कमाल कश्मिरी कहवा

थंडी म्हणावी तशी सुरू झालेली नसली तरी रात्रीचा गारवा तिच्या येण्याची वर्दी घेऊन येऊ लागतो आणि गरमागरम पेयांची आठवण होते. चहा, कॉफी तर नित्याची पेयं, पण सर्व भारतीयांना अलीकडेच आपलासा वाटू लागलेला कश्मिरी कहवा म्हणजे कश्मीरइतपंच सुंदर आणि अनोखं पेय. या कश्मिरी कहव्याची ही गोष्ट.

भारतातील विविध राज्यांत चहा बनवण्याचे अगणित प्रकार आहेत. कश्मिरी मंडळी मात्र ग्रीन टीला आपली पसंती देतात. खास कश्मिरी मसाल्यांचा वापर करून बनवला जाणारा हा ग्रीन टी भारताबाहेरही लोकप्रिय आहे. कश्मीरच्या कडाक्याच्या थंडीत उबदारपणा आणणारा हा कहवा कश्मीरचं पारंपरिक पेय होय. पूर्वी कश्मीरला जाणारी मंडळीच कहव्याचे गुणगान गात. आता हा कहवा कश्मीरची सीमारेषा ओलांडून सार्वत्रिक झाला आहे

केहवा, कहावा, कहवा, कावा…नावं अनेक, पण पेय तेच. कॉफीसाठी वापरला जाणारा तुकाa शब्द. केहवामध्ये ‘कहवा’ शब्दाचं मूळ दडलेलं आहे असं म्हणतात, पण कश्मिरी मंडळींसाठी ‘कहवा’चा अर्थ गोड चहा असा होतो. पूर्वी या चहाला ‘मोगल चहा’ म्हटलं जाई. त्यावरून कश्मिरी कहवा मोगलांनी आणला असावा अशी शक्यता संशोधक मांडतात.

पण कुशाण राजवटीत मसाल्यांच्या वा रेशमाच्या मार्गाने (सिल्क रुट) कहवा भारतात आल्याची शक्यता अधिक आहे. मूळ कोठेही असो, आज कश्मिरी कहवा अफगाणिस्तान, पाकिस्तान, मध्यपूर्व देशांत चवीने प्यायला जातो. या भागातील हे पारंपरिक पेय आहे.

कहवा तयार करणं हा तामझामचा भाग आहे.

अगदी अस्सल कहवा समोवर नामक पितळी किटलीत तयार होतो. यातील भांडय़ांची रचना अशी असते की, खालच्या भागात कोळसे पेटवत ठेवता येतात आणि वर विशिष्ट पानांपासून तयार होणारा कहवा उकळत राहतो. कश्मिरी हवेचा सर्द मिजास लक्षात घेता साधारण चहाप्रमाणे एकदाच उकळून तो ओतेपर्यंत गार होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे मंद कोळशांवर कहवा गरम राहतो. दालचिनी, वेलची, कश्मिरी गुलाबाच्या पाकळ्या हिरव्या चहापत्तीची खुमास वाढवतात. खास प्रसंगी, कुणी विशेष पाहुणे येणार असतील तर कहवात जगातील सर्वात महागडा मसाला अर्थात केशरही सामील होते. यातील केशर, दालचिनी, वेलची संपत्तीचं प्रतीक आहेत. शिवाय ते शुभसंकेताचेही मानले जाते.

हा चहा मध किंवा साखरेसह दिला जातो. बदाम आणि अक्रोडचा चुराही काही वेळा यात शामील होतो. कहवात दुधाचा वापर क्वचितच होतो. ज्येष्ठ किंवा आजारी मंडळींना कहवा देताना दूध घातलं जातं. कहवातले घटक या चहाला शाही रूपडं देतात. कश्मिरी शाही दावत वाझवाननंतर कहवा पिणं ही कश्मिरी संस्कृती आहे.

कहवाचे विविध प्रकार आहेत. शेंगरी कहवा विशेषकरून औषधी गुणधर्मासाठी वापरला जातो. घसादुखी, सर्दी-खोकल्यावर उपाय म्हणून हा कहवा प्रसिद्ध आहे. पेशावरी कहवा हा खैबर पख्तुनख्वामध्ये आढळणारा कहवाचा प्रकार आहे . पारंपरिकपणे चमेलीचा चहा आणि हिरव्या वेलचीसह तो बनवला जातो.

कश्मीरची ही खासीयत चहाच्या पॅफेमुळे जगभर पसरलीय. पारदर्शी किटलीतून हिरव्या पिवळसर रंगात, गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत वेलची, दालचिनीच्या गंधासह जेव्हा तो आपल्या समोर दाखल होतो तेव्हा नुसत्या गंधाने तरतरीत वाटायला लावण्याची ताकद त्यात असते. कश्मिरी कहवाला ‘वाह वाह’ म्हणण्याचा मोह आवरत आपण त्या रंगगंधाच्या स्वर्गीयपणाला जहांगीरप्रमाणे ‘‘हमीन अस तो…हमीन अस तो …हमीन अस तो’’ ( जर कुठे स्वर्ग आहे, तर इथेच आहे… इथेच आहे… इथेच आहे!) असे म्हणत राहतो.