#AirForceDay – जिगरबाज आकाश योद्धे

>> विनायक श्रीधर अभ्यंकर

आज आमची वायू सेना 88 वर्षे पूर्ण करीत आहे. या आपल्या वायु सेनेचे महत्त्व फार वाढले आहे. आज पश्चिमोत्तर शत्रूंच्या नापाक व लाल सेना माकडचेष्टा करत वाकुल्या दाखवत असताना आमचे आकाश योद्धे नभांगणात ‘आतषबाजी’ करण्यास सक्षम आहेत. 16 ऑफिसर्स व 142 हवाई शिपाई इतक्या फौजफाट्यावर सुरू झालेली आमची वायु सेना जगात अव्वलस्थानी आहे. कोणतेही आव्हान परतवून लावेल, अशी आपली वायु सेना आहे आणि जिगरबाज आकाशयोद्धे आहेत.

ब्रिटिश राजवटीत 1913 मध्ये सीतापूर, उत्तर प्रदेश येथे पहिले करी वायुशक्ती विद्यालय सुरू करण्यात आले. पहिल्या महायुद्धाचे वारे त्यावेळी वाहू लागले होते. ब्रिटिश सरकारने त्यामुळे हिंदुस्थानींची सैन्य भरती घोषित केली. 1914 मध्ये सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात ‘रॉयल फ्लाइंग कोर’मधील हिंदुस्थानी वैमानिकांनी पराक्रम गाजवला. फ्लाईट लेफ्टनंट इंद्रलाल राय यांना तेव्हा ‘डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस’ या शौर्य पदकाने गौरविण्यात आले. पुढे याच फ्लाइंग कोरचे रूपांतर 8 ऑक्टोबर 1932 या दिवशी ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’मध्ये करण्यात आले.

स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुस्थानला 1947-48 पासून 2020 या सत्तर वर्षांपेक्षा जास्त काळात पाच युद्धांना तोंड द्यावे लागले. चार युद्धे पाकिस्तान तर एक युद्ध चीनबरोबर झाले. पाकबरोबरच्या युद्धात हिंदुस्थानी वायुसेनेने आपले कर्तव्य बजावत नभांगणात वर्चस्व संपादन केले. 1947 च्या ‘ऑपरेशन गुलमर्ग’ या पाकिस्तानी हल्ल्यात हिंदुस्थानी वायुसेनेच्या लढवय्या आकाश योद्धय़ांचा पराक्रम इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे.

पाकिस्तानी सैन्याने अनपेक्षितपणे स्वातंत्र्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत कश्मीरवर आक्रमण केले. ‘हस के लिया पाकिस्तान, छीन के लेंगे हिंदुस्थान’ अशी गर्जना करत आपला मोर्चा लेह-लडाखकडे वळवला. 15 हजार मीटरपेक्षा उत्तुंग व प्राणवायूचे प्रमाण अत्यल्प असलेल्या प्रदेशात डाकोरासारखे विमान उतरवणे अवघड होते. लेहमधील भूदलाला सैन्य व साहित्याची नितांत गरज होती. तत्कालीन उत्तर विभागाच्या मुख्यालयात जनरल करिअप्पा, जनरल कुलवंतसिंग व जनरल थिमय्या हे तिघे लढवय्ये याच बिकट समस्येवर चिंताक्रांत अवस्थेत चर्चा करत होते. कारण गनिमांची एक डिव्हिजन म्हणजे 30 हजार सैन्याला हुसकावून लावणे गरजेचे होते.

भूदल मुख्यालयात निरव शांतता पसरली होती. जो तो एकमेकांच्या चेहऱ्याकडे ‘कसे आणि काय’ असे अपेक्षेने पाहत असताना जनरल थिमय्या स्मितहास्य करत उद्गारले, ‘‘आहे असा एक धाडसी आकाशयोद्धा आहे. तो आपल्याला या संकटातून सोडवेल.’’ ताबडतोब जनरल करिअप्पांनी जनरल सर रॉय बुचर यांना विचारून एअर मार्शल सर थॉमस एल्महर्ट या ब्रिटिश अधिकाऱ्याला ताबडतोब लेहला पाठवण्याचा विनंतीवजा आदेश दिला.

पंतप्रधान नेहरूंच्या आग्रहामुळे स्वातंत्र्यानंतरही ब्रिटिश अधिकारीच सेनाप्रमुख होते. जनरल रॉबर्ट लखार्ट यांनी आत्मघातकी हल्ले करण्याची योजना आखली होती, पण ती पंतप्रधान नेहरूंनी फेटाळून लावली. त्यामुळे भूदल सेनेची अवस्था बिकट होती. थॉमस एल्महर्ट हे कार्यमग्न होते. त्यांनी त्या जिगरबाज हिंदुस्थानी वैमानिकाला लेहला जाण्याचा आदेश दिला.

हा जिगरबाज अतिशय प्रेमळ व धाडसी आकाश योद्धा ‘बाबा’ या टोपण नावाने सर्वपरिचित होता. या आपल्या मित्राला चेरी फार आवडतात हे आठवताच विमानाच्या लँडिंग पॉइंटपासून मुख्यालयाच्या दारापर्यंत चेरीची पायघडी घालून ठेवली. फ्लाइंग लेफ्टनंट बाबाला मुख्यालयात पाहताच सर्वांना आनंद झाला. लष्करी सोपस्कार संपताच बारामुल्लाच्या त्या भूदल मुख्यालयात उत्साह संचारला. उंची कश्मिरी पेयांचा आस्वाद घेत बाबाने पृच्छा केली, ‘‘मला इथे का बोलावले आहे?’’ जनरल थिमय्यांनी भूमिका स्पष्ट करत विषयाला हात घातला. ‘‘बाबा, या अत्युच्च रणभूमीवर सैन्य, शस्त्रास्त्रसाठा, दारूगोळा व युद्ध साहित्याची वानवा, चणचण भासत असून तू यात मदत करशील ही अपेक्षा आहे.’’ बाबा विचारात पडला. हे आव्हान स्वीकारणे म्हणजे प्राणाशी गाठ. जनरल थिमय्या त्याला ‘बकअप करत म्हणाले, ‘‘मित्रा साऱया देशवासीयांच्या आशा तुझ्यावर आहेत. फक्त तूच हे धाडस करू शकतोस.’’ क्षणाचीही उसंत न घेता बाबा म्हणाले, ‘‘ही ऑपरेशन टास्क फारच कठीण. एक वेळ हे आव्हान मी स्वीकारेन, पण माझ्या बरोबर स्वतःचा जीव कोण धोक्यात घालेल?’’ जनरल थिमय्यांनी वचन दिले. ‘‘बाबा, मी, लेहमध्ये तुझ्याबरोबर उतरायला तयार आहे.’’ पदाने, अनुभवाने ज्येष्ठ जनरल थिम्मयांसारखा योद्धा साथ देणार म्हटल्यावर बाबाचा उत्साह द्विगुणित झाला.

1947-48 च्या युद्धात पाकिस्तानचे सैन्य जिहादच्या उन्मादाने हाजी पीरच्या दक्षिण भागात घुसत होते. तिला या गर्तेतून काढण्याचे काम ‘बाबा’ या जिगरबाज आकाशयोद्धय़ाने स्वीकारून पूर्ण केले. पूंछ या भागात तेव्हा हवाई पट्टी (Run Way) नव्हती. तेथे लढाऊ विमान उतरवणे व उड्डाण (Air Born) करणे प्राणघातक होते. तरीही एअर कमोडोर ‘बाबा’ मेहेरसिंग व मुंबईचे तत्कालीन विंग कमांडर ए. एम. इंजिनीअर या ‘जांबाज’ आकाश योद्धय़ांनी डाकोटा हे विशाल विमान तेथे उतरवले. 161 हिंदुस्थानी ब्रिगेडच्या पलटनीला उतरवून लेह, लडाखचे संरक्षण केले. 15 हजार मीटर डोंगराळ उत्तुंग शिखरावर ‘डाकोटा’ उतरवणे हा जागतिक विक्रम होता. लेहमधील जनतेने त्या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक पुतळा स्थापित केला आहे. आज आमची वायुसेना 88 वर्षे पूर्ण करीत आहे.

या आपल्या वायुसेनेचे महत्त्व फार वाढले आहे. आज पश्चिमोत्तर शत्रूंच्या नापाक व लाल सेना माकडचेष्टा करत वाकुल्या दाखवत असताना आमचे आकाश योद्धे नभांगणात ‘आतषबाजी’ करण्यास सक्षम आहेत. 16 ऑफिसर्स व 142 हवाई शिपाई इतक्या फौजफाटय़ावर सुरू झालेली आमची वायुसेना जगात अव्वल स्थानी आहे. वायुसेनेचे महत्त्व व महालय पाहून भूदल सेना व नौदल सेनेचाही वायुदल विभाग आहे. आजच्या मितीला वायुदलाच्या पाच ‘ऑपरेशनल कमांडस्’ असून एक प्रशिक्षण कमांड व दुसरी देखभाल कमांड आहे. फाळणीच्या वेळी अंबाला व कानपूर ही दोनच ‘एअर स्टेशन’ हिंदुस्थानच्या वाट्याला आली. त्यात आता बरीच भर पडली आहे. मिग (रशियन), मिराज 2000, जग्वार, सुखोई, कॅनबेरा व नुकतेच दाखल झालेले राफेल आणि आत्मनिर्भर होऊ पाहणारे स्वदेशी ‘तेजस’ या लढाऊ एअरक्राफ्टस्चा ताफा सुसज्ज आहे. वाहतुकीसाठी डॉर्नियर, ऍव्हरो, इल्युशियन व चेतक, चित्ता ही हेलिकॉप्टर्स तयार आहेत. या लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रनचे दोन मुख्य प्रकार- 1) नियंत्रित (Guided), 2) अनियंत्रित (Ballastic) या क्षेपणास्त्र्ाांमध्ये जमिनीवरून आकाशात, आकाशातून समुद्र व जमिनीवर मारा, प्रहार, आकाशातून आकाशात मारा करण्याची ताकद आहे. ध्वनी किंवा प्रकाशाप्रमाणे वेगवान भरारी घेत लक्ष्यभेद करण्याची संहारक ताकद आपल्या वायुसेनेत आहे.

‘नभ स्पृशं दीप्तम’ ही बिरुदावली (Touch the Sky with Glory) आता अंतराळावर (Space) आरूढ होत आहे. आकाशयोद्धा स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा या अंतराळवीराने शुभारंभ केलाच आहे. कोणतेही आव्हान परतवून लावेल, अशी आपली वायुसेना आहे आणि जिगरबाज आकाशयोद्धे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या