सौदी पत्रकार खशोगीच्या मृत्यूचे गूढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सनत कोल्हटकर<<

[email protected]

एखाद्या व्यक्तीला दूतावासातच ठार मारण्याची ही दुर्मिळ घटना आहे. त्यामुळे सौदी पत्रकार जमाल खशोगी यांच्या गूढ मृत्यूचे आंतरराष्ट्रीय पडसाद आणि संयुक्त राष्ट्रांकडून या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित होतेच. आता सौदीचे आखातातील मित्रदेश यूएई, इजिप्त, बहरीन यावर काय प्रतिक्रिया देतात याची उत्सुकता आहे. अमेरिकेतील डेमोक्रेटिक आणि काही रिपब्लिकन सिनेटर्सकडून यावर गदारोळ घातला जाण्याची शक्यता आहे. सौदी राजघराण्यातील अंतर्गत धुसफूसही यापुढे वाढण्याची शक्यता दिसते.

अपेक्षेप्रमाणे आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर सौदी अरेबियाला पत्रकार जमाल खशोगीचा तुर्कीच्या इस्तंबूल शहरातील सौदीच्या दूतावासात मृत्यू झाल्याचे घोषित करावे लागले. अर्थात हा मृत्यू होता की सुनियोजित ‘खून’ होता याबद्दल यापुढे सौदीला स्पष्टीकरण द्यावे लागेल तसेच पत्रकार जमाल खशोगीच्या मृतदेहाची कशी विल्हेवाट लावली गेली तेही जाहीर करावे लागेल. याप्रकरणी युवराज सलमान यांच्या सुरक्षा ताफ्यातील सुरक्षा अधिकाऱ्यांनाच बळीचा बकरा बनविले गेले आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सौदीच्या 18 अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आले असल्याचे सौदी सरकारने जाहीर केले आहे, तर चौकशी अधिकारी अहमद असीरी यांचे निलंबन करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. सौदीकडून तपास अधिकाऱ्याला दोषी धरण्यात आले आहे. सौदीच्या तपास अधिकाऱ्यावर आता दोषारोप होऊन त्याच्या चौकशीचा उपचारही पार पाडला जाईल. त्या अधिकाऱ्याला शिक्षाही होईल. एक गोष्ट स्पष्ट आहे की, कोणीही अधिकारी स्वतःच्या अधिकारात असे धाडस करील हे संभवत नाही, पण याचा सौदीच्या उर्वरित अधिकाऱ्यांच्या कामावर परिणाम संभवतो. या सुरक्षा अधिकाऱ्याने परस्पर हे घडवून आणले असेही जाहीर केले जाऊ शकते, पण या घटनेमुळे सौदीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला धक्का लागला आहे हे निर्विवाद!

एखाद्या व्यक्तीला दूतावासातच ठार मारण्याची ही दुर्मिळ घटना आहे. त्यामुळे सौदी पत्रकार जमाल खशोगी यांच्या गूढ मृत्यूचे आंतरराष्ट्रीय पडसाद आणि संयुक्त राष्ट्रांकडून या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित होतेच. आता सौदीचे आखातातील मित्रदेश यूएई, इजिप्त, बहरीन यावर काय प्रतिक्रिया देतात याची उत्सुकता आहे. अमेरिकेतील डेमोक्रेटिक आणि काही रिपब्लिकन सिनेटर्सकडून यावर गदारोळ घातला जाण्याची शक्यता आहे. सौदी राजघराण्यातील अंतर्गत धुसफूसही यापुढे वाढण्याची शक्यता दिसते. या घटनेचे सौदीअंतर्गत काय पडसाद उमटतात हेही बघावे लागेल. सौदी अरेबियाच्या ‘येमेन’मधील कारवाईवर नियंत्रण आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आता यापुढे वाढू शकतो.

खशोगीच्या या प्रकरणातील संशयाची सुई युवराज महंमद बिन सलमान यांच्याकडे रोखली गेली असल्याने पुढील आठवडय़ात सौदीमध्ये भरणाऱ्या आर्थिक परिषदेवर फ्रान्स, जर्मनी तसेच ‘आयएमएफ’च्या मुख्याधिकारी ख्रिस्तिन लेगार्ड यांनी बहिष्कार घातला आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री या परिषदेला अनुपस्थित राहतील असे जाहीर करण्यात आले आहे. मागील वर्षी ज्या हॉटेलमध्ये सौदी राजघराण्यातील अनेक व्यक्तींना डांबण्यात आले होते त्याच हॉटेलमध्ये ही परिषद भरत आहे हे विशेष. सौदीचे युवराज महंमद बिन सलमान या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

आता सौदीला अमेरिकेकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र विक्रीवर बंधने घालण्यासाठी दबाव येऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सौदी अरेबियाचे समर्थन करताना दमछाक होऊ शकते. सौदीच्या शस्त्रास्त्र विक्रीवर ट्रम्प बंधने घालू इच्छित नाहीत. कारण शस्त्रास्त्र विक्रीच्या या प्रचंड व्यापारावर रशिया, चीन व इतर शस्त्रास्त्र उत्पादक देशांचा डोळा आहे.

जमाल खशोगी हा सौदीमध्ये जन्मलेला, परंतु नंतर अमेरिकन नागरिकत्व पत्करलेला एक पत्रकार. त्याचे वास्तव्य अमेरिकेत व्हर्जिनियामध्ये होते. खशोगी हा सौदीच्या राज्यकारभारावर जोरदार टीका करायचा. त्याने अलिकडेच तुर्कीमधील वास्तव्यात दुसऱ्या विवाहाची तयारी केली होती, परंतु त्यासाठी त्याला सौदी सरकारकडून पहिल्या पत्नीशी ‘विभक्त’ झाल्याचा दाखला हवा होता. 2 ऑक्टोबरला तो पूर्वनियोजित वेळेनुसार कागदपत्रे आणण्यासाठी इस्तंबूलमधील सौदी राजदूतावासात गेला.  त्या वेळी त्याच्याबरोबर त्याची होणारी दुसरी पत्नीही सोबत होती. सकाळी राजदूतावासात प्रवेश केलेला खशोगी संध्याकाळपर्यंत राजदूतावासातून बाहेर आलाच नाही. राजदूतावासाबाहेरील ‘सीसीटीव्ही’मध्ये खाशोगी दूतावासात प्रवेश करताना स्पष्टपणे दिसतो. त्याच्या नियोजित पत्नीने वाट बघून मग स्थानिक तुर्कीच्या सरकारकडे खशोगीच्या ‘गायब’ होण्याबद्दल तक्रार नोंदवली होती.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जमाल खशोगी हा अमेरिकेचा नागरिक नव्हता असे विधान केले होते. खशोगी हा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकन वर्तमानपत्रासाठी नियमितपणे स्तंभ लिहीत असे. खाशोगी सौदीचे तरुण युवराज महंमद बिन सलमान आणि त्यांची कार्यशैली यांचे कडवा टीकाकार असल्याचे बोलले गेले. विशेषतः युवराज सलमान यांनी सौदीमध्ये जाहीर केलेल्या सुधारणा आणि त्यांचे भविष्यातील इजिप्तजवळ नवीन शहर उभे करण्याचे स्वप्न, सौदीमध्ये चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी सुरुवातीला आंदोलन करणाऱ्या महिलांना झालेली अटक, येमेनमधील संघर्षात सौदीचा सक्रिय सहभाग यावर खशोगी याने जोरदार टीका केली होती. जीवाला धोका असल्यानेच तो अमेरिकेत जाऊन स्तंभलेखन करीत असे.

जमाल खशोगीला नुसत्या उलटतपासणीलाच सामोरे जावे लागले असे नसून त्याला हाल हाल करून ठार मारले असल्याचे टर्कीच्या तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. टर्कीचे अधिकारी अंकाराजवळ असलेल्या जंगलामध्येही खशोगीच्या शरीराचे काही तुकडे व भाग मिळतात का याचा शोध घेत आहेत. खशोगीला सुरुवातीला एका इंजेक्शनद्वारे मारण्यात येऊन त्याच्या शरीराचे तुकडे करून ते दूतावासाबाहेर नेल्याचा संशय टर्कीतील तपास  अधिकारी व्यक्त करत आहेत. टर्कीच्या सरकारने त्यांच्याकडे ‘ऑडिओ  रेकार्ंडग ’ उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. या रेकार्ंडग्जनुसार खशोगीला सौदी दूतावासात ठार मारण्यात आले, पण असे रेकार्ंडग टर्कीच्या अधिकाऱ्यांनी केले असेल तर एक वेगळाच प्रश्न उभा राहतो तो म्हणजे दुसऱ्या देशाच्या दूतावासामधील ऑडिओ  रेकार्ंडग कसे करण्यात आले? यामुळे टर्की  हे पुरावे इतर देशांना दाखवूही शकत नाही. तसे टर्की आणि सौदीमधील संबंध सुरळीत नाहीतच. सौदीच्या अधिकाऱ्यांचे आपापसातील दूरध्वनी ‘संभाषण’ अमेरिकेतील तपास अधिकाऱ्यांनी इंटरसेप्ट केल्यामुळे सौदीच्या अधिकाऱ्यांची  ‘खशोगीबद्दल’ अशी काही योजना होती हे स्पष्ट झाले होते.

या परिस्थितीवरील उतारा म्हणून अथवा यातून बाहेर पाडण्यासाठी  कदाचित टर्कीच्या सध्याच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीत सौदीने मोठी डॉलरमधील गुंतवणूक करण्याचे टर्कीला आश्वासन दिले व खरोखरीच गुंतवणूक केली तर खशोगीच्या या घटनेवर टर्की पडदा पाडू शकेल असे वाटते. वर्षाच्या सुरुवातीपासूनच टर्कीचे चलन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत गटांगळ्या खात आहे. टर्कीच्या ‘लिरा’ या चलनाचा अमेरिकन डॉलरबरोबरील विनिमय दर हा 3 लिरा प्रति डॉलरवरून 6 लिरा प्रति डॉलरपर्यंत घसरला होता. कतारने 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक टर्कीमध्ये केल्याने टर्किश लिराची डॉलर्सच्या तुलनेतील ही घसरण थांबली.