नवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई

जे. डी. पराडकर

कोकणात केली जाणारी शेती ही पावसावर अवलंबून असते. आश्विन महिन्यात ही शेती कापणीयोग्य होणं म्हणजेच निसर्गानं आनंदाच्या भरात मानवाला दिलेली भेटच म्हटली पाहिजे. नवान्न पौर्णिमेला तयार झालेलं सर्व प्रकारचं धान्य आंब्याच्या पानात एकत्र करून ते शुभशकुन म्हणून बांधणं म्हणजे नवं! कोकणात नव्याची ही (24 ऑक्टोबर) परंपरा आजही तेवढय़ाच उत्साहाने पार पाडली जातेय. बुधवारी कोकणात सर्वत्र नवं बांधण्याची जुनी परंपरा उत्साहात संपन्न होणार आहे.

निसर्गावर मानवातील काही अपप्रवृत्तींनी कितीही अन्याय केला तरी निसर्ग आपला आनंद व्यक्त करण्याचा धर्म सोडत नाही. कोणतेही झाड लावले तर ते कधी ना  कधी फळ देतंच. वृक्षानं फळं देणं म्हणजे त्याच्या आनंदातून मानवाला मिळालेल्या भेटीचं ते एक देणं आहे. वृक्ष आपल्या आनंदाची फळं नेहमी गोडच देतात. मानवानं निसर्गाच्या या सवयींमधून खूप काही शिकण्यासारखं आहे. नवान्न पौर्णिमा हा सण गेली वर्षांनुवर्षे निसर्गाचा ‘आनंदोत्सव’ म्हणूनच साजरा केला जातोय . निसर्गाला होणारा आनंद म्हणजेच मानवाच्या हाती काहीतरी नवं लागणं. सर्वाधिक पाऊस पडूनही भौगोलिक परिस्थितीमुळे कोकण उन्हाळ्यात कोरडा पडतो. परिणामी अपवाद वगळता शेती ओसाड पडलेली असते. यामुळे बहुतांशी शेती ही पावसाळ्यातच बहरते.  भात, वरी, नाचणी, खामडी, तीळ अशा प्रकारची शेती कोकणात पूर्वी केली जायची. आता भात वगळता अन्य पिकांचे प्रमाण अत्यल्प झालंय. तीळ फुलला की, त्याच्या पिवळय़ा फुलांचे ताटवे लक्ष वेधून घ्यायचे. निसर्गाला झालेला आनंद सोनेरी ताटव्यांच्या रूपानं मानवाला एक नवी अनुभूती देऊन जायचा. भात आणि अन्य धान्यं बहरली की, सारं कसं नवं नवं भासतं ! याच नव्याची अपूर्वाई म्हणजे नवान्न पौर्णिमा. हा निसर्गाच्या आनंदाचा उत्सव म्हटला जातो. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या पूर्वीच्या धान्यात या नव्या धान्याची भर पडते आणि सृष्टीचे बहराचे कालचक्र असेच अविरत सुरू राहते .

नवान्न पौर्णिमेला नवीन धान्याचा वापर भोजनात केला जातो.  नवं बांधण्याची एक आगळीवेगळी परंपरा कोकणात परंपरागत सुरू आहे. यामध्ये शुभ मानल्या जाणाऱ्या आंब्याच्या पानात भाताची लोंब, वरी, नाचणीचं कणीस, गोंडा आणि कुर्डूचं फुल एकत्रित करून ते घराच्या प्रवेशद्वारासह महत्त्वाच्या ठिकाणी बांधण्याची पद्धत आहे. नव्याची बांबूच्या कामटय़ांमध्ये केली जाणारी तोरणं तर ग्रामीण भागातील कसबी कलाकारांचं कौशल्य दाखवून देतात. नवं बांधणं कौशल्याच काम मानलं तरी त्यामागील पूर्वजांची संकल्पना वाखाणण्याजोगी आहे. नवीन धान्य घरामध्ये नव्याच्या रूपानं बांधून निसर्गदेवतेसह येणाऱ्या प्रत्येकाचं भरभरून स्वागत करावं हाच त्यामागील खरा हेतू असणार. प्रत्येक नवीन चीजवस्तूचा आनंद जसा मानवी मनाला होत असतो तसा तो निसर्गालाही होतो आणि त्या आनंदाचं माप निसर्ग मानवाच्या पदरात भरभरून टाकत असतो याचं नवान्न पौर्णिमा हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.

निसर्गाला झालेला आनंद मानवासाठी सर्व बाजूंनी लाभदायक ठरतो. मात्र निसर्ग कोपला तर त्याचे परिणाम सहन करणं खूपच अवघड आहे. यासाठी नवं कोणतही काम हाती घेताना निसर्गाचा प्राधान्याने विचार होणं ही काळाची गरज आहे. पूर्वजांच्या संकल्पना आणि त्यामागील उद्देश जर नीटपणे लक्षात घेतले तर अनेक गोष्टींचा आपोआप उलगडा होऊन सणांबरोबर प्रथा – परंपरांची सांगड का घातली गेली आहे हे सहज लक्षात येईल. यासाठी काळाच्या ओघात ‘नवं’ स्वीकारताना ‘जुनं’ विसरूनही चालणार नाही हे तेवढेच महत्त्वाचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या