवटपर्यंत कार्यकर्ताच म्हणून आपल्या पक्षाची सेवा करण्यास प्रोत्साहन, आनंद देत असते. ‘ज्येष्ठ कार्यकर्ता’ असल्याचा अभिमान बाळगणाऱयांनी जवळ जवळ आपले संपूर्ण आयुष्य त्या पक्ष-संघटनेचे कार्य करण्यात घालविले असते. मागाहून आलेले पुढे गेल्याची खंत ते कधी बाळगत नाहीत. कारण कार्यकर्ता होण्यामागचा त्यांचा उद्देशच मुळात निःस्वार्थ असतो. कुणाला दिसावे अथवा दाखविण्यासाठी नव्हे तर पक्षाचा प्रचार, प्रसार किंवा पक्षाची बाजू मांडणे हे त्यांच्या इतके अंगवळणी पडले असते की तो त्यांचा स्वभावगुण, सहजप्रवृती होते.

शुद्ध, सच्चा कार्यकर्ता टिकवणे, जोपासणे हे राजकीय पक्ष वा संघटनांसाठी अतिशय आवश्यक ठरते. अशा कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठsला सहजासहजी कोणी तडा देऊ शकत नाही. सोशल मीडियाच्या सहाय्याने जरी आज राजकीय पक्षांना शेवटच्या मतदाराशी संपर्क साधून, त्यावर आपली छाप पाडणे शक्य झाले असले तरी मानवी भावनांची सकारात्मक परिणामकारकता त्यात नसल्यामुळे या कार्यकर्त्याच्या प्रत्यक्ष प्रचारापुढे ते दुय्यम ठरतात.

इथेच या कार्यकर्त्याचे अनन्यसाधारण महत्त्व व प्रभाव दिसून येतो. असा कार्यकर्ता मिळविणे, त्यास पुढील जबाबदाऱयांसाठी तयार करणे, त्याची वैचारिक प्रगल्भता व सामाजिक कर्तव्याचे भान वाढविणे, त्याच्या मतांचा आदर राखणे, आपल्या विचारधारेशी, उद्दिष्टांशी त्याला जोडून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. जनतेच्या अपेक्षांची त्याला पूर्ण जाण असल्यामुळे तो मतदार व नेतृत्वामधील एक पारदर्शक माध्यम ठरू शकतो. संवादाचे हेच निर्दोष माध्यम अधिक प्रभावी असते. आधुनिक तंत्रज्ञानाची संवाद माध्यमं मात्र कार्यकर्त्याच्या याच उपयोगितेला आज निक्रिय ठरवत आहेत. तंत्रज्ञानाची आणि कार्यकर्त्यांची योग्य सांगड व समन्वय साधणे ज्याला जमेल, त्यालाच राजकारणात / समाजकारणात आघाडी घेता येईल. त्यामुळे ‘सच्चा कार्यकर्ता तितुका मेळवावा, जपावा आणि पक्ष-संघटनेचा पसारा वाढवावा’.

आपली प्रतिक्रिया द्या