
>> नीलेश कुलकर्णी ([email protected])
कर्नाटकातले राजकीय नाटय़ संपून पुन्हा येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आणि महागठबंधन नावाचे कडबोळे ज्यांच्या शपथविधीला आकाराला आले होते त्या कुमारस्वामींना आपली खुर्ची गमवावी लागली. मात्र त्यामुळे कुमारस्वामी कमालीचे वैफल्यग्रस्त बनले आहे. राजकारणातून निवृत्त होण्याचा त्यांनी इरादा व्यक्त केला आहे. ‘दोनदा मुख्यमंत्री झालो. माझी दुसरी टर्म फक्त स्वतःची खुर्ची टिकवण्याच्या खटपटीतच संपली. जर लोकांसाठी काही करताच येत नसेल आणि राजकारण केवळ बदल्याच्या भावनेतूनच होत असेल तर मला आता ते पेलवणार नाही’, असे उद्गार काढत कुमारस्वामींनी कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एकीकडे कुमारस्वामी तरुणपणात निवृत्तीची भाषा करत असले तरी त्यांचे पिताश्री देवेगौडा आयुष्याच्या सायंकाळीही पुन्हा सत्तेसाठी संघर्षाची भाषा करत आहेत.
कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार वरकरणी भाजपने पाडले असे वाटत असले आणि त्यात तथ्य असले तरी कुमारस्वामींचे सत्तेचे जाझम खेचण्यासाठी एकेकाळी कुमारस्वामी यांचे पिताश्री आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनीच आपल्या तालमीत तयार केलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही तितकेच आघाडीवर होते. राजकारणात ‘उपकारा’ची फेड ही नेहमीच ‘अपकारा’ने होत असते. सिद्धरामय्यांनी देवेगौडांच्या उपकाराची अशीच परतफेड केली. कुमारस्वामी सत्तेवर आल्यापासूनच हे सरकार टिकू नये ही उत्कट भावना जेवढी मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या येडियुरप्पांची होती तितकीच सिद्धरामय्यांचीही होती. येडियुरप्पा व सिद्धरामय्या यांच्या संयुक्त महत्त्वाकांक्षेतून कुमारस्वामींना सत्तेतून बाहेर जावे लागले. सत्ताहीन झाल्यानंतर देवेगौडांच्या परिवाराचे पुढे काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने देवेगौडा आणि त्यांच्या नातवालाही सन्मानपूर्वक घरी बसवले आणि देवेगौडांच्या पुढाकाराने आकारलेल्या महागठबंधनलाही. वास्तविक मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये कुमारस्वामींनी आपल्या कामाचा ठसा चांगल्या पद्धतीने उमटवला होता. देवेगौडा कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना कन्नड सिनेमा बनविण्याचा ध्यास असलेले कुमारस्वामी अपघाताने राजकारणात आले आणि दक्षिण हिंदुस्थानी सिनेमाला शोभेल अशा पद्धतीने मुख्यमंत्रीही झाले. आता कोणत्याही दक्षिण हिंदुस्थानी सिनेमाच्या कथानकाला लाजवेल अशा पद्धतीच्या हाय प्रोफाइल ड्राम्याने त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही गेली. मात्र सत्ता ज्या पद्धतीने गेली त्यामुळे कुमारस्वामी हतबल झाल्याचे बहुमत परीक्षणावेळीही दिसून आले होते. व्यक्तिगत जीवनात कुमारस्वामी भावुक वगैरेही असतील, मात्र त्यांची राजकारणातून निवृत्तीची भाषा काही पटणारी नाही. अगदी मृत्यू दबा धरून बसला आहे हे माहिती असतानाही भल्याभल्यांना सत्तेचा मोह सोडवत नाही. अशा या भुलभुलैयात कुमारस्वामी वैफल्यग्रस्त होणे न पटणारे आहे. कुमारस्वामींना ‘वैफल्या’तून बाहेर काढायलाच हवे. त्यासाठी ‘खात्रीचा हकीम’ कोणीतरी शोधायला हवा.
‘शहा’ का रुतबा…!

हिंदुस्थानच्या राजकारणात सध्या अमित शहा यांचा बोलबाला आहे. अमितभाई केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर तर त्यांचा रूतबा जागोजागी जाणवत आहे. मग ते महत्त्वाचे निर्णय असोत, प्रशासकीय नियुक्त्या असोत की संसदेच्या व मंत्रिमंडळाचा अजेंडा असो, शहा यांची छाप त्यावर दिसून येते. मोदींइतके प्रभावी वक्ते नसले तरी तडाखेबंद पद्धतीने विरोधकांना तडकावून लावणे ही शहा यांची खासियत. 370 कलम रद्द करणारे विधेयक संसदेच्या याच सत्रात मंजूर व्हावे यासाठी शहा यांनी वाखाणण्याजोगी ‘मेहनत’ घेतली. या विधेयकाच्या विरोधात जे जे उभे राहिले त्यांच्या अब्रूची लक्तरे शहा यांनी वेशीला टांगली. राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझादांनाच त्यांनी ललकारले, तर लोकसभेत काँग्रेसच्या अधीररंजन चौधरी आणि असदुद्दीन ओवेसी यांना कडक भाषेत प्रत्युत्तर दिले. राज्यसभेतील विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेत चर्चेवेळी जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला कुठे आहेत याची ‘काळजी’ अनेकांना पडली होती. सुप्रिया सुळेंनी तोच प्रश्न विचारल्यानंतर अगोदरच खुलासा करून कंटाळलेले अमित शहा वैतागले, ‘‘फारुख अब्दुल्लाजी को अरेस्ट नही किया है. वो मौजमस्ती मैं है. अगर वो इधर नही आना चाहते तो क्या उनको कनपट्टी के नीचे गन लगाकर लाया जाए क्या?’’ अशा शब्दांत शहांनी विरोधकांच खडसावल्यानंतर विरोधकांची बोबडीच वळली. मात्र त्यातही धाडस करून सुप्रिया यांनी फारुख यांची तब्येत ठीक नसल्याच्या बातम्या आहेत असे नमूद करताच शहा ताडकन उठले, ‘मैं तो डॉक्टर तो नही हूं ना’ असे म्हणत विरोधकांना गप्प केले. अमित शहा यांचा आवेश आणि आक्रमकता पाहून विरोधकांची नव्हे तर त्यांच्या स्वपक्षातील काही उत्साही खासदारांचीही चांगलीच तंतरली आहे हे नक्की.
शीला दीक्षित आणि सुषमाजी…

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने देशभरात एकप्रकारची शोककळा आहे. सभागृहात आणि बाहेरही विरोधकांवर एखाद्या ‘विद्युल्लते’प्रमाणे कोसळणाऱ्या सुषमा यांनी राजकारण आणि व्यक्तिगत संबंध यात कधीच गल्लत केली नाही. त्यामुळेच सुषमांच्या अकाली जाण्याने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना अश्रू आवरले नाहीत, ‘‘व्यंकय्याजी, आता तुम्ही उपराष्ट्रपती झालात. म्हणजे प्रोटोकॉल आला. यंदा तुम्ही माझ्याकडे राखीला नाही येऊ शकणार, मीच तुमच्याकडे येते राखी बांधायला,’’ असे सुषमा त्यांना म्हणाल्या होत्या. ही आठवण सांगताना व्यंकय्यांच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रूंच्या धारा निघाल्या. तीच बाब काँग्रेसच्या गुलामनबींची. त्यांना आयुष्यभर सुषमा केवळ ‘भाई’ म्हणत. जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनातील सुषमा या खरेतर ‘आंदोलनकन्या.’ त्यामुळे मुलायम, लालू हे यादव त्यांना ‘बहेनजी’ मानत. अवघ्या तीन दिवसांत पासपोर्ट बनविण्याचा निर्णय असो की जगभरात कोणीही संकटात सापडलेले असो, सुषमा त्यांच्या मदतीला हमखास धावून जायच्या. जाती, धर्म आणि पक्षाच्या पलीकडचे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. दिल्लीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या शीला दीक्षित यांचे नुकतेच निधन झाले. शीलाजींच्याही अगोदर दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्याचा मान सुषमांना मिळाला होता. दिल्लीत प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आहे. त्यासाठी दिल्लीत ग्रीनरी वाढावी म्हणून शीला दीक्षितांनी खूप मेहनत घेतली. सुषमा स्वराजही त्यासाठी झटल्या. दिल्ली आणि पर्यावरणाची काळजी या दोघींनीही अखेरपर्यंत घेतली. आपले अंत्यसंस्कारही विद्युतदाहिनीत करावेत अशी दोघींचीही इच्छा होती. दुर्दैवी योगायोग असा की, शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज अखेरच्या प्रवासालाही पाठोपाठच निघून गेल्या.

























































