आगळं वेगळं – निळी अर्थव्यवस्था

283

>> मंगल गोगटे

हिंदुस्थान आणि नॉर्वेमध्ये सागरी उद्योग, समुद्री रहदारी, किनाऱ्यावरील ऊर्जा निर्मिती, सागरी अन्न आणि नवीन उद्योगधंदे हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत हे साम्य आहे. नॉर्वे सरकारला आपल्या देशाच्या निळ्या अर्थव्यवस्थेची क्षमता माहीत आहे आणि त्यांच्याकडे ही क्षमता वापरण्यासाठीचं ज्ञान आणि कौशल्य आहे.

आपण हे विसरूनच जातो की, निसर्गाने दिलेली ही संपत्ती आपण जपून वापरायला हवी. खरं तर ही ‘आपली’ नाही, तर आपण ही पृथ्वी सगळे मिळून वापरायची आहे. यात भागीदारी आहे आणि त्या भागीदारीच्या मर्यादा सांभाळून आपण वागलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण ती मर्यादा ओलांडतो तेव्हा तेव्हा आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते व एखाद्या संकटाला सामोरं जावं लागतं.

समुद्र हादेखील अशीच भागीदारी करतो. तो आपल्याला अनेक आनंद देत असतो. त्याचं संगीत, त्याचा सहवास, त्याच्या लाटांशी-पाण्याशी खेळणं, होडीतून – जहाजातून केलेला प्रवास… सगळंच आनंदमय. आपल्यासाठी ऑक्सिजन देणं आणि हवामान नियंत्रण हेदेखील तो करतोच. शिवाय माणसांमुळे निर्माण झालेल्या एकूण कार्बन डायऑक्साईडपैकी साधारण 30 टक्के सागरच शोषून घेतात. आपल्या महासागरांच्या पोटात जगातली सर्वात लांब पर्वतराजी आणि सगळ्यात खोल दऱया आहेत. जगातली जवळपास अर्धी लोकसंख्या व्यवसाय आणि अन्न यासाठी सागरावर अवलंबून आहे व ही टक्केवारी दिवसेंदिवस वाढते आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येसाठी अन्न, रोजगार, ऊर्जा, प्रवास, कच्चा माल, औषधं आणि आर्थिक विकास या सगळ्यासाठी आपण समुद्रावर अवलंबून आहोत.

या समुद्रांचा आपण आतापर्यंत एवढा गैरफायदा घेतला आहे की, आता यापुढे तरी या निळ्या साधनसामग्रीच्या योग्य व समतोल वापरासाठी विचारपूर्वक वागणे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या देशाने गेल्या वर्षी एक महत्त्वाकांक्षी ‘खोल महासागरी मिशन’ सुरू केलं आहे, ज्यात पुढील पाच वर्षांच्या काळात मध्य हिंदुस्थानी महासागरातील खोल खोबण्यांमधे अन्वेषण करून लाटांची ऊर्जा पकडणे आणि तिथली जैविक विविधता व खनिजं यांचा अभ्यास केला जाणार आहे.

या संशोधनामुळे पुढील पिढय़ांसाठी ही निळी अर्थव्यवस्था (Blue economy) कशी सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्याला पोषक ठेवता येईल याबाबतच्या विचाराला योग्य दिशा मिळेल. शोषण आणि संरक्षण यात समतोल साधण्याची कला आपण अवगत करणे जरुरी आहे. भविष्यात जे समुद्र पर्यावरणासाठी चांगले असणार आहे तेच सामुद्रिक व्यवसायासाठी चांगले ठरणार आहे.

निळ्या अर्थव्यवस्थेला आणि त्यातील जीवांना मोठा धोका आहे तो सागरी कचऱयाचा. अलीकडे हाती आलेल्या अहवालांवरून असं वाटू लागलं आहे की, 2050 पर्यंत आपल्या समुद्रांमधे जीवांपेक्षा जास्त प्लॅस्टिक असणार आहे. नशिबाने हा प्रश्न निकालात काढण्यासाठी आवश्यक ते ज्ञान व तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणून 2022 पर्यंत ‘एक वापर’ प्लॅस्टिक अर्थव्यवस्थेतून बाद करण्याचा आपला प्रयत्न आहे.

सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे आपले प्रयत्न तिथून सुरू होतात. नद्या साफ राहतील तर समुद्र स्वच्छ राहण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. नदीचं पाणी घाण होण्याचं मुख्य कारण आहे, तीरावरील कारखान्यांनी नदीत उत्सर्जित केलेली कचरायुक्त घाण. त्याच्याच जोडीला किनाऱयावर राहणारे वा नदीत प्रवास करणारे लोकही नदीत कचरा टाकतातच की! काही वेळा समुद्रातसुध्दा अशाच अनेक प्रकारे कचरा होतो. कधी कधी जहाजांमुळे खूप तेल समुद्रात सांडतं. माणसाने जागं होऊन स्वतःच प्रयत्न केले तरी यातील बऱयाच गोष्टींना आळा घालणे सहज शक्य आहे. सरकारंदेखील कायदे करून या प्रयत्नांना सहाय्य करू शकतात.

….आणि आपण सुरुवात तर केलीच आहे. या प्रयत्नात आपल्याला एक साथीसुध्दा मिळाला आहे, सातासमुद्रापलीकडचा एक देश-नॉर्वे! आपल्या दोन्ही अर्थव्यवस्थांसाठी हे उद्योग या कोरोना कहरानंतर, भरभराट आणि रोजगार पुरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. नॉर्वे सरकारला आपल्या देशाच्या निळ्या अर्थव्यवस्थेची क्षमता माहीत आहे आणि त्यांच्याकडे ही क्षमता वापरण्यासाठीचं ज्ञान आणि कौशल्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग, त्या आपल्या देशात आल्या होत्या तेव्हा, यांनी 2019 मध्ये आपली ही ‘शाश्वत विकासासाठी निळी अर्थव्यवस्था’ करण्याची सुरुवात एक एकत्रित कार्यदल उभारून केली आहे. 18 फेब्रुवारी 2020 ला या दोन्ही देशांनी ‘एकात्मिक सागरी व्यवस्थापन आणि संशोधन’ यासाठी भागीदारीत विकास करण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

आपल्या दोघांचे एकत्रित प्रयत्न 1950 च्या दशकात मासे व्यवसायापासून सुरू झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत अनेक करार करत आपण दोन्ही देशांना निरोगी आणि श्रीमंत बनवत इथवर पोचलो आहोत. आपली जोडगोळी चांगली जमलीय. आता आपण दोघेही टिकाऊ जहाज उद्योग, जलचर संगोपन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती या विभागात फायदेशीर भागीदारी करू शकू. आपण आपल्या ‘शाश्वत विकास लक्ष्यां’कडे जात असताना एक गोष्ट करायची राहून गेली आहे – पाण्याखालील जीवन समृद्ध करणे. अर्थात त्यादृष्टीने आपले जोडप्रयत्न चालू राहतीलच. कारण आपण दोन्ही देश आपल्या कार्याशी वचनबद्ध आहोत.

निसर्गाचा समतोल राखताना आपण हे भान ठेवायला हवं की, आपणंही निसर्गाचाच एक भाग आहोत आणि नैसर्गिक साधनांचं शोषण करून आपण स्वतःचंच अस्तित्व धोक्यात आणतो आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या