केल्याने देशाटन…

>> दिलीप जोशी

गेल्या महिन्याच्या अखेरीस जागतिक पर्यटन दिवस होता. दरवर्षी तो ‘साजरा’ होतो. यंदा सगळे जग हे ‘बंदीशाला’ केले ते कोविड किंवा कोरोना नावाच्या पृथ्वीव्यापी महासाथीने. एरवी या काळात देश-विदेशातली लाखो मंडळी फिरायला बाहेर पडतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून चार दिवस दूर जातात. कोणी राज्यातल्या, देशातल्या किंवा विदेशातल्या पर्यटन स्थळांचा विचार आणि तिथे जाण्यासाठीचे नियोजन आधीच करून ठेवलेले असते. माझे एक परिचित दरवर्षी दोन-तीन परदेश बघून येतात. पर्यटन ही हौस आहे आणि त्यासाठी आर्थिक बळही लागते. साधारण एकोणीसशे एWशीच्या दशकापासून जागतिक पर्यटनात मोठी वाढ झाली. सत्तरच्या दशकापर्यंत आसपासचे कोणी क्वचितच परदेशी जायचे आणि सगळय़ा वस्तीला त्याचे कौतुक असायचे. आता घरटी कोणीतरी परदेशवारी करून आलेले असते. निदान महानगरांमध्ये तरी तशी परिस्थिती दिसते. अर्थात आपल्याच राज्यातील, देशातील पर्यटनाची ठिकाणे इच्छा असूनही पाहता न येणारेही पुष्कळ आहेत. हे केवळ आपल्याकडेच नाही, तर अमेरिकेतही तशीच स्थिती दिसते. मिनिया पलिस इथे राहणाऱया एका मित्राने सांगितले की, तिथून जवळच असलेला नायगारा धबधबा न पाहिलेली अनेक वयस्कर मंडळी तिथे आहेत.

त्यामानाने आपली मराठी मंडळी खूप फिरतात. दोन-चार वर्षांत एखादी मोठी ट्रिप करून येतात. काही वेळा तर कामानिमित्त परदेश पाहून आलेल्यांना आपल्याकडच्या जवळच्या पर्यटन स्थळांचीच माहिती नसते. अजिंठा, वेरुळची लेणी आणि प्राचीन रंगचित्रे, लोणारसारखे जागतिक आणि वैज्ञानिक महत्त्वाचे ठिकाण, आपल्याकडचे शेकडो स्फूर्तीदायक गडकिल्ले, सुंदर शिल्पकलेने नटलेली राज्यातली सुमारे 800 लेणी अशा कितीतरी गोष्टी पर्यटनाचा आनंद देतात.

‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार’ असे म्हटले जाते. हे काव्य तसे जुने आहे. पूर्वी राजेशाहीच्या काळात राजदरबारात ठिकठिकाणचे देशी, विदेशी पण मोजकेच पर्यटक येत असत आणि दरबारातल्या चर्चेत त्यांची बौद्धिक चमक दाखवत असत. मात्र आताही पर्यटन, अनेकांशी परिचय वाढवते. आपण जिथे जाऊ तिथले जनजीवन, त्यांच्या चालीरीती, तिथले खाद्यपदार्थ, वेशभूषा आणि त्यांची स्थानिक भाषा यातून सामान्य ज्ञानात क्षणोक्षणी भर पडते. परदेशात जायचा योग नाही आला, पण देशातल्या बहुतेक राज्यांतील महानगरात आणि खेडय़ातही भ्रमंती करण्याची संधी दोन वेळा मिळाली आणि त्याने अनुभवविश्व समृद्ध केले. आपल्याकडे वर्ल्ड हेरिटेज किंवा जागतिक वारसा ठरलेली अनेक ठिकाणे आहेत. त्यातले अजिंठा-वेरुळ तर खूपच प्रसिद्ध आहे.

पंधरा-वीस वेळा तरी मी वेरुळचे कैलास लेणे पाहिले असेल. एखादे पर्यटन स्थळ मनाला कायमची भुरळ घालते. कितीही वेळा पाहिले तरी कैलास लेण्यातले बारकावे नव्याने ध्यानात येतात. पूर्वी तिथे राज्य सरकारतर्फे वेरुळा कला महोत्सव व्हायचा. त्याला अनेकदा गेलो. तिथे मोठय़ा कलाकारांसोबत भोजनाचा योग यायचा. विख्यात सरोदवादक अमजदअली खान, नृत्यांगना मल्लिका साराभाई (वैज्ञानिक विक्रम साराभाईंची कन्या), ज्येष्ठ शास्त्राrय गायिका वीणा सहस्रबुद्धे अशा अनेक मान्यवरांशी झालेल्या गप्पागोष्टी आजही स्मरणात आहेत.

कैलास लेण्याविषयी काय सांगावे! इतके अप्रतिम आणि वैशिष्टय़पूर्ण शिल्प जगात नसेल. अमेरिकेत असे काही असते तर त्यांनी लगेच ‘गेटेस्ट’ म्हणून त्याची जगभर जाहिरात केली असती. ‘आधी कळस, मग पाया’ अशा पद्धतीने अग्निजन्य (बेसॉल्ट) खडकात कोरलेले हे शिल्प म्हणजे हिंदुस्थानी शिल्पकलेचा तर अद्वितीय नमुना आहेच, पण त्याचबरोबर तत्कालीन इंजिनीअरना हा संपूर्ण कातळ एकसंध आहे हे कसे समजले हेच विस्मयकारी आहे आणि त्याहून विस्मयकारी या शिल्पामधली प्रत्येक गोष्ट. आपण पुढे शिवरात्रीच्या सुमारास या लेण्याची सविस्तर माहिती घेऊ.

पूर्वीचे पर्यटन बहुधा मंदिरे, तीर्थयात्रा यापुरते मर्यादित असायचे. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांनी बाराव्या शतकात केलेल्या ‘तिर्थावळी’चे वर्णन आहेच. पुढे संत नामदेव थेट पंजाबपर्यंत गेले. चालत किंवा घोडय़ावरून जाण्याच्या त्या काळात एवढा प्रवास हे आश्चर्यच. तीच गोष्ट आपल्याकडच्या आषाढी-कार्तिकी वारीची. पर्यटनाने आपल्याला आसपासचे प्रदेश, तिथली माणसे समजतात. विचारांच्या कक्षा रुंदावतात. जितके दूरवर फिरून यावे तितके सारे जग ‘वसुधैव कुटुंबकम्’ वाटू लागतं. कोणताही देश पर्यटकांचे स्वागतच करतो. सद्यस्थितीत साकळलेले पर्यटन पुढच्या मोसमात बहराला येवो एवढेच या क्षणी आपण म्हणू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या