
आरती मिरजकर
हर्षखेद ते मावळले हास्य निमाले, अश्रू पळाले
कंटकशल्ये बोथटली, मखमालीची लव वठली
काही न दिसे दृष्टीला
प्रकाश गेला तिमिर हरपला
काय म्हणावे या स्थितीला? झपूर्झा, गडे झपूर्झा!
कवीची अशी मनस्थिती होणे आणि त्याने ती कवितेत शब्दबद्ध करणे हे मराठी कवितेत पहिल्यांदाच घडले विसाव्या शतकाच्या सुरुवातीला. अशी नव्या आशयाची कविता नव्या आविष्काराने लिहिणारे पहिले कवी होते केशवसुत, म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. त्यांचा ‘केशवसुतांची कविता’ हा काव्यसंग्रह 1905 साली त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला.
केशवसुतांनी स्वतच्या भावना व्यक्त करणारी आत्मनिष्ठ कविता स्फुट काव्याच्या रूपात लिहिली. आपल्या मनातील भावविश्व शब्दांत साकार करून त्यांनी मराठी कवितेचे रूपच बदलून टाकले. कवितेची सर्व तत्कालीन बंधने त्यांनी झुगारून दिली. कवितेला अक्षरगणवृत्तांच्या बंधनातून मुक्त करून मनातील भाव व्यक्त करण्यास ती सुकर केली. मूळ इंग्रजीतील sonnet सारख्या कविता, त्यांचे प्रकाशित झालेले मराठी अनुवाद, आगरकरांसारख्या मानवतावादी विचारवंतांचे तत्त्वज्ञान, समाजात वाहू लागलेले सुधारणांचे प्रवाह हे सर्व केशवसुतांच्या संवेदनशील मनाने टिपून घेतले होते. विशेषत आपल्या प्रेयसीबद्दल वाटणारे व्यक्तिगत प्रेम काव्यात धिटाईने आणण्याची प्रथा केशवसुतांनी मराठीत प्रथम घालून दिली. ‘स्वप्न’ या कवितेत हंसाचे पंख लावून एका ताऱयावर आपल्या प्रियेसोबत विहार करण्याचे रम्य स्वप्न ते पाहतात. ‘फार दिवसांनी भेट’ या कवितेत ताटातूट झालेल्या प्रेमी युगुलाची पुनर्भेट झाल्यावर होणाऱया आनंदाचे वर्णन ते करतात. केशवसुतांचा काळ हा इंग्रजी राजवटीचा होता.
आनंदाचे समयी मजला पारतंत्र्य स्मरून
वाटे जैसे असुख तितुके अन्य वेळी गमे न
या कवितेच्या ओळी त्यांचे पारतंत्र्याचे दुःख आणि स्वातंत्र्याचे त्यांना वाटणारे महत्त्व दाखवतात. समाजातील ज्या वर्गांचा काव्यात कधी उल्लेखही झाला नव्हता त्या वर्गातील लोकांचे प्रश्न केशवसुतांनी पहिल्यांदा आपल्या कवितेतून मांडले. रस्त्याच्या कडेला खेळणाऱया महारांच्या मुलांवर एक ब्राह्मण ओरडतो तेव्हा
तधी बाळ तोही घराला निघाला,
मनी आपुल्या या करी चिंतनाला
जरी त्यावरी सावली माझि गेली
तरी काय बाधा असे ठेविलेली?
असा त्या अंत्यजाच्या मुलाच्या मनात उभा राहणारा प्रश्न ते उपस्थित करतात.
केशवसुतांच्या कवितेचा सर्वात महत्त्वाचा विशेष म्हणजे त्यांनी केलेलं रूढीभंजन. त्यांच्या अत्यंत गाजलेल्या ‘तुतारी’ या कवितेत ते मागासलेल्या प्रथांविरुद्ध बंडच पुकारतात.
एक तुतारी द्या मज आणून
फुंकिन जी मी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुन
जुने जाऊ द्या मरणालागुन
जाळुनि किंवा पुरुनी टाका!
सडत न एका ठायी ठाका,
सावध! ऐका पुढल्या हाका!
खांद्यास चला खांदा भिडवुन!
असे नवे विचार आत्मसात करण्यासाठी ते समाजाला हाक देतात. समतेचा ध्वज उंच धरण्याचा आग्रह धरतात. त्यांच्या ‘स्फूर्ति’ या कवितेने तर एक चैतन्याने रसरसलेले आव्हानच दिले.
काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या!
प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या!
शब्दपंक्तिची तरफ आमुच्या
करी विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावर
जग उलथुन या देऊ कसे!
बंडाचा तो झेंडा उभवुनि, धामधूम जिकडे तिकडे
उडवुनि देऊनि, जुलुमाचे
या करू पहा तुकडे तुकडे!
रोमॅंटिक कवींप्रमाणे केशवसुतांच्या कवितांतही नैराश्य, अनाकलनीय औदास्य आणि सृष्टीशी समरस झाल्याने वाटणारा बेहोश आनंदही दिसून येतो. हव्याहव्याशा वाटणाऱया, पण हातून निसटून जाणाऱया या श्रेयाचे ते असे वर्णन करतात:
किरण झरोक्यातुनी पडे, अणुसवे त्यातून उडे
परोक्षविषयी मन माझे
वेडी होऊन बसल्ये अनुदिन
एकच घेऊन – मज माझे लाभेल कसे?
न परि हरपले ते गवसे!
जीवनातील खोल अनुभव व्यक्त करणारी, मानवी हक्कांचा आणि समतेचा आग्रह धरणारी, मनातले प्रेम धीटपणे व्यक्त करणारी कविता लिहून केशवसुतांनी मराठी कवितेत क्रांती घडवून आणली.
हर्षशोक हे ज्या सगळे त्या काय कळे?
त्या काय वळे? हसतिल जरि ते आम्हाला
भय न धरू हे वदण्याला
व्यर्थी अधिकचि अर्थ वसे,
तो त्यास दिसे ज्या म्हणति पिसे;
त्या अर्थाचे बोल कसे? –
झपूर्झा, गडे झपूर्झा!
ब्लर्ब: केशवसुतांच्या कवितेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी www.youtube.com/@Granthyatra भाग 14. समीक्षक नीलिमा गुंडी यांच्याकडून ऐका त्यांच्या कवितेची वैशिष्टय़े.




























































