सफर-ए-यूएई – जिभेचा नको, बॅटचा पट्टा चालवा!

<<< संजय कऱ्हाडे >>>

बुधवारचं बांगलादेशला आपण हरवणं-बायकोने स्वतःच सुरू केलेल्या भांडणात नवऱ्याला हरवण्यासारखं होतं आणि बांगलादेशने आपल्या संघात चार बदल करणं-नवऱ्याने भांडणाचं कारण समजून-उमजून घेण्याआधीच सॉरी म्हणण्यासारखं! विचित्रपणे आखलेल्या कार्यक्रमामुळे बांगलादेशला लागोपाठ दोन दिवस खेळावं लागणार होतं. भारतासमोर जिंकणं मुश्कील आहे, त्यापेक्षा आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती द्यावी आणि नंतर शक्यता वाटत असलेल्या पाकला हरवण्याचा प्रयत्न करावा, असा त्यांनी विचार केला. त्यात वावगं काहीच नव्हतं.

आता थोडं अवलोकन –

टी-ट्वेंटीमध्ये आघाडीच्या दोन-तीन फलंदाजांनी छान खेळी केल्या अन् दोन-तीन गोलंदाजांनी ठरावीक अंतराने बळी मिळवले की सामना जिंकता येतो. या स्पर्धेत भारताने तसं करूनही दाखवलंय. मात्र सुपर-फोरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध जिंकताना आपले फलंदाज अभिषेकच्या कौशल्याने मंतरलेले किंबहुना त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करताना दिसले. बुधवारीही पंड्याच्या मुसंडीशिवाय आपल्या पायात आपलाच पाय अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्पर्धेत सॅमसनचं एकमेव अर्धशतक पाहणाऱ्यांची दमछाक करून गेलं होतं. संजू नेमका कुठल्या क्रमांकावर खेळणार हा गुंता गंभीर गंपू केव्हा सोडवणार हे ठाऊक नाही. पंड्या त्याच्या लौकिकास साजेसा आतापर्यंत तरी खेळलेला नाहीये.

कप्तान सूर्या अभिषेकच्या प्रकाशात झाकोळलेला वाटतोय. पाकविरुद्धच्या एका खेळीव्यतिरिक्त तो फारसा उगवलेलाच नाहीये! बाकीच्या नाठाळांचं सोडा, पण त्याच्याकडून बॅटचा पट्टा फिरण्याची अपेक्षा आहे, जिभेचा पट्टा नाही! पाकविरुद्धच्या तिलकच्या 19 चेंडूंत 30 धावांचा मात्र उल्लेख करावा लागेल. गोलंदाजांचा उल्लेख करताना कुलदीपला छान नक्षीदार शाल द्यावी वाटतेय तर इतरांना मात्र श्रीफळ किमान दुरून तरी दाखवणं आवश्यक वाटतंय.

अंतिम फेरीत आपला प्रवेश झालेला असला तरी आज श्रीलंकेविरुद्ध विनाकारण प्रयोगशीलता दाखवणं आपण टाळलं पाहिजे. खेळाडूंची, एकूण संघाची विजयी घोडदौड कायम राखणं जरूरी आहे. विश्रांतीची थेरं पुढे करणाऱ्यांकडे डोळे वटारून पाहण्यास हरकत नाही. अशा थेरकुटांच्या तोंडावर 2023 च्या विश्वचषकाची आठवण मारणं आवश्यक आहे. रोहित, विराट, गिल, राहुल, बुमरा, शमी सामील असणाऱ्या संघाने स्पर्धेत एकही सामना न हरता अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण आपला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्हा क्रिकेटप्रेमींच्या साऱ्या इच्छा, आशा, अपेक्षा सपशेल गहाण ठेवून आम्हाला प्रक्षुब्ध करून हरला होता!