
>> सनत्कुमार कोल्हटकर
शियाबहुल इराणला अलग पाडून इराण आणि सौदी अरेबिया व इतर सुन्नीबहुल आखाती देशांमध्ये वितुष्ट कसे कायम राहील या दीर्घकालीन अमेरिकन धोरणाला छेद देण्याचा आणि इराण व सौदी अरेबिया यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न चीनने चालविला आहे. इराण आणि सौदी अरेबिया यांच्यामधील कडवटपणा कमी करून त्यायोगे येमेन, पॅलेस्टाईन, लेबेनॉन या देशांच्या भूमिका सौम्य करण्याचा प्रयत्न चीनने चालविला आहे. चिनी नेतृत्वाला या प्रयत्नांमध्ये कितपत यश येते याचीच सर्वांना उत्सुकता आहे. अमेरिकेच्या आखातातील प्रभावाला धक्के देण्याचे काम चीनकडून केले जात आहे असे प्रथमदर्शनी वाटण्याजोगी परिस्थिती आहे.
सध्या इस्रायल, इराण, मध्यपूर्वेतील आखाती देश आणि पश्चिम आशियातील देश यांमधील वर्षानुवर्षे चालत आलेल्या राजनैतिक संबंधांमध्ये इतक्या उलथापालथी होत आहेत की, त्याचे पर्यवसान कोठे आणि कसे होणार आहे याचीच उत्सुकता लागून राहिलेली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात इस्रायल आणि बहारीन, यूएई, ओमान यांच्यामध्ये राजनैतिक संबंध सुरू झाले. या देशांमधील कराराला ‘अब्राहम करार’ असे गोंडस नावही दिले गेले होते. सौदी अरेबियाचे जाहीरपणे इस्रायलबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले नसले तरी अघोषितपणे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि इतर गोष्टींवर बोलणी चालू आहेत.
आखातामध्ये मोठा काळ वास्तव्य केलेले हिंदुस्थानी लोक सांगू शकतील की, असे काही घडू शकेल याची गेल्या 25 वर्षांमध्ये कुणी कल्पनाही केली नसेल. इस्रायलच्या बंदरांमध्ये या देशांच्या व्यापारी जहाजांना थांबण्याची परवानगी नव्हती, एवढेच नव्हे तर तसे प्रमाणपत्रही द्यावे लागत असे. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे विशेषतः इराकमध्ये सद्दाम हुसेन जिवंत असताना त्याच्याकडून आक्रमण होण्याच्या भीतीने बहारीन, कतार आणि आखाती प्रदेशांत अमेरिकेचे नाविक आणि इतर तळ अस्तित्वात आहेत.
अयातोल्ला खोमेनी यांचे इराणमध्ये आगमन होण्यापूर्वी शाह मोहम्मद रेझा पेहलवी यांची राजवट पूर्णपणे अमेरिकाधार्जिणी होती. इराणमध्ये तेथील स्त्रियांना युरोपातील इतर देशांमध्ये राहणाऱ्या महिलांप्रमाणे पोशाख स्वातंत्र्य आणि इतर स्वातंत्र्यही होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोहम्मद रेझा पेहलवी यांच्या तत्कालीन राजवटीचे तत्कालीन इस्रायलशी उत्तम राजनैतिक संबंध होते. खोमेनी यांच्या इराणमधील आगमनानंतर अमेरिका आणि इराणमध्ये जे राजनैतिक संबंध बिघडत गेले, ते आजतागायत कायम आहेत. अमेरिकेने शियाबहुल इराणला दूर लोटत असताना सुन्नीबहुल असणाऱ्या सौदी अरेबिया, बहारीन, कुवेत, यूएई आणि इतर देशांबरोबर आपले राजनैतिक संबंध वाढवत नेले होते. अमेरिकेचा आतापर्यंतचा इतिहास पाहता ते जेथे जेथे पाऊल टाकतात तेथे तेथे दोन जवळच्या देशांपैकी एकाला जवळ करतात, तर दुसऱ्याला दूर ठेवतात आणि त्या दोन्ही देशांमध्ये कायम कुरबुरी किंवा युद्धजन्य परिस्थिती कायम राहील याची दक्षता घेतात. या अशा दोन्ही देशांच्या संघर्षातून स्वतःचा शस्त्रास्त्र व्यापार वाढवत नेतात.
इराण आणि सौदी अरेबियामध्ये राजनैतिक सहकार्य सुरू झाले हा इस्रायलला बसलेला फार मोठा धक्का असल्याचे दावे केले जातात. विशेषतः इस्रायलने अरब-आखाती देशांबरोबर केलेला अब्राहम करार यामुळे धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. इराणचा कट्टर शत्रू असणाऱ्या इस्रायलला या घडामोडींची मोठी चिंता लागून राहिलेली दिसते आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ातील इस्रायली नेतृत्वाच्या काही लक्षवेधी हालचाली पाहता इस्रायल काय करू पाहते आहे याची सर्वांना उत्कंठा आहे. सौदीसाठी इस्रायल नाही, तर इराणच शत्रुदेश असल्याचा इशारा इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी दिला आहे. त्याचबरोबर लवकरच आपण सौदीला भेट देणार असल्याची घोषणा इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. अझरबैजानच्या दौऱ्यावर असताना इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी आपण लवकरच सौदीचा दौरा करणार असल्याचे सांगितले आहे.
17 जानेवारी 1979 मध्ये इराणचे तत्कालीन राजे शहा मोहम्मद रेझा पेहलवी यांनी इराणमधून पलायन केले होते आणि अमेरिकेत आश्रय घेतला होता. आता जवळ जवळ 44 वर्षांनंतर इराणचे तत्कालीन शाह मोहम्मद रेझा पेहलवी यांचे वंशज आणि सध्या अमेरिकेत वास्तव्यास असणारे रेझा पेहलवी आणि त्यांच्या पत्नी यास्मिन या दोघांनी नुकतीच या एप्रिल महिन्यातच इस्रायलला भेट दिली. सध्या इराणमध्ये तेथील राजवटीविरुद्ध गेले अनेक महिने चालू असणारे आंदोलन पाहता इराणमधील सामान्य जनतेमध्ये रेझा पेहलवी यांच्याबाबत सहानुभूती / आपुलकी दाटून आली असल्यास आश्चर्य नाही. इराणच्या जनतेत मोहम्मद रेझा शहा पेहलवी व त्यांचे उत्तराधिकारी प्रिन्स रेझा पेहलवी यांच्याबाबत आदर असल्याचे सांगतात. काही वर्षांपूर्वी इराणच्या राजवटीला कंटाळलेल्या जनतेने दबक्या आवाजात पेहलवी यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित व्हावी अशी समाज माध्यमांवर मागणी केल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
इस्रायल ‘होलो कॉस्ट रेमेंबरन्स डे’ साजरा करीत असताना प्रिन्स रेझा यांची ही इस्रायल भेट इराणला आव्हान देणारी बाब ठरते. इस्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रिन्स रेझा यांनी हजेरी लावली होती. तसेच जेरुसलेममधील ‘वेस्टर्न वॉल’लादेखील प्रिन्स रेझा यांनी भेट दिली. तसेच 1979 सालच्या आधी इस्रायल व इराणमध्ये असलेले सहकार्य नव्याने प्रस्थापित करण्याची घोषणा प्रिन्स रेझा यांनी केली.
इराणच्या सध्याच्या सरकारच्या प्रवक्त्यांनी या इस्रायल भेटीच्या बातमीला काहीही महत्त्व नसल्याचे सांगितले असले तरी इराणच्या राजवटीसाठी रेझा पेहलवी यांची इस्रायल भेट ही अस्वस्थ करणारी बातमी होती. इस्रायलविरोधात एकजूट करण्याचा निर्धार करणाऱ्या इराणसाठी प्रिन्स रेझा पेहलवी यांची इस्रायल भेट फार मोठी चिथावणी देणारी बाब ठरते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इराणमध्ये राजवटीच्या विरोधात भडकलेल्या निदर्शनांना प्रिन्स रेझा पेहलवी यांनी चिथावणी दिली होती असा ठपका इराणने ठेवला आहे.
रझा पेहलवी यांनी इस्रायलचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि इतर अनेक प्रमुख व्यक्तींची भेट घेतली आणि त्यांचे इस्रायलमध्ये चांगले स्वागतही झाले. इराणचे तत्कालीन राजे शहा मोहम्मद रेझा पेहलवी यांच्या काळात म्हणजे 1960 – 70 च्या दशकात इस्रायल आणि इराणमध्ये कॉन्सुलेट आणि आर्थिक, व्यापारी संबंध होते.
इस्रायलच्या या हालचाली कमी आहेत म्हणून की काय, इराणच्या भौगोलिक सीमा ज्या देशाशी भिडलेल्या आहेत अशा मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात येथे इस्रायलचा दूतावास याच महिन्यात सुरू झाला आहे. इराण व तुर्कमेनिस्तानमध्ये 1148 किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यावेळी उपस्थित होते. अश्गाबात शहर इराणच्या सीमारेषेपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे इस्रायलने इराणच्या सीमेजवळ दूतावास सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
इस्रायलने इराणच्या शेजारी असलेल्या मध्य आशियाई देशांबरोबरचे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. अझरबैजान या इराणच्या उत्तरेकडील देशाबरोबर इस्रायलचे व्यापारी तसेच लष्करी सहकार्य आहे, पण आता इस्रायलने तुर्कमेनिस्तान या आणखी एका इराणच्या शेजारी देशाबरोबरील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. इराणला घेरणाऱ्या इस्रायलच्या या हालचाली बघता यापुढील काळात इराण इस्रायलला कसे प्रत्युत्तर देतो याकडे जगाचे लक्ष असेल हे निश्चित.



























































