
>>प्रशांत गौतम<<
प्रख्यात इंग्रजी साहित्यकार अमिताभ घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला. मळलेली वाट सोडून त्यांनी आपल्या साहित्यात वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख मिलाफ घडवला आणि वैशिष्टय़पूर्ण, वेगळे लिखाण केले, एवढेच नव्हे तर भूतकाळाला वर्तमानकाळाशी जोडून वाचकांना आकर्षित करण्याची खुबी त्यांच्या लेखनात होती. घोष यांच्या अनेक कादंबऱ्यांचे विषय ऐतिहासिक पार्श्वभूमीवर लाभलेले राहिले. शिवाय लिखाणाची शैलीही वाचकांना भावणारी असल्याने त्यांनी आपला स्वतंत्र वाचकवर्ग निर्माण केला. वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखनात होते.
द सर्कल ऑफ रिझन (1986), शॅडो लाइन्स (1988), कलकत्ता क्रोमोसोम (1995), सी ऑफ पॉपीज (2008) यांसारखी त्यांची अनेक पुस्तके गाजली. यातील ‘द सर्कल ऑफ रिझन’ ही घोष यांची पहिली कादंबरी. दिल्ली विश्वविद्यालयाचे सेंट स्टीफन कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ही कादंबरी लिहिली, ज्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. इंग्रजी साहित्यातील प्रख्यात लेखक अशी त्यांची ओळख या अनेक लेखन गुणविशेषांमुळे जगभरात निर्माण होत गेली. उपरोक्त कादंबरीतील ‘शॅडो लाइन्स’ अशीच एक महत्त्वपूर्ण कादंबरी, जिचा सन्मान 1989 साली साहित्य अकादमी पुरस्काराने झाला. घोष यांच्या अनेक पुस्तकांनी जागतिक स्तरावर मोठा दबदबा निर्माण केला. डासिंग इन कंबोडिया, द ग्लास पॅलेस, द हंग्री टाईड तसेच इबिस ट्राईलॉजी, सी ऑफ पॉपीज, रिव्हर ऑफ स्मोक यांसारख्या अनेक कादंबऱ्या जाणकार, अभ्यासक आणि वाचकांच्या पसंतीस उतरल्या. इंग्रजी साहित्यातील मौलिक लेखन योगदान देणाऱ्या घोष यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविले. तर ‘द सर्कल ऑफ रिझन’ या कादंबरीचा 1990 साली फ्रान्स सरकारनेही ‘फ्रान्स मेडिसीस’ या पुरस्काराने गौरव केला. 11 जुलै 1956 साली कोलकाता येथील बंगाली हिंदू परिवारात अमिताभ घोष यांचा जन्म झाला. जन्मभूमी बंगाल ही असल्याने अस्सल देशी साहित्याचे बीजारोपण त्यांच्या साहित्यात निर्माण होत गेले. बंगालमधील साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनाचे, घटना, घडामोडींचे पडसादही त्यांच्या साहित्य लेखनावर उमटत गेले. 1986च्या सुमारास घोष यांची पहिली कादंबरी ‘द सर्कल ऑफ रिझन’ एका विणकरावर आधारित आहे. त्याच्यावर संशयिताचा ठपका ठेवला जातो. पुढे त्याला कोलकाता, मुंबई, आखाती देशांत पाठवले जाते. पक्षीनिरीक्षक पोलीस त्यांचा पाठलाग करतात असे चित्रण करून घोष स्थलांतराचा वेध घेतात. त्याच्या दोनच वर्षांनी घोष यांनी ‘द शॅडो लाइन्स’ ही कादंबरी लिहिली, ज्यास शीखविरोधी दंगलीची पार्श्वभूमी होती. त्यात पुढे फाळणीचे चित्रण येते. नंतर साठच्या कालावधीतील ढाका-कोलकाता येथील जातीय दंगलीचा संदर्भ येतो. घोष यांची आणखी एक महत्त्वपूर्ण कादंबरी म्हणजे ‘द कोलकाता क्रोमोसोम’ ही होय. 1990 च्या सुमारास ती कोलकाता आणि न्यूयॉर्क शहरात घडते. मलेशियावर संशोधन करणारे ब्रिटिश अधिकारी रोनाल्ड रॉस यांच्यावर आधारित या कादंबरीचे लेखन आहे. त्यात रॉस यांचे चारित्र्यही येते. द कोलकाता क्रोमोसोम, द ग्लास पॅलेस या कादंबऱ्या असोत किंवा ब्रिटन आणि चीन यांच्यातील 19व्या शतकातील अणुयुद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘आयबिस’ जहाजाभोवती घडणारी कादंबरी असो किंवा (त्रिधार- सी ऑफ पॉपीज, रिव्हर ऑफ स्मोक, फ्लाईड ऑफ फायर) यांसारखे लेखन असो, त्यात घोष यांनी इतिहासाचे देशीपण जपले आहे.
अभिताभ घोष यांचे बालपण बंगालमध्ये गेले. नंतर बांगलादेश आणि श्रीलंकेत देशाटन झाले. काही काळ पत्रकारिता केल्यानंतर दिल्ली, ऑक्सफर्ड आणि अलेक्झांड्रिया विद्यापीठात मानववंशशास्त्र्ााचा अभ्यास केला. त्यात मिळणारे विषय हे लेखनासाठी ऊर्जा देणारे ठरले. आपल्या दुसऱ्या कादंबरी लेखनात त्यांनी इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घालत जुळवणी सुरू केली. सलमान रश्दी यांच्या कादंबरीत जसे जादुई वास्तव असते. त्याचाच प्रत्यय त्यांनी लिहिलेल्या ‘द शॅडो लाइन्स’मध्ये येत गेला. त्यात लंडनमध्ये राहणाऱ्या व्यक्तिरेखा हिंदुस्थानच्या इतिहासाचे लक्षवेधी वर्णन करतात असे चित्रण दिसते. घोष यांनी आजपर्यंत द सर्कल ऑफ रिझन, द शॅडो लाइन्स, द कलकत्ता क्रोमोसोम, द हंग्री टाईड, सी ऑफ पॉपीज, रिव्हर ऑफ स्मोक, फ्लड ऑफ फायर या कादंबऱ्या लिहिल्या. ‘द ग्रेट डिरेजमेंट क्लायमेट’सारख्या निबंध लेखनाच्या पुस्तकातून पर्यावरणावर चिंता व्यक्त केली. त्यात बिघडत जाणाऱ्या पर्यावरण समतोलावर भाष्य केले. हिंदुस्थानमधील पारंपरिक दुष्काळ आणि त्यावर उपाययोजना यावर महत्त्वपूर्ण भाष्य मांडले आहे.
इन ऍन ऑण्टिक लँड, द इमाम ऍण्ड द इंडियन ही घोष यांची प्रवासवर्णने आणि निबंध लेखनाची पुस्तके कादंबरी लेखनाप्रमाणेच बहुचर्चित ठरली. घोष हे बहुप्रस्थ लेखक कधीच नव्हते. फार भाषणबाजी केली नाही की सभासमारंभातून मिरवणे त्यांच्या स्वभावास मानवले नाही. ‘थोडे लोकांत, थोडा एकांत’ हे त्यांना जास्त आवडत असावे. घोष यांच्या साहित्य लेखनास साहित्य अकादमी, पद्मश्री आणि आता ज्ञानपीठ सन्मान प्राप्त झाला. घोष यांचे वास्तव्य वर्षभरातील काही दिवस हिंदुस्थानात तर काही दिवस न्यूयॉर्क येथे असते. आजपर्यंत हिंदुस्थानी भाषांतील विविध भाषांतील लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाले, पण यावेळी हा सर्वोच्च सन्मान इंग्रजी भाषेत क्रतस्थपणे लिखाण करणाऱ्या शैलीदार वाचकप्रिय लेखकास प्राप्त झाला आहे.

























































