नादारी आणि दिवाळखोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उदय तारदाळकर

कंपन्यांची नादारी आणि दिवाळखोरी संहिता ही एक सामाजिक ध्येय म्हणून अनुरूप आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना समर्थन मिळून योग्य वेळेत उपाययोजना राबविल्यास संस्थेला दिवाळखोरीपासून वाचविता येते; परंतु संपूर्ण मुद्दा हा सातत्याचा आहे आणि त्यासाठी सरकारने व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला तरच येत्या काळात या संहितेचा सकारात्मक उपयोग होईल.

नादारी आणि दिवाळखोरी संहिता 2016 (Insolvency and Bankruptcy Code 2016) अस्तित्वात आल्यापासून गेल्या तीन वर्षांत बुडीत कर्जाच्या समस्येवर काय परिणाम झाला याची चर्चा सर्वच माध्यमांतून होत असते. उद्योजक, भागीदारी, मर्यादित दायित्व असलेली भागीदारी (एलएलपी) आणि मर्यादित कंपन्या यांचे दिवाळखोरीचे निराकरण एकसंध पद्धतीने करण्यासाठी ही संहिता सरकारने आणली. दिवाळखोरीच्या निराकरणाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी सदर संस्थेने आपले कामकाज चालू ठेवून कर्जफेड करावी हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सरकारच्या या योजनेचे स्वागत करून व्यवसाय सुलभतेत हिंदुस्थानच्या मानांकनाला 30 अंकांनी बढती दिली.

नादारी आणि दिवाळखोरी संहितेअंतर्गत त्वरित सुनावणी करून त्या निकालात काढण्यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्यूनल (NCLT) तसेच नॅशनल कंपनी लॉ अपेलेट ट्रायब्यूनल (NCLAT) यांची स्थापना करण्यात आली. कर्जाचे निराकरण एकूण 270 दिवसांत व्हावे असा कायदा करण्यात आला. एका झटक्यात सरकारने काही अप्रचलित कायदे रद्द केले तर काही कायदे अधिलिखित करून कर्जवसुलीचा मार्ग सोपा केला. या संहितेबद्दल सामान्य धारणा अशी होती की, कर्जदारांना बुडीत कर्जाचे प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यास मदत होईल आणि त्याच वेळी व्यावहारिक तोडगा निघेल. या पार्श्वभूमीवर कर्जाची वसुली जलद होईल आणि कर्जबुडव्यांना जरब बसेल अशी अपेक्षा निर्माण झाली. या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने जून 2016 मध्ये एस्सार स्टील, भूषण पॉवर आणि स्टील इत्यादी 12 प्रमुख कर्जबुडव्या कंपन्यांची यादी जाहीर केली. त्यावेळी त्यांच्या थकबाकीचे मूल्य सुमारे 3.45 लाख कोटी रुपये होते तर वसुली सुमारे 25 टक्के होण्याची शक्यता होती. ऑक्टोबर 2017 रिझर्व्ह बँकेने आणखी 26 कर्जबुडव्यांची यादी जाहीर केली. सुरुवातीच्या काळात म्हणजे सप्टेंबर 2018 पर्यंत सुमारे 40 टक्के कर्जे वसूल झालेली होती. भरीला सर्वोच्च न्यायालयाने संहिता ‘संपूर्णतः’ घटनात्मक आणि वैध ठरविली, पण त्यानंतर मात्र प्रवर्तक आणि विविध कर्जदारांकडून दाखल झालेले निरर्थक दावे आणि आक्षेप, न्यायाधीशांची कमतरता आणि सरकारी खात्यातील समन्वयतेचा अभाव अशा अनेक कारणांमुळे चित्र जरा धुसर झाले.

या पार्श्वभूमीवर सरकारने या वर्षी संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर केलेल्या नादारी आणि दिवाळखोरी संहितेमध्ये नवीन दुरुस्त्या घडवून आणल्या. त्यामध्ये 270 दिवसांऐवजी 330 दिवसांत ठराव पूर्ण करण्यासाठी मुभा देण्यात आली आणि एखादे प्रकरण 330 दिवसांपेक्षा जास्त दिवस प्रलंबित असल्यास पुढील 90 दिवसांत त्याचे निराकरण करावे लागेल. नवीन दुरुस्तीत असा आदेश देण्यात आला आहे की, याअंतर्गत झालेले सर्व निर्णय सर्व सरकारी खात्यांवर आणि संस्थांवर बंधनकारक असतील दिवाळखोरी निराकरणाच्या कार्यवाहीदरम्यान काही संस्था निक्रिय राहिल्याने विलंब होतो आणि त्याचा पीडितांना त्रास होतो. निराकरण प्रक्रियेचा एक भाग म्हणून विलीनीकरण/अधिग्रहण योजनेस अनुमती देऊन व्यावहारिक पाऊल उचलले गेले.

उपलब्ध आकडेवारीवरून असे आढळते की, सप्टेंबर 2019 अखेरपर्यंत 2542 खटले दाखल करण्यात आले होते. एकूण 2542 प्रकरणांपैकी 86 प्रकरणांचा निकाल लागला आहे किंवा त्या प्रकरणात अपील दाखल झाले आहे. 587 कंपन्या दिवाळखोर जाहीर झाल्या असून 156 प्रकरणे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. एकूण 116 प्रकरणे मागे घेण्यात आली आहेत. रिअल इस्टेट आणि बांधकाम प्रकरणाशी संबंधित सुमारे 400 प्रकरणे प्रलंबित आहेत. वेळेचा विचार केल्यास सुमारे 850 प्रकरणे 180 दिवसांपेक्षा जास्त प्रलंबित आहेत त्यापैकी 535 प्रकरणे 270 दिवसांपेक्षा जास्त प्रलंबित आहेत.

या सर्व प्रलंबित खटल्यांत एस्सार स्टील कंपनी प्रकरणावर सर्वांचे लक्ष लागून होते. सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या शुक्रवारी झालेल्या निर्णयामुळे जगातील दुसऱया क्रमांकाच्या स्टील कंपनीचा म्हणजे श्री लक्ष्मी मित्तल यांच्या आर्सेलर मित्तल कंपनीचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे बँकांना वेगवेगळ्या धनकोंना विक्रीच्या रकमेच्या वितरणाचे अधिकारही दिले. कोर्टाने दिवाळखोरी अपिलीय न्यायाधिकरणाचा (NCLAT) सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंना समान अधिकार देण्याचा निर्णय रद्दबातल ठरविला. सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंमध्ये समानतेचे कोणतेही तत्त्व नाही, असे न्यायाधीश रोहिंग्टन नरीमन यांनी निकालाचे वाचन करताना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळखोरीच्या संहिते अंतर्गत केलेल्या सर्व दुरुस्त्या वैध ठरविल्या. दिवाळखोरी अपिलीय न्यायाधिकरणाला दिवाळखोर निधी वितरणाचा अधिकार नसून ते फक्त योजनेच्या कायदेशीरतेची तपासणी करू शकतात, असा कोर्टाने निर्णय दिला. दिवाळखोरीच्या संहितेअंतर्गत निपटाराच्या प्रक्रियेत वित्तीय कर्जदात्यांना दैनंदिन खर्चामुळे निर्माण होणाऱया कर्जदात्यांना प्राधान्य दिले आहे. कर्जदाता समितीने घेतलेल्या निर्णयात न्यायालय प्राधिकरण हस्तक्षेप करू शकत नाही किंवा त्यांचा निर्णय बदलू शकत नाही असेही नरीमन यांच्या खंडपीठाने उद्धृत केले.

या निर्णयामुळे धनकोंमधील कायदेशीर भांडणे कमी होतील आणि मंजुरीला वेग येईल. त्यामुळे धनाढय़ उद्योगपती अशा दिवाळखोरी प्रक्रियेत भाग घेतील आणि त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक अपेक्षित आहे. एस्सार स्टीलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर ऊर्जा क्षेत्रातील वितरण कंपन्यांचे आरोग्य खालावत असताना अशा थकीत कर्जाच्या समस्यांना संजीवनी मिळू शकते. आर्थिक कोंडीत अडकलेल्या कोळशावर चालणाऱया ऊर्जा प्रकल्पांपैकी केवळ 10 टक्के प्रकल्पात आतापर्यंत थकबाकी वसूल झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षीपर्यंत बँकांनी हिंदुस्थानच्या कोळशावर चालणाऱया वीज उत्पादकांना सुमारे 1.74 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले होते . त्याचप्रमाणे सर्वात व्यावहारिक निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाने असे नमूद केले आहे की, कायदेशीर कारवाईत घेतलेला वेळ लक्षात घेता जर कर्जपूर्तीची योजना पूर्ण होण्यास फक्त काही दिवसांचा अवधी बाकी असेल तर न्यायाधिकरण ही मुदत 330 दिवसांपेक्षा अधिक वाढवू शकेल. नवीन दुरुस्तीचे आणखी एक सकारात्मक वैशिष्टय़ म्हणजे ते घराच्या खरेदीदारांना धनकोचा दर्जा देते. एखाद्या विशिष्ट संख्येच्या पलीकडे कर्ज घेणाऱया (गृह खरेदीदार) वर्गाचे कर्ज असल्यास वित्तीय पतधारकांच्या पतसमिती (सीओसी) मध्ये त्यांना अधिकृत प्रतिनिधित्व मिळणार आहे.

– [email protected]