मांसाहारी जेवण म्हणजे खवय्यांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग. मग ते चिकन, मासे, शिंपले, कोळंबी, कालवे असोत फक्कड बेतच. मात्र अलीकडे मेरवळा फ्रायच्या डिशने आपली वेगळी ओळख निर्माण केली. काटेरी असलेल्या समुद्री जिवाला पह्डल्यानंतर अंडय़ाप्रमाणे पिवळ्या रंगाचा फुलाच्या आकाराचा मांसल भाग फ्राय केल्यानंतर यथेच्छ ताव मारलेल्या थाळीचा आनंद काही काळ तसाच राहतो.
मेरवळा हे नाव थोडे ऐकण्यात वेगळे असले तरी खाल्ल्यानंतर त्याची चव खवय्यांच्या जिभेवर रेंगाळतच राहील. साधारण दसऱयानंतर समुद्रकिनाऱयावर असणाऱया मोठमोठय़ा खडकांच्या मुळाशी स्थिरावलेले हे समुद्र जीव पकडण्यासाठी मासेमारांना बुडकी घेऊन तळाशी जावे लागते. त्यांना खडकावर आणून कोयतीच्या सहाय्याने त्याचे काटे एका बाजूने काढले जातात. त्याचा वरील भाग पह्डून आतमध्ये अंडय़ाच्या आकाराचा पिवळसर भाग वेगळा केला जातो. त्यातही पुन्हा काळसर पट्टी काढून पाण्यात सोडली जाते. कारण त्यातही एक जीव असतो जो पुन्हा नव्याने तयार होत असतो असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
एका भांडय़ामध्ये तेथीलच थोडे पाणी घेऊन त्यात मेरवळा काढला जातो. सध्या साधारण एका पेल्याच्या आकाराला 300 रुपये मोजावे लागत आहेत. देव दिवाळीपर्यंतच्या हंगामात हा खाद्यखजिना खवय्यांना आपलेसे करतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील मिठबाव, कातवण, कुणकेश्वर समुद्रकिनारी तसेच मालवण तालुक्यातील वायंगणी, तोंडवली, तळाशीलच्या काही भागांत मासेमार या हंगामात मेरवळा आवर्जून काढण्याचे काम करतात. धोका पत्करत डुबकी मारून दगडांच्या तळाशी असलेल्या या काटेरी जिवांना पकडताना जखमी होण्याची भीती असते. मात्र मच्छीमारांकडे त्याचे काwशल्य असल्यामुळे आजही आवर्जून तो काढला जात असून किनाऱयावरील रहिवाशांच्या जेवणात हा मेनू अगत्याने दिसून येत असतो.
खडकातून डुबकी मारून मेरवळा काढणे तेवढेच जिकिरीचे असल्याने त्याची किंमतही जास्त आहे. मात्र खवय्यांनी त्याची चव चाखल्यानंतर आठवण आल्याशिवाय राहणार नाही. पुढील काळात याच्या विक्रीलाही वाव मिळेल. – स्वप्नील साळसकर
अलीकडेच झालेल्या कुणकेश्वर रापण महोत्सवात खवय्यांना मेरवळा फ्राय मेनूची खरी ओळख पटली आणि त्यांच्या जिभेचे चोचलेही पुरवले. – सिद्धेश गावडे, कातवण रापण संघ